वासनांधांच्या विरोधातील जनआक्रोश आता धोक्याच्या वळणावर....!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Aug 2024, 9:36 AM
   

          महिला, मुली आणि अल्पवयीन मुली ह्या समाजातील  नराधमांच्या विकृत वासनांधतेच्या बळी ठरत आहेत.त्यामुळे गुण्यागोविंदाने शांततामय जीवन जगणाऱ्या नागरीकांच्या निरोगी समाजव्यवस्थेला या जहरी अजगरांनी मारलेल्या वेटोळ्या हा समाजासाठी अत्यंत गंभीर आणि चिंतनशील विषय होऊन बसला आहे.या विकृत क्रूर मानवी पशूंनी आपल्या अत्त्याचारांच्या बळी ठरवून अनेक महिला आणि मुलींची आयुष्ये  संपविली.दिल्लीतल्या अत्त्याचाराची बळी ठरलेल्या निर्भयानंतर महिला अत्त्याचाराविरोधातील कायद्यात काही सुधारणा झाल्या तरीही लैंगिग गुन्हेगारीच्या  घटनांचा आलेख कमी झालेला नाही.अंगात सैतान भरलेली ही जनावरं सारीच अशिक्षित नव्हती तर माणुसकीला काळीमा फासणारी उच्चशिक्षितही होती.त्यात काही डॉक्टर, पोलिस, शिक्षक, प्रबोधनाचे बुरखे पांघरलेले समाजसेवक आणि महाराजही होते. पुरूष आणि स्त्री या पराकोटीला पोहचलेल्या लैगिंग भेदभावांनी मानवतेला वेळोवेळी पराजित केले आहे.पुरूषी अहंकारातील या  वखवखलेल्या विकृतींनी माणुसपण हरवून आणि रानटी जनावरांचे राक्षसी अवतार धारण करून शांतताप्रिय समाजावर सतत आघात केलेले आहेत.अशाच संकटाची बळी कोलकात्यातील डॉक्टर युवती ठरलेली आहे.
          परवा बदलापूरच्या चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्त्याचारांचा संताप अनावर होऊन घराबाहेर पडलेला प्रचंड जनसमुदाय आणि झालेले रास्तारोको आंदोलन ह्या आता धोक्याच्या घंटा ठरत आहे. पाठोपाठ अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातही अशी घटना घडली आहे.न्यायव्यवस्थेच्या कचाट्यातून पळवाटांनी पळून जाणाऱ्या या नराधमांना दंडीत करण्यासाठी बदलापूरप्रमाणे असेच जनसमुदाय जर समोर येत गेले, तर कायदे हातात घेण्याच्या वर्तनातून संविधानावर आघात होण्याचे प्रमाण वाढत जाईल. त्यामुळे त्याला वेळीच प्रतिबंधक ठरतील असे काही बदल घडले पाहिजेत. कायदे तर अधिक कठोर करावेच लागतील परंतू असे घडूच नये म्हणून संबधित व्यस्थापनांनी झोपा काढण्याचे बेपर्वाहीचे प्रकार आता थांबविले पाहिजेत. मुक बधीर सी.सी.टी व्ही च्या जोडीला सतर्कता बाळगून मुर्दांडांऐवजी कर्तव्य आणि माणुसकीने जीवंत असणारे दक्ष पहारेकरी सुध्दा सर्वत्र तैनात असले पाहिजेत.त्यांनी त्यांची चौकीदारी नेहमीच पणाला लावली पाहिजे.
      यासाठी उच्च पदांपासून तर चतुर्थ श्रेणी आणि कंत्राटी भरतीमध्येही चारित्र्यांच्या तपासण्या अनिवार्य केल्या पाहिजेत.म्हणजे ठीकठीकाणी प्रवेशणाऱी विकृत जनावरंं वेळोवेळी अगोदरच बाहेर फेकली जातील.चारित्र्य आणि सदाचाराचा आलेख सांभाळला नाही तर नोकरीही मिळू शकत नाही हा झालेला बदल ‌अनुचित गोष्टींना अटकाव करणारा ठरू शकतो‌.म्हणून ज्या गोष्टी नुसत्या कायद्याने रोखता येत नाहीत,त्या प्रकरणांध्ये ह्या काटेकोर निकषांनी बदल घडण्यास सुरवात होईल.माणसाच्या आर्थिक व्यवहारांच्या उचित निकषांसाठी जसा प्रथम सिबील स्कोअर पाहिला जातो.तशी ठीकठीकाणची भाऊ गर्दी भरतांना शैक्षणिक पात्रता आणि अनुभवासोबत चारित्र्याचा स्कोअर सुध्दा पाहिला जावा.यामुळे बराच बदल होऊ शकेल.
