दीड महिना उलटला तरी अंतिम अहवाल बाकी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
अकोला जिल्ह्यात २८ डिसेंबर २०२१ रोजी अवकाळी पाऊस व गारपीटीने चार तालुक्यातील २५ हजार ९५० हेटरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तसा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र दीड महिन्यापासून रब्बी पिकांच्या नुकसानीचे अंतिम अहवाल रखडले असल्याने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
खरिप हंगामात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकरी गारद झाला असताना रब्बी हंगावर देखील अवकाळीने कोप केला आहे. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.याचा फटका गहू, हरभरा, तूर, कापूस आदी पिकांना बसला होता.रब्बी पिके जोमात असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. त्यामुळे खरिपात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी आधीच संकटात असतांना रब्बी पिकांवर देखील शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले. नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असला तरी यंत्रणेच्या उदासिनतेमुळे अंतिम अहवाल दीड महिन्यापासून रखडले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असून अंतिम अहवाल जाहीर करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
असे झाले होते नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका नुकसान हेक्टर
अकोला १२,५४५
बार्शीटाकळी १,०७४
मुर्तिजापूर २,६००
बाळापूर ९,५७१
पातूर १६०
एकूण २५,९५०
Post Views: 202