KDCC Bank Election Result : कोल्हापूर जिल्हा बँकेवर सतेज पाटील हसन मुश्रीफ यांचं वर्चस्व, संजय मंडलिक यांच्या आघाडीला 3 जागा


 Chief editor  07 Jan 2022, 7:59 PM
   


कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ( KDCC Bank Election Result) 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेची मतमोजणी पार पडली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेतील सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीनं निवडणूक झालेल्या 15 जागांपैकी 11 जागा मिळवल्या आहेत. राजेंद्र पाटील-यड्रावकर,राजू आवळे,विनय कोरे,सुधीर देसाई,संतोष पाटील,रणजितसिंह पाटील,भैया माने,स्मिता गवळी,निवेदिता माने,श्रुतिका काटकर,विजयसिंह माने हे विजयी झाले आहेत. बिनविरोधच्या 6 जागा आणि निवडणुकीतील 11 जागा अशा एकूण 17 जागांसह हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी बँकेवर वर्चस्व मिळवलंय. तर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला तीन जागा मिळाल्या तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

आरोग्य राज्यमंत्री विजयी
शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले आहेत. त्यांनी गणपतराव पाटील यांचा पराभव केला आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना 98 मत तर गणपतराव पाटील यांना 51 मतं मिळाली. शिरोळ तालुक्यात चुरशीच्या लढतीत अखेर यड्रावकर यांनी बाजी मारली तर माजी खासदार राजू शेट्टी यांना धक्का बसला आहे.


आजरा सेवा संस्था गटात धक्कादायक निकाल, विद्यमान संचालक पराभूत
आजरा सेवा संस्था गटात मोठा उलटफेर झाल्याचं निवडणूक निकालातून समोर आलं आहे. आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी झाले असून विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा त्यांनी पराभव केला आहे. सुधीर देसाई यांना 57 तर अशोक चराटी यांना 48 मतं मिळाली आहेत.

पन्हाळा तालुक्यातून विनय कोरे विजयी
पन्हाळा तालुका सेवा संस्था गटातून सत्ताधारी आघाडीचे आमदार विनय कोरे विजयी झाले आहेत. विनय कोरे यांनी शिवसेनेच्या विजयसिंह पाटील यांचा पराभव केला.

पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आवाडे पराभूत
पतसंस्था गटामध्ये सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे. सेना आमदार प्रकाश अबिटकर यांचे बंधू अर्जुन अबिटकर यांनी आमदार प्रकाश आवडे यांना पराभूत केलं.

शेती संस्था व व्यक्ती सभासद गटात भैय्या माने विजयी
शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून सत्ताधारी गटाचे भैया माने विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी आघाडीच्या क्रांतिसिंह पाटील यांचा पराभव केला. भैय्या माने यांना 2266 तर पाटील यांनी 1655 मतं मिळाली. 611 मताधिक्य घेत भैय्या माने विजयी झाले.

15 पैकी 11 जागा सत्ताधारी आघाडीला
कोल्हापूर जिल्हा बँकेतील सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीनं निवडणूक झालेल्या 15 जागांपैकी 11 जागा मिळवल्या आहेत. राजेंद्र पाटील-यड्रावकर,राजू आवळे,विनय कोरे,सुधीर देसाई,संतोष पाटील,रणजितसिंह पाटील,भैया माने,स्मिता गवळी,निवेदिता माने,श्रुतिका काटकर,विजयसिंह माने हे विजयी झाले आहेत. बिनविरोधच्या 6 जागा आणि निवडणुकीतील 11 जागा अशा एकूण 17 जागांसह हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी बँकेवर वर्चस्व मिळवलंय.

राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडीला तीन जागा
शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला तीन जागांवर विजय मिळाला. राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडीकडून संजय मंडलिक,बाबासाहेब पाटील, अर्जुन आबिटकर विजयी झाले. तर, अपक्ष उमेदवार रणवीरसिंग गायकवाड देखील विजयी झाले आहेत.

6 जागा बिनविरोध
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 15 जागांसाठी मतदान झाले आहे. तर, 6 जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन.पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक आणि ए. वाय. पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राज्याच्या सत्तेतील पक्ष कोल्हापूरमध्ये आमने सामने
राज्यात सत्तेत असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या ( KDCC Bank Election) निमित्तानं एकमेकांसमोर उभे ठाकले होते. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस, (Cognress) राष्ट्रवादी, (NCP) भाजप (BJP) ताराराणी आघाडीच्यावतीनं पॅनेल उभ करण्यात आलं. तर, शिवसेनेनं (Shivsena) देखील शेकापच्या साथीनं पॅनेल उभं केलं होतं.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विरुद्ध शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी यांच्यात ही निवडणूक झाली.


    Post Views:  187


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व