समाजातील मुला मुलींची आयुष्ये नेहमी धोक्यातच!*


 विश्व प्रभात  02 Feb 2024, 9:43 AM
   

  मुली असोत की मुले ती सारी देवाघरची फुले हे बोलतांना शब्द किती भावनाप्रधान वाटतात.परंतू अकाली खुडल्या जाणाऱ्या कळ्या आणि मारली जाणारी मुले हा या देशातील नरराक्षसांकडून होणारा किती मोठा क्रूर नरसंहार ठरत आहे,हा एक समाजमनांना सुन्न करणारा अत्यंत गंभीर आणि चिंतनीय विषय आहे.ज्यांच्या पोटची लेकरं  जबरदस्तीने अकाली हिरावली जातात,त्याची मने विदिर्ण करणार,कासाविस करणारं आणि तहान,भूक आणि सुखाची झोप उडविणारं दु:ख काय असतं हे फक्त त्याच दुर्दैवी पालकांना माहिती असतं.मुलांवर होणारे अन्याय,आघात हे त्यांचे बळी घेण्याइतके भयंकर असतात.धनाच्या लालसेने घेतले जाणारे बळी,हरामाच्या पैशांसाठी अपहरणातून संपविली जाणारी मुले,आणि आश्रमशाळांतील गैरव्यवस्थापनातून होणारे संशयास्पद मृत्यू, ह्या समाजाला हादरविणाऱ्या  भिषण घटना नेहमीच घडत आहेत.या प्रकरणातील ही निरागस मुले भविष्याची रंगीत रंगीत स्वप्ने पाहता पाहताच कायमची संपविली जातात.

       अनेक मुली समाजातील गावगुंडाच्या आणि कामांतूर बड्या बापांच्या‌ बिघडलेल्या अवलादींकडून वासनेची शिकार म्हणून कुसकरून संपविल्या जातात.अशा भयानक प्रकरणातील अनेक आरोपी कायद्यांमधील पळवाटा शोधून पुराव्याअभावी निर्दोष सुटतात.अशावेळी समाजातील संवेदनशील नागरिक आणि तिच्या किंवा त्यांच्या मायबापांच्या जीवांचा काय संताप होत असेल ह्या कल्पना सुध्दा समाजालाही दु:खित करणाऱ्या असतात.त्यातूनच अनेक आई वडीलही आता काय शिल्लक राहिले म्हणून आत्महत्यांनी स्वत:चीही जीवने संपवून टाकतात. या एकंदर परिस्थितीचा विचार होऊन असे गुन्हे घडूच नयेत, आणि घडलेत तर अशा अपराधांमधील रानटी जनावरे जन्मभरही सुटू नयेत यावरील कायदेशीर उपाययोजना अजून पाहिजे तशा आणि आवश्यक त्या प्रमाणात अंमलात आलेल्या नाहीत.हे येथील लोकशाहीप्रदान देशातील  नागरिकांचं फार मोठं दुर्दैव ठरत आहे.

              चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालूक्यात सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक निवासी आश्रमशाळेतील १२ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला.यामुळे लैंगिक अत्याचारात बळी गेलेल्या आश्रमशाळांमधील घटनांप्रमाणेच ही घटना‌ असावी का? असा संशय निर्माण झालेला आहे.कारण मुलींची तब्येत बरी नव्हती तरी तिच्या आई वडीलांना वेळेत कळविल्या गेलं नाही,आणि  सांस्कृतिक कार्यक्रमांचा सराव करतांना अचानक ती कोसळली.घटना घडलेल्या अशा संस्था जर राजकीय पुढाऱ्यांच्या असल्यात तर त्या घटनेच्या चौकशी आणि निष्कर्षाचं पुढे काय होईल याची उत्तरे आज समाजातल्या साध्या माणसाकडेही अगोदरच तयार असतात.ही येथील लोकशाही आणि संविधानिक शासनप्रणालीतील  एक मोठी शोकांतिका आहे. 

       १२ वर्षांची मिताली केशव कोंडागुर्ले ही अभागी विद्यार्थीनी गडचिरोली जिल्ह्यातील मरपल्ली गावातील रहिवाशी होती.आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणाच्या कारणाने गरीब मायबाप छातीवर दगड ठेऊन मुलांसोबत मुलींनाही आश्रमशाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवतात.त्यांची सुरक्षा आणि आणि देखभालीची जबाबदारी स्वीकारणे हे संस्थाचालकांचं सामाजिक आणि मानवतावादी कर्तव्य असतं.परंतू फक्त अनुदानांसाठी तेवढंच व्यवस्थापन ठेऊन जिवितांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवण्याचं काम योग्य रितीने पार पाडलं जातं नाहीत.त्यानेच अनेक मुला मुलींचे जीव जातात.या गंभीर प्रश्नांकडे शासन लक्ष कधी देणार आहे? घटना घडल्यानंतर चौकशांच्या थातूर माथूर कारवाया केल्या जातात.परंतू अशा घटना घडू नयेत यासाठी संस्थाचालकांना धारेवर धरलं जातं नाही.कारण ते सारे मतांच्या गोळा बेरीज करणारे पुढारी असतात.

         जिथे कुठे संरक्षण,व्यवस्थापन आणि निकषांचं कठोर पालन केलं जातं नसेल अशा संस्थांचं अनुदान थांबवून ठेवलं पाहिजे.तपासण्या करणारे बोके फक्त मलिदेच खातात की कर्तव्यपालनही करतात यावर नेहमीच काटेकोर लक्ष ठेवणे हे शासन प्रशासनाचे कर्तव्य आहे.त्यासाठी आर्थिक हितसंबंधांकडेच लक्ष न देता मानवतावादी भावनांची संवेदनशीलता बाळगणारे अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी असले पाहिजे.परंतू जिकडे तिकडे चचेरे भाई निर्माण झाल्याने शाळा आणि आश्रम शाळांमधील मुला मुलींचे जीवन आज कमालीचे असुरक्षित झालेले आहे.

             या आश्रमशाळेत मृत्यू पावलेल्या मितालीची प्रकृती सहा दिवसांपासून बिघडलेली होती.त्याकडे व्यवस्थापनाने साफ दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत.तिला उशिरा दवाखान्यात नेल्यानंतर चंद्रपूरला हलवतांनाच तिचा मृत्यू झाला.ही आश्रमशाळा भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांची असल्याचे समजते.परंतू शाळा कुणाचीही असो परंतू चौकशी मात्र आता नि:पक्षपातीपणे झाली पाहिजे.दोषी संस्थाचालकांना राजकीय हस्तक्षेपाने सुरक्षित करण्याचे प्रयत्न जर झाले तर तो एक मोठा सामाजिक द्रोह ठरू शकेल.अशा वेळी शासनाच्या भुमिका काय असतात याकडे समाजाचे लक्ष असते.याची जाणीव ठेऊन या प्रकरणाची कडक चौकशी करून संस्थेवर कारवाई व्हावी यासाठी योग्य ती पाऊले उचलली जावीत...!

    Post Views:  204


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व