ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल? नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची चर्चा


 Sanjay M. Deshmukh  2021-11-24
   

मुंबई, 24 नोव्हेंबर : महाराष्ट्रात असलेल्या ठाकरे सरकारमध्ये येत्या काळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या फेरबदलात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस नेते दिल्ली दौऱ्यावर जात असून दिल्लीत या संदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य विधानसभा अध्यक्षपद अद्यापही रिक्तच आहे. या पदावर कुणाची निवड करावी या संदर्भातही दिल्ली दौऱ्यात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येईल असंही बोललं जात आहे.

कोणाला मिळणार डच्चू आणि कोणाला संधी?

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यावर पक्षातील नेते नाराज असून त्यांचे खाते इतर कुणाला तरी दिले जाणार असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती. मात्र, याला कुणीही दुजोरा दिला नव्हता. याव्यतिरिक्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचंही नाव चर्चेत आहे. प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्रीपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागेवर नाना पटोले यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर एका राज्यमंत्रिपदावरही अदलाबदल होण्याची चर्चा होत आहे.

ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळेस बहुमताचा आकडा सिद्ध करताना महाविकास आघाडीकडे 172 आमदार होते. आता कोविड कालावधीत काँग्रेस पक्षाच्या एका आमदाराचे निधन झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे पंढरपूरची असलेली जागा भाजपाने जिंकत राष्ट्रवादीचा आमदार एक कमी झाला आहे.

तर भाजपची संख्या वाढली मात्र त्याच दरम्यान एका आमदाराचा पाठिंबा कमी झाला आहे. अपक्ष निवडून आलेल्या गीता जैन यांनी शिवसेनेला पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर होताना महाविकास आघाडीला सरकार स्थापन करताना जितकी संख्याबळ होतं तितकीच त्यांच्याकडे कायम राहीलं हे दाखवून आव्हान असणार आहे.

    Post Views:  177


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख