संसद भवनात शिवसेनाप्रमुखांचे चित्र लावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
25 Jul 2022, 9:12 PM
नवी दिल्ली - राजधानीतील नवीन संसद भवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र लावावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृतरीत्या विनंती करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सदनाच्या परिसरात पुतळा बसविण्याचा निर्णय झाल्यास डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांच्या आसपास, दर्शनी भागात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, अशाही हालचाली आहेत. कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनाच्या लॉबी भागात राजर्षी शाहू महाराज, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे सध्या आहेत. बाळासाहेबांचा पुतळा सदनात उभारावा याबाबतचे निवेदन शिंदे गटाच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांचेही छायाचित्र लावण्यात यावे, यासंदर्भात आपण स्वत: आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देणार आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले.
या मागणीबाबत पंतप्रधान सकारात्मक निर्णय घेतील, असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नवीन संसद भवनातील ‘राज्यघटना कक्षा‘मध्ये सध्याच्या सेंट्रल हॉलच्या धर्तीवर महापुरुषांची छायाचित्रे लावली जाणार का, याबाबतचा कोणताही निर्णय पंतप्रधानांनी अद्याप घेतलेला नाही. महाराष्ट्र सरकारकडून होणार्या या मागणीनंतर याबाबतची चर्चा सुरू होण्याची चिन्हे आहेत. नवीन संसद भवनाचे काम अभूतपूर्व वेगाने सुरू असून, याच वर्षीचे हिवाळी अधिवेशन नवीन संसदेत भरविण्याचा निर्धार मोदी सरकारने व्यक्त केला आहे. मात्र या इमारतीची भव्यता, आतील बारीकसारीक कामे व सध्याची कामाची प्रगती पाहता नवीन संसदेत प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याचा हा ‘मुहूर्त’ पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंतही लांबू शकतो अशीही सचिवालय परिसरातील चर्चा आहे.
Post Views: 209