अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अकोला जिल्ह्याचा डंका


 संजय देशमुख  10 Dec 2021, 5:00 PM
   

नाशिक : ९४ वे अ.भा. मराठी साहित्य  संमेलन प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. अडगाव नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये साकारलेल्या कुसुमाग्रज साहित्य नगरीमध्ये साहित्य संमेलनाचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते. साहित्य संमेलनाचे दीप प्रज्वलन करून विश्वास पाटील व ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी उदघाटन केले यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, बडोद्याच्या राजमाता शुंभांगिनी राजे गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी साहित्य महामंडळावर सदस्य असलेले अकोल्याचे डॉ. गजानन नारे यांची मंचावर उपस्थिती होती. तीन दिवस झालेल्या या साहित्यिक कुंभमेळ्यात देशभरातील मराठी साहित्यिकांची मांदियाळी होती. या साहित्य संमेलनामध्ये अकोलेकर साहित्यिकांनी संमेलनातील विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये उस्फूर्त सहभाग घेऊन अकोला जिल्ह्याची मान उंचावली. 
निमंत्रितांचे कविसंमेलन : निमंत्रितांच्या कवी संमेलनात जिल्ह्यातील कवींनी दमदार रचना सादर करून ग्रामीण भागातील वास्तविकता मांडली. अकोल्याचे दिव्यांग कवी गजानन मानकर यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या अवस्थेची विदारकता विशद केली. 
कोनी म्हनते हिरवा अनु कोनी म्हनते भगवा...
अबे, मानसं मरून राह्यले पहाले त्याईले जगवा!
या किशोर बळींच्या ओळींनी संमेलन उंचीवर नेले. युवा कवी प्रविण जगन्नाथ बोपुलकर यांच्या
मीठ टाकुन पुरोली, त्या मिठाले जागली, 
बापाच्या भरोश्याची, आन ठुनीनं ठेवली
या ठुनी कवितेतील ओळींनी रसिकांची दाद मिळवली. प्रसिद्ध कवी श्रीधर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी संजय चौधरी यांनी केले. 
गझल मुशायरा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गझल मुशायऱ्याचे सत्र विशेष गाजले. रसिकांनी दोन्ही दिवस सर्व सत्रांना हाऊसफुल उपस्थिती दर्शवली. रसिकांचा गझल मुशायऱ्याला मिळणारा प्रतिसाद पाहता सभागृह छोटे पडले. निलेश कवडे यांच्या
तेव्हा एकाही दगडाला, त्यांनी पुजले नाही
हे मोठे ऋण विज्ञानावर, अश्मयुगाचे आहे…
या शेराचे रसिकांनी विशेष कौतुक केले. एक शास्त्रज्ञ संमेलनाध्यक्ष असलेल्या साहित्य संमेलनांमधील गझल मुशायऱ्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या गझल सादर झाल्या हे विशेष म्हणावे लागेल. अकोल्यातील गझलकार निलेश कवडे, अमोल सिरसाट, अविनाश येलकर, सतिश दराडे, दिगंबर खडसे, चंद्रकांत महाजन, अजित सपकाळ, अश्विनी बोंडे, मूळचे अकोल्याचे रुपेश देशमुख यांनी दमदार गझल सादर करून रसिकांची दाद मिळवली. 
कविकट्टा : कवी कट्टा मध्ये अकोला जिल्ह्यातील विलास ठोसर, प्रा.महादेव लुले, अजय इंगळे, प्रा. मोहन काळे, नंदकिशोर पोटदुखे, प्रियंका गिरी, अनुराधा दाणी, सुनील दिवनाले, संदीप देशमुख , सतिश वाडेकर, नूतन देशपांडे चारुदत्त मेहरे यांच्यासह काही साहित्यिकांचा समावेश होता. प्रा. महादेव लुले यांच्या
दाना पिकन मोत्याचा सुटे उपास जात्याचा 
घास भरून जगाले इझीलं भुकीचे डोंब...
या ओळींना रसिकांची वाहवा मिळाली. जिल्ह्यातील बहुतांश साहित्यिकांनी कवी कट्ट्यावर दमदार वऱ्हाडी रचना सादर केल्या. यावेळी कवी कट्ट्यावर वृत्तबद्ध कवितेतही जिल्हा मागे नसल्याचे दिसले.
पुष्पराज गावंडे आणि डॉ. रावसाहेब काळे यांचा विशेष सन्मान : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी अकोल्यातील जेष्ठ कादंबरीकार पुष्पराज गावंडे (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई) आणि बोलीभाषा अभ्यासक डॉ. प्रा. रावसाहेब काळे (सदस्य राज्य मराठी विकास संस्था नियामक मंडळ मुंबई) यांचा विशेष सन्मान विचारपीठावर केला. या दोघांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन कवी कट्ट्यामध्ये सहभागी कवींचा या गौरविण्यात आले. प्रा. सदाशिव शेळके (राज्य सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तथा जिल्हाध्यक्ष समता परिषद अकोला) यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांचा संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील साहित्यिकांच्या वतीने सत्कार केला.
विदर्भ साहित्य संघाचा वैदर्भी स्टॉल : विदर्भातील वैशिष्ट्ये व दिवंगत साहित्यिकांची माहिती वैदर्भी या विशेष दालनाच्या माध्यमातून साहित्य रसिकांना देण्यात आली. डॉ. गजानन नारे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर माहिती तयार करण्यात आली होती. नंदकिशोर चिपडे यांच्या कॅलिग्राफीने सजलेले विदर्भ साहित्य संघ अकोलाचे हे दालन साहित्य संमेलनामध्ये विशेष लक्षवेधी ठरले. विदर्भ साहित्य संघ अकोला चे बहुतांश पदाधिकारी आणि सदस्य संमेलनाला आवर्जून उपस्थित होते. 
शिक्षक साहित्यिक : साहित्य संमेलनामध्ये अकोला जिल्ह्यातील अनेक शिक्षक साहित्यिकांचा लक्षवेधी सहभाग होता. किशोर बळी, निलेश कवडे, अमोल सिरसाट, सतिश दराडे, प्रा. मोहन काळे, नंदकिशोर पोटदुखे, प्रियंका गिरी, दिगंबर खडसे, चंद्रकांत महाजन, अजित सपकाळ , अश्विनी बोंडे, अनुराधा दाणी, सुनील दिवनाले, नूतन देशपांडे, सतिश वाडेकर ही शिक्षक मंडळी संमेलनामध्ये सहभागी झाली होती. 
वऱ्हाडी साहित्य मंच : अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाच्या चिरांगन या दिवाळी अंकाचे अनेक नामवंत साहित्यिकांनी कौतुक केले. वऱ्हाडी साहित्य मंचाचे पुष्पराज गावंडे, प्रा. सदाशिव शेळके, डॉ. रावसाहेब काळे, निलेश कवडे, महादेव लुले, निलेश देवकर, प्रा.मोहन काळे, अजय इंगळे रविंद्र दळवी यांनी संमेलनात सहभाग घेतला. 
गाडगे बाबांच्या शिल्पाकृती सोबत फोटो काढण्याची साहित्यिकांमध्ये क्रेझ : कुसुमाग्रज साहित्य नगरीत असलेल्या संत गाडगे बाबांच्या शिल्पाकृती सोबत फोटो काढण्याची साहित्यिकांमध्ये विशेष क्रेझ होती.  ९४ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात जिल्ह्यातील साहित्यिकांसह अनेक रसिकांची आवर्जून उपस्थित होती.

    Post Views:  370


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व