एक सही विश्वासाची अभियान निलेश देव मित्र मंडळ राबविणार उपक्रम
संजय एम. देशमुख
2023-07-19
अकोला- उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वास व्यक्त करण्यासाठी व अकोल्यातील मुलभुत सोयी सुविधांची पुनर्स्थापना करण्यासाठी निलेश देव मित्र मंडळ एक सही विश्वासाची अभियान राबविणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील मुलभूत सोयीसुविधांची निर्मिती आणि त्याच बरोबर त्यांचे लोकहितासाठी नवीनीकरण यासाठी हे अभियान राबविले जाणार आहे. लोकांनी लोकांसाठी चालविलेल्या लोकशाहीत लोकांचा आवाज, समस्या, अडचणी शासनापर्यंत, पालकमंत्र्यांपर्यत पोहचविण्यासाठी हे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती निलेश देव यांनी दिली आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून महापालिका निवडणूकीत भाजपाला अकोलेकरांना भरघोस मते दिले, नगरसेवक दिले. त्याच लोकांच्या विश्वासाच्या आधारावर भाजपाची बहुमताची ४८ नगरसेवकांची सत्ता आली होती. पण, भाजपाच्या तत्कालिन नेत्यांच्या ढिसाळ कारभारामुळे लोकांची घोर निराशा झाली. अकोलेकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात अकोल्यातील भारतीय जनता पार्टी अपयशी ठरली. खड्डे मुक्त अकोल्याचे संकल्पना लयास जात वास्तविकतेत खड्डे युक्त अकोला झाले. पावसाळ्यात सिमेंट असो की डांबरी रस्ता निकृष्ट दर्जाच्या कामाने उघडे पडले. त्याची गुणवत्ता खड्ड्यांवरुन समोर येते. भुमिगतचा योजनाचा पहिला टप्पा झाला पण, दूसरा टप्पा जो पर्यंत होत नाही तो पर्यंत पहिल्या टप्पा उपयोगी पडणार नाही. गेल्या पाच वर्षात अमृत जलवाहिनीचे काम पुर्णत्वास गेले नाही. अमृत योजनेत जलवाहिनी टाकून देखील आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतो. नव्या नाल्याची निर्मिती नाही, नाले सफाई नाही, नव्या घंटा गाड्या नाहीत, मोकाट कुत्र्यांच्या डुक्करांना नागरीकांना त्रास आहे, अकोला शहर डास पैदास केंद्र झाले असून ठिकठिकाणी गटार आणि तुंबलेले पाणी ही मोठी समस्या आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुलभूत सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आधारावरच भाजपाला मतदान झाले. भारतीय जनता पार्टी बहुमताने सत्तेत आली आणि इथेच अकोलेकरांचा घात झाला. देवेंद्र फडणवीस आज ही पालकमंत्री आहेत. ते शहरात मुलभुत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजना करु शकतात. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अकोलेकरांचा पुन्हा विश्वास व्यक्त करण्यासाठी एक सही विश्वासाची या माध्यमातून अकोलेकर त्यांच्यापर्यंत पोहचणार आहेत. सोमवार २४ जुलै पासून अकोला शहरातील प्रमुख चौकात एक सही विश्वासाचा हे अभियान राबविले जाणार आहे. पुन्हा एकदा अकोल्याच्या मुलभूत सोयीसुविधांसाठी थेट राज्यातील सत्तेकडे मागणी निलेश देव मित्र मंडळ करणार आहे. अकोलेकरांनी या अभियानात मोठ्या संख्येत सहभाग नोंदवित आपल्या हक्कासाठी लढण्याची गरज निलेश देव यांनी व्यक्त केली आहे.
Post Views: 160