डॉ विशाल कोरडे यांची मतदार साक्षरता अभियानाकरिता ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती
अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे सहाय्यक प्राध्यापक डॉ.विशाल कोरडे यांची अकोला जिल्हा मतदार साक्षरता अभियानाकरिता ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार यांच्या द्वारा करण्यात आली आहे . मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा डॉ.विशाल कोरडे यांची मतदार साक्षरता अभियानासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती . डॉ. कोरडे यांनी अकोल्यातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अकोला जिल्ह्यात सर्वत्र फिरून मतदार साक्षरता अभियान राबवले होते . तत्कालीन निवडणुकीत दिव्यांग बांधवांचे सर्वाधिक मतदान झाल्याने महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान अकोला जिल्ह्याला प्राप्त झाला होता . २०२४ चा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी डॉ. कोरडे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मतदान साक्षरता अभियान राबवणार आहेत . विशेषता दिव्यांग मतदारांना त्यांच्या अडचणीवर मात करून मतदान सुलभ व्हावे यासाठी डॉ.कोरडे कार्य करणार आहेत . अंध मतदारांना ब्रेल लिपीच्या साह्याने मतदान कसे करायचे ? याविषयी जनजागृती केली जाणार आहे . निवडणूक प्रक्रिया व राजकीय पक्षाबाबत जनतेच्या मनात अनास्था असल्याचे डॉ कोरडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले त्याकरिता डॉ.कोरडे विविध सामाजिक उपक्रम राबवून मतदार जनजागृती करणार आहेत . लोकशाही बळकट करण्यासाठी , राष्ट्राच्या प्रगतीसाठी , स्वराज्याचे सुराज्य व्हावे व राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सर्व नव मतदार , दिव्यांग मतदार , महिला मतदार व ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करावे . ज्या दिव्यांगांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाणे व मतदानासाठी मदतनीस हवा आहे अशा दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर आपले नाव नोंदवावे असे आव्हान डॉ.विशाल कोरडे यांनी केले आहे .
Post Views: 260