तोडाफोडीच्या गलिच्छ कारणाने समाज आणि लोकशाही संकटात!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Sep 2023, 10:00 AM
   

राजकारण हे एक दुधारी शस्त्र आहे,ते जसं  सामाजिक विकासासाठी आहे तेवढीच  नशेच्या अतिरेकाने मानवी समाजाचं वाटोळं करणारी ती एक जहरी विध्वंसक नशा आहे.चोविस तास आकंठ दारूच्या नशेत लिप्त झालेल्या मनुष्याला घर, दार, परिवार, नाते गोते,सामाजिक संबंधांचे भान राहत नाही. तो त्याच्याच उन्मादात हेकेखोरी करून मिच विव्दान  या आविर्भावात जगत असतो.आपल्या खोट्या कर्तृत्वाचे ढोल बडवित कल्पनांच्या मनोराज्यात वावरत असतो.त्याप्रमाणे राजकारणाची अतिरेकी भूतं अंगात संचारलेल्या अनेक राजकारण्यांना कर्तव्य, जबाबदारी, नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीच्या कर्मगीतेच्या घेतलेल्या खोट्या शपथांचा आज विसर पडलेला आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त स्वतःच्याच राजकीय गणिताची आकडेमोड करण्यात ते दिवसांच्या रात्री आणि रात्रीचे दिवस करीत असतात. त्यामुळेच सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची त्यांची मानसिकता राहिलेली नाही.
         मोठ्या विश्वासाने अमुक एक सरकार येणार आणि आपलं भलं करणार हे समाज आणि राष्ट्रीय विकासाचे स्वप्न पाहणारी महाराष्ट्र आणि राज्या राज्यातील जनता या लोकप्रतिनिधींना निवडून देत असते.कारण निवडणूकांमध्ये थापा मारणारे हे राजकारणी एकवचनीच असतीलच या भ्रमात देश आणि राज्यात राज्यातील मतदारराजा आणि महाराष्ट्रातील वारकरी, माळकरी बिचारे गाफील
राहतात.मात्र हे काफीर आपलं आता ईकडून जमते का तिकडून या मतलबाच्या राजकारणांची समिकरण जुळवण्यात गर्क  सतात.परंतू ज्यांच्यावर  विश्वास व्यक्त करून जीवापाड प्रेम केलं ते पिंजऱ्यातले  पक्षी दुसरे घरोबे करण्यासाठी लफडी करून कुणाचाही हात धरून पळून जातात.ह्या आता नित्याच्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे रोज मरे त्याला आता कोण रडे अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे.
      युत्या आणि आघाड्यांच्या कुबड्या घेऊन आम्ही स्थिर,पारदर्शक आणि जनकल्याणासाठी सेवा समर्पित करणारे नीतिमान सरकार देण्याची अभिवचने दिली जातात. विश्वास देऊन जनतेची मतं आपल्या झोळ्यांमध्ये घेऊन राजकारणी निघून जातात.नंतर परत कधी जनतेसमोर येत नाहीत‌.आलेच तर  तर ते नव्या वेशात नव्या आवेशात कोणत्या पक्षांचं लेबल घेऊन येतील याचा भरवसाच आता राहिलेला नाही.जनतेची स्मरणशक्ती ही कमकुवत आहे ही नस ओळखून निगरगठ्ठ झालेल्या या नेत्यांना परिनामांची  चिंता नसते.त्यांना माहिती असते लग्न न करता पळवून आणलेली एखादी मुलगी सोबत पाहून आईवडील रागावतात. काही काळ अबोला धरतात.परंतू नंतर सगळं विसरून आपल्या पितृप्रेमाला जागवत नंतर तिला पळवून आणलेली म्हणत नाहीत, तर आपली लाडकी सूनच समजत असतात.असाच निलाजरेपणा आता पक्षांतराच्या  कोलांटउड्या आणि कुंपनापलिकडे पळणारांमध्ये निर्माण झाल्याने सामाजिक विकासाचे तीन तेरा वाजले असून हा लोकशाही आणि संविधानाला निर्माण झालेला फार मोठा धोका आहे.
           देशातील अनेक सरकारे अस्थिर करून पाळायची.देशात विरोधी पक्ष औषधालाही शिल्लक राहू नये ही दक्षता कपटनितीने सर्वांना संपवत सुटायचं.त्यासाठी साम दाम दंडभेद,ईडा पिडेच्या जादुई चमत्कारांनी पक्ष आणि नेते हतबल करायचे ,हा एक कलमी कार्यक्रम समाजधर्म हरवलेल्या सध्याच्या शक्तीशाली राज्यकर्त्यांनी हाती घेतलेला आहे.हे करत असतांना आपणास मिळालेला मानवी जन्म हा समाजकारणासाठी आहे की फक्त अघोरी महत्वाकांक्षेच्या राजकारणासाठी,या वास्तव जाणिवेचा, जन्मामागील सत्याचा काही निर्ढावलेल्या या नेत्यांना विसर पडलेला आहे.महाराष्ट्रात आघाडी सरकारचे कामकाज व्यवस्थित सुरू होते.परंतू मी पून्हा येईलची भीष्म प्रतिज्ञा  सकाळचा पहिला  शपथविधी आटोपल्यावरही फलद्रूप न झाल्याने राजकारणाची नशा स्वस्थ बसू देत नव्हती.
           त्यानंतर तोडफोडीच्या राजकारणाने गती घेतली आणि एकनाथरावांनी काही साथीदार सोबत घेऊन मुख्यमंत्रीपदाचा गड सर केला.त्यानंतर एकदा मागे घेतलेली उडी परत मारावी म्हणून मग अजित दादा पण  काकांना सोडून निघून गेले‌.आपले सारे आयुष्य हे कुरघोड्या,विश्वासघात आणि अस्थिरतेचे राजकीय चित्रपट पाहण्यातच घालवावे लागणार का या विचाराने जनता बिचारी आता बेजार झाली आहे.पण स्वतःला तारणहार समजून राजकीय नशेत चूर राहणाऱ्या राजकारण्यांना जनतेची चिंता करण्याची आवश्यकता वाटू नये ही फार मोठी शोकांतिका आहे.या खेळखंडोबांनी समस्या निवारण आणि विकासकार्याला ब्रेक लागून जनतेच्या तिजोरीचा नाश होते आहे.हे समजून घेऊ नेऊ नये हे समाज,राज्य,राष्ट्र व लोकशाहीचे फार मोठे दुर्दैव आहे...!
संजय एम. देशमुख( निंबेकर)
मुख्य संपादक 
मोबा. क्र.९८८१३०४५४६

    Post Views:  378


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व