कोरोना मृतांसाठी 50 हजारांची मदत! राज्य सरकारने काढले परिपत्रक


 sanjay deshmukh  26 Nov 2021, 7:43 PM
   

सोलापूर : राज्यातील एक लाख 41 हजार व्यक्‍तींचा कोरोनाच्या (Covid-19) दोन्ही लाटेत मृत्यू झाला आहे. त्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 50 हजारांप्रमाणे सात हजार 50 कोटींची मदत मिळेल. यासंदर्भात आज (शुक्रवारी) राज्य सरकारने (Maharashtra State Government) नवीन आदेश काढले आहेत. पुढील आठवड्यापासून मृतांच्या नातेवाइकांना सेतू केंद्रात अथवा महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीतून अर्ज करता येणार आहेत. कोरोना झाल्यानंतर 30 दिवसांत मृत्यू झालेल्यांना मदत दिली जाणार असून त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्राचे बंधन घातले आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून कोरोना मृतांच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली होती. कोरोना झाल्यापासून 30 दिवसांत संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्‍तीच्या मृत्यू प्रमाणपत्रावर त्यासंबंधीची नोंद असावी. त्या रुग्णाची कोरोनासंबंधीची चाचणी होणे आवश्‍यक आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतरही मृत्यू प्रमाणपत्रावर त्याची नोंद नसल्यास त्या रुग्णाचे नातेवाईक जिल्हा शल्य चिकित्सकांकडे स्वतंत्रपणे अर्ज करू शकतील. जिल्हा व महापालिका स्तरावरील तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून त्यांचे प्रश्‍न सोडविले जाणार आहेत. राज्य सरकारने विकसित केलेल्या स्वतंत्र वेबसाईटच्या माध्यमातून मदतीसंबंधीचे अर्ज करता येणार आहेत. वेबसाईट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून काही दिवसांत त्याचे काम पूर्ण होणार आहे. पुढील आठवड्यापासून मदतीसाठी नातेवाइकांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज केल्यांनतर सात दिवसांत मदत संबंधित नातेवाईकाच्या बॅंक खात्यात वर्ग केली जाणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना ही मदत मिळणार आहे.

    Post Views:  226


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व