पत्रकारांनी आदर्श प्रस्थापित करुन राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान द्यावे : विजय खरात


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  10 Dec 2022, 8:26 PM
   

मुंबई :  पत्रकारिता केवळ व्यवसाय नाही, तर ते एक व्रत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारांचे योगदान फार मोठे आहे. गोपाळ आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ आंबेडकर यांनी केवळ बातम्या देण्यासाठी वृत्तपत्रे काढली नाही; तर निद्रिस्त समाजमनाला जागृत करून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पत्रकारिता केली. त्यांचे कार्य डोळ्यांपुढे ठेवून बदलत्या युगात पत्रकारांनी आदर्श प्रस्थापित करून राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सहायक पोलीस महानिरीक्षक व दक्षता या मासिकाचे संपादक विजय खरात यांनी केले. 

जर्नालिस्ट असोसिएशन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षता या मासिकाच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी नवनिवार्चित संपादक विजय खरात यांचे असोसिएशनच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पत्रकारांनी निर्भीड असायला हवे, तरच ती निर्भीडता, सत्यता त्यांच्या वृत्तांकनात दिसते, असेही खरात यांनी सांगितले. 
पत्रकारांनी मूल्याधिष्ठित पत्रकारिता करावी तसेच शाश्वत जीवनमूल्ये जोपासावी, अशी अपेक्षावजा सूचना असोसिएशनच्या अध्यक्षा व ज्येष्ठ माध्यमकर्मी अधिवक्त्या स्मिता चिपळूणकर यांनी यावेळी बोलताना केली. पत्रकारितेसाठी ज्ञान, समजूतदारपणा व बुद्धिमत्ता आवश्यक आहे असे नमूद करून आपण प्रथम भारतीय आहोत ही भावना रुजविल्यास राष्ट्रीयतेची भावना वाढेल असे मत असोसिएशनचे सदस्य अरुण उपाध्याय व्यक्त केले. 
भारतीय राज्यघटनेचे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः हाडाचे पत्रकार होते. समाजात काम करताना त्यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवावा, असे मत सदस्य हेमंत रणपिसे यांनी व्यक्त केले, तर समाजातील जातीयवाद समाप्त होण्याच्या दृष्टीने सर्व पत्रकारांनी स्वतः:हून  प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा रणपिसे यांनी यावेळी व्यक्त केली. या छोटेखानी कार्यक्रमात सदस्य व स्प्राऊट्स या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक उन्मेष गुजराथी, गल्ली न्यूज या वेबपोर्टलचे संपादक सलीम शेख यांसह असंख्य असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.  

    Post Views:  230


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व