तिन बँकबुडव्यांचे गुजरातमधून पलायन; बँकांमधील गरीबांच्या सोन्यांचे मात्र लिलाव!
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2022-02-17
ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणत साप... साप करून फरकांड्यावर रट्टे मारत लोकांना स्वप्ननगरीची सैर घडविणार्या जादुई सरकारच्या काळात आणखी तिन बँकबुडवे देशातून पळून गेलेले आहेत. विशेष म्हणजे ते दुष्कर्मीही गुजरातमधलेच आहेत. चार वर्षापूर्वीच अहमदाबादच्या वसूली न्यायालयाने वसूलीसाठी संपत्ती जप्तीचे आदेश दिल्यानंतरही या आर्थिक घोटाळेबाजांवर आणि त्याच्या शिपयार्ड कंपनीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. म्हणजे हेतूपुरस्सर मिळालेल्या दिरंगाईतील तिन वर्ष संरक्षणाच्या वरदहस्तानेच त्यांना सर्व गाशा गुंडाळून रचनाबध्द रितीने देशातूनच पळून जाऊ शकले. नव्हे, सत्तेतील गारूडी आणि चेलेचपाट्यांनी एकप्रकारे भरीव मदतच केली असा निष्कर्ष काढण्याईतपत हा संशयित घटनाक्रम दिसतो आहे.
देशातील सर्वसामान्यांच्या घामाचा पैसा बँकांमार्फत लूटून अगोदरच विजय मल्ल्या, निरव मोदी, ललित मोदी, मेहूल चोकशी परदेशात मजेत जीवन घालवित आहेत. त्यांच्या पैसा वसूलीच्या कामातही संशयास्पद संथपणा आहे. या लफड्यांमध्ये कोणतीही प्रगती नसतांनाच आता ए बी जी शिपयार्ड या जहाजबांधणी कंपनीचे ऋषी अग्रवाल,अश्विनी अग्रवाल आणि संथनम मुथुस्वामी या गुजरातच्या घोटाळेबाज कुपूत्रांनी पळून जाण्यासाठी खास वेळ मिळण्याच्या या संधीचे सोने करत देशातून पोबारा केला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर सुडबुध्दीने अपयशाची खापरे फोडत तेथील विरोधी पक्षाच्या सत्ताधार्यांना आणि त्यांच्या राज्यांना वारंवार बदनाम करण्याची एकही संधी न सोडणार्या मोदींच्या या गुजराथ राज्याला आता काय नाव द्यावे? अग्रवाल जोडी आणि संथनम मुथुस्वामी यांच्या शिपयार्ड कंपनीला मोदी तेथील मुख्यमंत्री असतांनाच त्यांच्याच सरकारने विशेष मर्जी दाखविली होती. 2007 साली 1.21 लाख वर्गमिटर जागा कवडीमोल दराने दान देऊन या कंपनीचे बस्तान बसविले होते. त्यापूर्वी वाजपेयी सरकारच्या काळात नौदलाचे मोठे कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला देण्यात आले.ही मंडळी पूर्वीपासून भाजपच्या मातब्बर नेत्यांच्या आसपास वावरत होती. या मधूर संबंधांमुळेच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मंत्री महोदय व विद्यमान पंतप्रधान यांच्या गुजरात व्हायब्रंट या राज्यशासनाच्या योजनेत मोदींच्या मांडीला मांडी लावून हजेरी लावणारा पावन भाग्यवान म्हणजे ऋषी अग्रवाल हा त्याचा खास परिचय आहे. एवढा मर्जीतला माणूस असल्यानेच तो पुढे मोदींच्या 2013 च्या दक्षिण कोरिया दौर्यातही त्यांच्यासोबत होता, अशीही माहिती आहे. यावरून मोदी आणि भाजपसोबत शिपयार्ड कंपनीच्या त्रिकुटाचे किती सख्य असावे याचा अंदाज येण्यासाठी हा भुतकालीन घटनाक्रम पुरेसा ठरतो. आपल्या पंतप्रधानांशी असलेले नामसाधर्म्य हा विषय एकदा बाजूला ठेऊ.परंतू एक विजय मल्ल्या वगळता मोदी नावाच्या व ईतर सार्या भगोड्या घोटाळेबाजांचं उगमस्थान गुजरातच कसं काय या विषयावर देशात वेळोवेळी विचारमंथन होतच आहे.
या बँक घोटाळ्यातील सर्व रक्कम वसूल करणार असे बँका म्हणत आहेत. परंतू मागे झालेल्या अपहारामधून किती रकमा परत मिळवता आल्यात यावर एक दृष्टीक्षेप जर टाकला तर आताही फार काही हाती लागेल असे दिसत नाही. शेवटी मोदींसह सर्व नेत्यांच्या भिमगर्जना म्हणजे बोलघेवड्यांचा बोलाचाच भात आणि त्याचीच कडी म्हणजे जनतेला सतत मुर्ख बनविण्याचा निर्ढावलेपणा आहे. एकीकडे या देशातील श्रमिक, शेतकरी, बेरोजगार, आणि सर्वसामान्न्य बिचारे दारिद्र्याच्या अंध:कारात अत्यंत वेदनामय जीवन जगत आहेत. आर्थिक विषमतेच्या भिषण दलदलीत सर्वसामान्न्यांचे जीवन कष्टमय असतांना त्यांच्याच घामाच्या पैशावर डल्ला मारणारे हे भामटे तथा सराईत बोके दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने वैभवशाली जीवन जगत आहेत. कोरोनाकाळातील बिनडोक निर्णयांनी सर्वसामान्न्यांच्या आयुष्यांचे लिलाव झालेले आहेत. नमस्ते ट्रम्प आणि सरकारे पाडण्याचे उपद्व्याप, राजकीय जुलूस आणि कार्यक्रमांच्या गर्दीने स्वत:च कोरोना संक्रमणास कारणीभूत असतांना ईतरांना लक्ष करण्याचा खोटेपणा करणार्या मोदी आणि त्यांच्या सरकारला या भामट्या चोरांवर नियंत्रण ठेवण्यात किंवा त्यांच्याकडील पैसा वसूल करण्यातही मोठे अपयश आलेले आहे.
कोरोना काळात सर्व उद्योग व्यवसाय बंद असतांना आपला उदरनिर्वाह आणि व्यवहारीक दिनक्रम भागविण्यासाठी सर्वसामान्न्यांनी बँकामध्ये गहाण ठेवलेले सोने त्यांना वेळेच्या आत सोडवता आले नाही. तेव्हा चोरट्यांना पळून जाण्यासाठी शिथीलता देणार्या ह्याच बँका देशातील अशा एक लाख लोकांच्या गहाण सोण्यांचा लिलाव करणार आहेत. घोटाळेबाजांना अभय देणारे राजकीय नेते सर्वसामान्न्यांच्या कष्टाचे हे सोणे वाचविण्यासाठी पुढे येऊन सामाजिक बांधिलकीचे पुण्यकर्म करणार आहेत का? या बेशर्मीच्या बजबजपूरीत याचे उत्तर हे नाहीच येणार. आपल्या हातावर तूरी देऊन अपहारकर्ते आरामात देश सोडून पळून जातात हे कसे काय शक्य आहे? या अशक्यतेचे शक्यतेत रूपांतर होण्याला कोण कारणीभूत आहे? याचाही तपास झाला पाहिजे, पण तो कोण करणार? देशातील गोरगरीबांचा कोट्यवधी रुपयांचा मलिदा घेऊन पळून जाणारे चोर ईडी, सिबीआय आणि अन्य तपासयंत्रणांच्या रडारवर कसे काय येत नाहीत? काय उठसुठ विरोधकांना ब्लॅकमेल करून त्यांना दाबून ठेवण्याकरीता ईडीचे घरगडी कार्यरत आहेत काय, आणि आमदार खासदार खरेदी करून त्यांना पोसण्यासाठी फायनान्सर म्हणून या बँकबुडव्यांचा उपयोग करून घेतला जातो आहे काय? तसे जर नसेल तर ईतरांवर आरोप करणार्या भाजपच्या बोलघेवड्या तोतर्यांना आपल्याच पक्षातील पापे,अनाचार कसे काय दिसत नाहीत. हा संपूर्ण देशासाठी आता अत्यंत चिंतनशील विषय झालेला आहे. देशाला आर्थिक अधोगतीकडे घेऊन जाणार्या या परिस्थितीबाबत जनजागृती होऊन परिवर्तनाची क्रांती जर लवकर घडली नाही तर या देशाचा पाकिस्तान आणि बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही.म्हणून देश वाचवायचा असेल तर जात, धर्म, पंथांच्या वादातून फाटफुटीचे राजकारण्यांना दुर ठेवले पाहिजे. देशाच्या आर्थिक विकासाला तिलांजली देऊन आणि हिन्दू हिन्दू करीत मुसलमान आणि पाकीस्तानची भीती दाखवित लोकांना मुर्ख बनविण्याचे राजकारण करणार्यांच्या खोट्या दुकानदार्या आता बंद केल्या पाहिजेत...!
संजय एम. देशमुख
मो. ९८८१३०४५४६
Post Views: 427