‘लोकरंग’चा ‘सुरों की आशा’ कार्यक्रम हाउसफुल


सूर्योदय बालगृहाच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने मैफिलीला सामाजिक संवेदनशीलतेची किनार....
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Sep 2026, 8:27 AM
   

अकोला : सुरेल आवाज, बहारदार गीते, ताल-सुरांची मनमोहक जुगलबंदी आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... अशा अविस्मरणीय वातावरणात लोकरंग सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘सुरों की आशा’ हा संगीत कार्यक्रम अकोलेकर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला. जवळपास तीन तास रंगलेल्या या सुरेल मैफिलीला रसिकांनी भरभरून दाद दिली आणि कार्यक्रम अक्षरशः हाउसफुल झाला.
अकोल्याच्या सांस्कृतिक विश्वात सातत्याने नवनवीन आणि दर्जेदार उपक्रमांची भर घालणाऱ्या लोकरंगच्या या कार्यक्रमाने पुन्हा एकदा अकोलेकरांची संगीताची अभिरुची आणि सांस्कृतिक प्रेम अधोरेखित केले.
            नागपूर येथील प्रसिद्ध ‘सूर संगम’च्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘सुरों की आशा’मध्ये गायक सुरभी ढोमणे, अनुश्री केळकर आणि मुकुल पांडे यांनी आपल्या सुमधुर आणि दमदार आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. एकापेक्षा एक सरस गीतांची सुरेल मेजवानी सादर होत असताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि रसिकांच्या प्रतिसादाने वातावरण भारून गेले.
कार्यक्रमाचे संगीत संयोजक सचिन ढोमणे यांच्या प्रभावी तबलावादनाने मैफिलीतील प्रत्येक गीताला तालाची समृद्ध साथ लाभली. डॉ. मनोज साल्पेकर यांच्या खुमासदार आणि बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली. सचिन ढोमणे, पवन मानवटकर, मनोज चिरागले, जानराव देहाडे, अक्षय हरले आणि नितीन जनावरे यांच्या सुरेल साथ-संगतीने कार्यक्रमाची रंगत क्षणाक्षणाला वाढत गेली.
लोकरंगची सामाजिक  बांधिलकीही अधोरेखित
     संगीत आणि मनोरंजनासोबतच सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणाऱ्या लोकरंगच्या उपक्रमाचे यावेळी विशेष कौतुक झाले. सूर्योदय बालगृहाच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना संगीताच्या या अविस्मरणीय मैफिलीचा आनंद घेता यावा, यासाठी त्यांच्या येण्या-जाण्याची व्यवस्थाही लोकरंगच्या वतीने करण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा लोकरंगचा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.
मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचे स्वागत
कार्यक्रमाच्या प्रारंभी ॲड. सुधाकर खुमकर यांनी प्रास्ताविकातून लोकरंग सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या आतापर्यंतच्या सांस्कृतिक वाटचालीचा आढावा घेतला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमातील कलावंतांचे स्वागत करण्यात आले.
डॉ. गजाननजी नारे, अशोकजी ढेरे, प्रदीपसिंहजी राजपूत, नीरजजी आवंडेकर आणि डॉ. संदीपजी चव्हाण यांनी सर्व कलावंतांचे स्वागत केले.
अनिलजी गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली लोकरंग सांस्कृतिक प्रतिष्ठानची अकोल्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचाल दमदारपणे सुरू आहे. कला, साहित्य, संगीत आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर समन्वय साधत लोकरंगने अकोलेकर रसिकांसाठी सातत्याने दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.‘सुरों की आशा’ला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा लोकरंगच्या सांस्कृतिक चळवळीवरील अकोलेकरांचा विश्वास अधोरेखित करणारा ठरला. आगामी काळात यापेक्षाही अधिक दर्जेदार, वैविध्यपूर्ण आणि अविस्मरणीय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचा संकल्प लोकरंगच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
सुरांच्या या अविस्मरणीय मैफिलीने अकोलेकर रसिकांना संगीताचा आनंद तर दिलाच; पण कलेसोबत माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीची जपणूकही किती सुंदरपणे करता येते, याचा सुखद अनुभव दिला.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख