मोहल्ला क्लिनिंग : उड्डाण दुसरा टप्पा, हद्दवाढ भागात


नीलेश देव मित्र मंडळाच्या वतीने मोहल्ला क्लिनिंग अभियानाचा पुढील टप्पा
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Feb 2025, 3:54 PM
   

अकोला: नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबतच सामाजिक जाणीवेतून एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि नीलेश देव मित्र मंडळाच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोहल्ला क्लिनिंग अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाची सुरुवात १९ जानेवारी रोजी झाली असून, आता दुसरा टप्पा १६ फेब्रुवारी रोजी हद्दवाढ भागात राबविण्यात येणार आहे.
अकोल्याची स्वच्छतेकडे वाटचाल : कधीकाळी अकोला शहर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जात होते. नगराध्यक्ष विनयकुमार पाराशर यांच्या कार्यकाळात शहरातील स्वच्छता उल्लेखनीय होती. अनेक महापालिकांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अकोल्याचा अभ्यास करण्यासाठी येथे येत असत. मात्र, काळाच्या ओघात या ओळखीवर ग्रहण लागले असून, शहर दररोज हजारो टन कचरा आणि प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करत आहे.
हद्दवाढ भागातील स्वच्छता आणि स्मशानभूमींची अवस्था : हद्दवाढ भागात चार स्मशानभूमी आहेत, त्यापैकी खडकी येथील स्मशानभूमी व्यवस्थित आहे, परंतु उर्वरित तीन स्मशानभूमींची स्थिती अत्यंत दयनीय आहे. स्थानिक रहिवाशांना सहभागी करून खरप, गुढधी, आणि मलाकापूर भागातील स्मशानभूमींचे मोजमाप, अतिक्रमण आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांचा विकास आवश्यक आहे. सध्या या भागांमध्ये सात हद्दवाढ झाल्या असून स्वच्छतेची स्थिती अत्यंत बिकट आहे.
वाहतूक समस्या आणि दफनभूमीचा पर्याय : नवीन तापडिया नगर, खरप, डुंबेवाडी आणि पंचशील नगर येथे जाण्यासाठी मुख्य मार्ग म्हणून तापडिया उड्डाणपूल आहे, परंतु सध्या तो केवळ दुचाकींसाठी खुला आहे. या भागातील नागरिकांना दुःखद प्रसंगी उमरी स्मशानभूमीपर्यंत मोठा प्रवास करावा लागतो. जर खरप येथील स्मशानभूमी व्यवस्थित विकसित केली असती आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग घेतला असता, तर हा पर्याय अधिक सोयीस्कर ठरला असता. त्यामुळे मोहल्ला क्लिनिंग अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
आवाहन : मोहल्ला क्लिनिंग अभियानात पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी सहभागी व्हावे आणि शहराच्या स्वच्छतेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन नीलेश देव मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते नीलेश देव यांनी केले आहे.

    Post Views:  75


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व