सूर्यनमस्कार अडकला वादाच्या भोवर्यात; केंद्रीय आदेशाचा केला निषेध
मुस्लिम मुला-मुलींनी सूर्यनमस्कार करू नये!
नवी दिल्ली ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळांमध्ये 1 ते 7 जानेवारी दरम्यान सूर्यनमस्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने विरोध केला आहे. शाळांमध्ये असे कार्यक्रम घेऊ नयेत, अशी मागणीही बोर्डाच्या वतीने करण्यात आली आहे. मुस्लिम मुला-मुलींनी सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारत सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाळांमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले आहेत. 30 राज्यांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 1 ते 7 जानेवारी 2022 दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचना आहेत, तर 26 जानेवारी रोजी सूर्यनमस्कारावर आधारित संगीत कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात 30 हजार शाळांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आंध्र प्रदेशच्या सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात तसे आदेश येऊन धडकले आहेत, असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने आपल्या पत्रात म्हटले आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे महासचिव हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी या निर्णयावर आक्षेप घेताना म्हटले आहे की, भारत एक धर्मनिरपेक्ष, बहुधार्मिक आणि बहु-सांस्कृतिक देश आहे. यावर आधारितच आपली राज्यघटना लिहिण्यात आली आहे. कोणत्याही सरकारी शिक्षण संस्थेमध्ये धर्माबाबत शिक्षण द्यायला किंवा कोणत्या एका विशेष समूहाच्या मान्यतेच्या आधारावर कार्यक्रमाचे आयोजन करायला, आपली राज्यघटना परवानगी देत नाही. सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करणे दुर्दैवी घटना असून, सध्याचे सरकार राज्यघटनेच्या मूळ उद्देशापासून भटकत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. शिवाय मुस्लिम मुला-मुलींनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
बेरोजगारी, महागाईकडे लक्ष द्या
सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करणे हे घटनाविरोधी कृत्य आहे. देशप्रेमाचा खोटा प्रचार आहे. सूर्यनमस्कार हा सूर्याच्या पूजेचा एक प्रकार आहे. मुस्लिम किंवा इतर अल्पसंख्याक ना सूर्याला देव मानतात ना त्याची उपासना, पूजा करतात. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेत धर्मनिरपेक्षता मूल्याचा सन्मान करावा, असे आवाहन केले आहे. शिवाय देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी राष्ट्रगीत म्हणावे, असे आवाहन केले आहे. देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, रुपयाचे अवमूल्यन, देशाच्या सीमेचे रक्षण याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहन हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी केले आहे.
काय म्हटले आहे पत्रकात...
सूर्य नमस्कार हा सूर्याच्या पूजेचा प्रकार असून, इस्लाममध्ये याला परवानगी नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत आयोजित सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू नयेत, असे पत्रक बोर्डाने काढले आहे. सूर्यनमस्कार कार्यक्रम असंविधानिक कृत्य असून, देशप्रेमाचा खोटा प्रचार आहे. सूर्यनमस्कार हा सूर्याच्या पूजेचा एक भाग आहे. पण, इस्लाम आणि देशातील इतर अल्पसंख्यांक सूर्याला देव मानत नाहीत आणि त्याची उपासनाही करत नाहीत.
Post Views: 232