माणसातील माणूस संपला..समाजस्वास्थाशी खेळणारा सैतान जगला..! ..........संपादकीय
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2023-10-25
छोट्या प्राण्यांना किंवा माणसांना भक्ष ठरवून त्यांच्या जीवावर स्वतःचा जठराग्नी तृप्त करणारी जनावरं माणसांनी बघितली. त्या क्रूर जंगली श्वापदांचे इतरांना संपवणे एवढेच लक्ष असते. परंतू माणूस नावाच्या दोन हात,दोन पाय आणि सद्विवेकबुध्दीच्या वापरासाठी मेंदू असलेल्या माणसाने माणूसपणाची लक्षणं आणि जीवनमुल्यांचे संकेत डावलून विपरीत वागणं चालू होते.अशावेळी माणूस आहे की हैबान की रानटी जनावर असं म्हटलं जाते.ती अनेक प्रसंगातून काढण्यात आलेली अनुमानं वर्तमानात खरी ठरत असून वाममार्गाने संपत्ती गोळा करण्यासाठी माणसंच माणसांची आयुष्ये संपविण्याचा कामाला लागली आहेत.
आरोग्य क्षेत्रात डॉक्टरांची अनागोंदी, बाजारपेठेत भेसळयुक्त पदार्थ आणि दुधाची विक्री, औषधी विक्रेत्यांचे औषधांचे काळे बाजार आणि समाजजीवनाला धोके पोहचविणारे अनैतिक वर्तन, हे नित्याचे उद्योग होऊन बसले.ते कोणाच्या आशीर्वादाने चालतात हे कोणाला सांगण्याची आता गरज राहीली नाही.परंतू या बरोबरच धनिकांच्या व्यसनासाठी आणि चैनीसाठी निर्माण होणारे आणि विकल्या जाणारे ड्रग हे सुध्दा मानवी समाजातील अनेक जीवांना आयुष्यातून संपविण्याचू काळे कारनामे ठरत आहेत.व्यसनासाठी उपलब्ध होणारे ड्रग घेणारा माणूस हा धनाढ्य आहे की गरीब हा प्रश्न येथे उपयोगाचा नाही.शेवटी तो माणूस आहे.अनैतिक उद्योग करणारे त्याला ड्रग सहज उपलब्ध करून देऊन त्यांच्या जीवाशी खेळत आहेत हे एक वास्तव सत्य आहे.मग या उद्योगांवर कुणाचे नियंत्रण नाही,आणि नियंत्रण ठेवण्याची गरज का वाटत नाही? याचे उत्तर चोर चोर सगे भाई एकाच ठीकाणी संघटीत झालेले असल्यामुळे त्यांच्यातील मानवी भावना संपून तिथे अनाचाराच्या सैतानांचे जन्म झालेले आहेत.केवळ गडगंज संपत्तीसाठी ईतरांची आयुष्यं संपवून काळी माया कमावणारा आणि त्यासाठी जनवारांप्रमाणे ईतरांना भक्ष ठरविणाऱ्या या परावलंबी माणसांना काय म्हणावे ? हा एक विचार करण्यासारखा चिंतनीय प्रश्न झाला आहे.
मानवी स्वास्थ्याला संकटात टाकणाऱ्या ठिकठिकाणच्या बनावट औषधांच्या आणि भेसळयुक्त पदार्थ विक्रीचे उद्योग सुरूच आहेत. औषधांच्या काळ्या बाजारांच्या कारनाम्यांसोबतच देशात आणि महाराष्ट्राला ड्रग माफियांनी घातलेला विळखा हे सुध्दा इतरांच्या आयुष्यांचे लिलाव करणारं एक जहरी खेळणं काळा पैसा कमावणाऱ्या माफियांच्या अंगवळणी पडलेलं आहे.परंतू हे उद्योग बिनबोभाट कसे चालत राहतात,याला कुणाचं अभय असतं हा आता फार संशोधनाचा विषय राहिलेला नाही.कारण सगळ्या चोऱ्या आणि त्यांच्या चोरवाटा कशा असतात हे वर्षानुवर्षांपासून समाजाच्या अनेकदा समोर आलेलं आहे. तरीही संभाजीनगरमधील ड्रगचे जाळे देशभर आणि युरोपपर्यंत पसरलेले असल्यावरही त्याचा उगम महाराष्ट्र पोलिसांना लक्षात येऊ नये ही एक चिंतनीय बाब आहे. ते उद्योग करणारा साधा राहत होता,त्याचा काही बडेजाव नव्हता म्हणून तो पोलिसांच्या लक्षात आला नाही.ही संभाजी नगर पोलिसांकडून सध्या सुरू असलेली सावरासावर म्हणजे जात असलेली अब्रू वाचवण्यासाठीची एक धडपड आहे.ती शासन आणि समाजासमोर येण्यासाठी गळे फाडून मिडीयासमोर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.आता हे सगळे उद्योग खरोखरच लक्षातच आले नाहीत, की मधूर अर्थकारण सांभाळत त्यांच्या समाजजीवनाशी खेळण्याच्या पापी कारनाम्यात त्यांना सांभाळणारेही सहभागी होते हा एक संशोधनाचा विषय असून त्यातील सत्त्य कालांतराने बाहेर येईलच.
एखाद्याच्या घरात चोरीची मालमत्ता दडवलेली असतांना त्या घरमालकाला त्याची माहिती नसावी,आणि बाहेरून येणाऱ्या दुसऱ्याने ती दाखवून द्यावी. ही गोष्ट पचनी पडण्यासारखी निश्चितच नाही.गुजरात पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन धाड टाकणे हे महाराष्ट्र पोलिसांच्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब झाल्यासारखे आहे.आपण काय करतो आहोत.समाजाला कसा न्याय देतो आहोत याचा संभाजीनगर पोलिसांनी मानवतेच्या नात्याने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.या रॅकेटचा जितेशकुमार प्रेमजी भाई हिनहोरिया हा हिन काम करणारा सुत्रधार त्यांना गवसला.जो संभाजीनगरात सतत वावरत होता. परंतू संभाजीनगर पोलिसांना तो नेहमी साधा,सुस्वभावी,समाजसेवी उद्योजक माणूस वाटला.याला आता आश्चर्य म्हणावे की सत्य ?त्याच्याकडून जाणाऱ्या मालाची व येणाऱ्या कच्च्या मालाची भनक स्थानिक पोलिसांना कधीच लागली नाही,ही गोष्ट विश्वास ठेवण्यासारखी नाहीच.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन पोलिस विभागातील अप्राणिक किड शोधल्या गेली पाहिजे.
नाशिकमध्ये ललित पाटीलचेही सर्व उद्योग अनेक वर्ष सुरळीत चालू होते.देशात आणि महाराष्ट्रातील हा ड्रगचा विळखा किती महाभयंकर आहे हे लक्षात येण्यासारखे आहे.यात मध्यवर्गीयांचे जीव जात नसले तरी प्रसिध्दीच्या शिखरावर पोहोचलेल्या किती लोकांची आयुष्ये या ड्रगने हिरावून घेतली आहेत,याचे कोरोना काळातील उदाहरण म्हणजे सुशांत राजपूत आहे.हे पापी कारनामे करणारे समाजातीलच माणसं आहेत.परंतू ते झटपट संपत्ती कमावणारे परावलंबी जनावरं झालेली असतात.समाजातील ईतरांची आयुष्ये नासविणारी ही क्रूरकर्मी जमात संपवण्याऐवजी त्यातून स्वत:चीही उखळं पांढरी करून घेण्यासाठी त्यांना अभय देणाऱ्या अमानुष प्रवृत्ती सुध्दा येथे सक्रिय आहेत.त्यामुळे एकंदर समाज जीवन संकटात आलेलं आहेत. जंगली श्वापदांप्रमाणे पापाची माया कमावण्यासाठी माणसंच माणसांच्या आयुष्यांच्या लिलावांवर जगत आहेत. अशा परावलंबी अमानुष प्रवृत्तीची पाळेमुळे नेहमी शोधत राहण्यासाठी समाजानेही दक्ष राहणे गरजेचे आहे.समाजजीवनावर घोंगवणाऱ्या अनेक संकटांना टाळण्यासाठी नेहमीची सामाजिक भुमिकाही काय असली पाहिजे यावर चिंतनासाठी समाजातील जबाबदार लोकांनी वेळ दिला पाहिजे. अन्यथा अनेक नराधम येथील समाजजीवनाला अधिकाधिक नासवत राहतील.जाणारे जीव आणि व्यसनाधिनतेने अकाली संपत जाणारी पिढी वाचवणे हे शासन,प्रशासनासोबत सामाजिक कर्तव्य सुध्दा आहे!
Post Views: 323