         अनुचित घटना घडल्यानंतर गदारोळ करून सगळ्या कारवाया केल्या जातात. परंतू त्याचे प्रमाण कमी व्हावे,आणि कमी होत होत त्या घटना घडूच नयेत यासाठी करावयाच्या कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्यातील बदलांच्या अंमलबजावणीवर लक्ष केन्द्रीत झाले  पाहिजे.नाही तर अशाच लैंगिक अत्याचारांच्या संतापजनक घटना घडत जातील.अनेक महिला मुली पाशवी बळीजबरीच्या बळी ठरत जातील.निरोगी समाजव्यवस्थेला लागलेली ही किड अनेकांना नासवत राहिल.समाज कालांतराने विसरत जाईल आणि दडा देऊन काही काळ शांत बसलेली अजगरं ‌त्या शांततेचा फायदा घेऊन परत माना वर काढत राहतील.आपल्या वासनांध कारनाम्यांसाठी मोकाट फिरत राहतील.‌जम्मू काश्मिरमधील सैन्न्य काढून लडाखमध्ये पाठविल्याबरोबर जसे अतिरेकी हल्ले वाढले तशातलेच हे प्रकार आहेत.फक्त ते  तिकडचे आहेत आणि ही खळबळ अंतर्गत आहे. 
          या देशात शासनव्यस्थेची सुत्रे चालवणारे काही नेते आणि प्रशासनातील कायद्याचे रक्षकच भक्षक ठरलेले आहेत तिथे सामान्न्य गुन्हेगारांवर वचक कुणाचा असणार? नैतिकता आणि सदाचारांचे आदर्शच लोप पावलेले आहेत,त्यामुळे अधिकाधिक माणसांची मने विकृत होत चालली आहेत.स्वत:च्या क्षणिक सुखांसाठी तो समोर येईल त्याला भक्ष ठरविण्याच्या विचारात वावरतो. संधी मिळताच परिनामांचीही पर्वा न करता जनावरांसारखी झडप मारून स्वत:चे मनसुबे पूर्ण करतो.या बिघडलेल्या वातावरणातून आज कोणतेच क्षेत्र सुटलेले नाही.या प्रदुषणापासून स्वत:ला आणि समाजाला कसे वाचवावे यावर चिंतन होत राहिले पाहिजे.समाजातील संवेदनशील मनांनी,समाजशील तरूणांनी बाहेर वावरतांना दक्ष पहारेकऱ्याची भुमिका नेहमी घेणे आपले कर्तव्य समजलं पाहिजे.रस्त्याने जाणाऱ्या आणि सार्वजनिक ठीकाणी काम करणाऱ्या महिला आणि मुलींच्या अवती भोवती कोण वावरतो, त्यांच्या नजरा आणि चेहऱ्यांवरचे आविर्भाव टीपत राहिलं पाहिजे.अशी हेरगीरी व्यापक स्वरूपात सुरू झालेली आहे याची कुणकुण जेव्हा विपरीत कृत्त्य करणारांना लागेल तेव्हापसून ते स्वत:चे जीव वाचववण्यासाठी स्वत:च्या वागणुकीतच बदल करायला सुरूवात करतील.मग जे काम प्रबोधन आणि उपदेशांनी घडत नाही ते भितीपोटी घडायला सुरूवात होईल.
     ज्याप्रमाणे देव डोकं टेकवल्याशिवाय आपल्यावर कृपा करणार नाही या भितीपोटी डोकं टेकवून तिथे नाकं घासली जातात.त्याचप्रमाणे समाजात आता हेरगीरी करणारे सदाचारी देव आता जागृत झाले आहेत या भितीपोटी अनेक वासनांध श्वापदं बिळात जातील, किंवा हळू हळू स्वत:मध्ये बदल करण्याशिवाय आपल्याला आता पर्याय नाही ही उपरती त्यांना होइल.कायद्यांनी दंडीत करण्याचे ईलाज हे घटना घडल्यानंतरचे असतात.वासनांधांच्या विरोधातील वाढता जनाक्रोश हा ईतरांच्या जीवनालाही संकटात टाकणारा ठरू शकतो.तो धोक्याच्या वळणावर जाऊ नये.म्हणून समाजमनांना ढवळून काढणाऱ्या अशा घटनाच घडू नयेत यासाठी सतर्कतेचे ईलाज हे सतत परिनाम करणारे ठरू शकतात.यासाठी समाजातील युवाशक्ती नेहमी अग्रेसर असली पाहिजे..!
संजय एम. देशमुख,ज्येष्ठ पत्रकार
मोबा.क्र. ९८८१३०४५४६

    Post Views:  287


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख