सुरेश पाचकवडे यांची कविता अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Aug 2023, 1:50 PM
अकोला : अकोलानगरीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक , कवी , कथाकार , समीक्षक सुरेश पाचकवडे यांच्या कधीतरी या काव्यसंग्रहातील जुने नाते या कवितेचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.कॉम. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. आजच्या आधुनिक युगात प्रत्येक माणूस पत्रलेखन , जुने गाणे , जुने दिवस , जुनी पुस्तके असं सारंच काही हरवत चालला आहे . या जुन्या गोष्टींना उजाळा देण्याचा प्रयत्न पाचकवडे यांनी आपल्या ह्या जुने नाते कवितेत केला आहे .
सुरेश पाचकवडे यांची सावली , वाटा मुकेपणाच्या , ग्रीष्मपर्व , गोंदणवेणा , कधीतरी , देहाक्षरं ही कथा , काव्याची पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. यापैकी त्यांच्या गोंदणवेणा या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्यस्तरीय वाङ्ममय पुरस्कार प्राप्त झालेला आहे . याशिवाय इतरही पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
सुरेश पाचकवडे हे विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाचे उपाध्यक्ष , अकोला जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य , लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सल्लागार , शिवचरण उज्जैनकर साहित्य प्रतिष्ठानचे राज्य सल्लागार , साद बहुउद्देशीय संस्थाचे कार्याध्यक्ष आणि शब्दगंधचे कार्यकारी संपादक आहेत .
शुभम बाल साहित्य संमेलन , अंकुर मराठी साहित्य संमेलन , सृजन साहित्य संमेलन , कलाविष्कार साहित्य संमेलन या राज्यस्तरीय साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत दिवाळी अंकात त्यांच्या कथा , कविता दरवर्षी प्रकाशित होत असतात . अनेक नवोदितांच्या साहित्याला त्यांनी प्रस्तावना , पाठराखण दिलेल्या असून नवोदित साहित्यिकाला ते नेहमीच मार्गदर्शन करीत असतात .
Post Views: 490