जुण्या अनुभवातून नवे परिवर्तन हेच नव्या वर्षाचे स्वागत! : संजय एम. देशमुख
२०२१ ला निरोप देऊन आम्ही दोन दिवसांनी दिनदर्शिका वर्षातील २०२२ मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहोत. हिंदु संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरूवात होते. तेच वर्ष हिंदूनी संमत केलेले असले तरी राष्ट्रीय आणि जागतिक व्यवहारांच्या सिमारेषेत जानेवारी महिन्याचा प्रारंभ हे नविन वर्ष रुढ झालेले आहे. देशात आर्थिक व्यवहार वर्षाची मार्च ही अखेर आणि एप्रिल शुभारंभ मानण्यात येतो.
कॅलेंडरची पाने उलटावित त्याप्रमाणे मनुष्याचा आयुष्याचा एक-एक दिवस, प्रत्येक महिना आणि वर्ष मागे पडत जातात, नव्याची सुरूवात होत राहते. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्याप्रमाणे येणार्या बदलांना स्विकारीत मागील अनुभवांना गुरूस्थानी ठेवित पुढील जीवनात सुलभ वाटचालीचे नियोजन कसे करावे याचे सर्वात मोठे आणि बहूमोल मार्गदर्शनाचे काम मागील अनुभव करीत असतात. जीवनाला योग्य दिशा देणारे अनुभव हा माणसाला जीवनात लाभलेला बहूमोल उपहार असतो. म्हणून म्हणतात “झाले, गेले विसरा नव्याची कांस धरा” दुर्लभ मनुष्यजीवनाचा अभ्यास करून त्यामागील उद्देशांना आणि त्यानुसार पार पाडावयाच्या कर्म - कर्तव्यांना ओळखून मनुष्याने जीवनाचे खरे मुल्य ओळखले पाहिजे. हिच शिकवण मानवी जीवनमुल्यांचा उद्घोष करणार्या तत्ववेत्त्यांनी, साधु, संत, सत्पुरूषांनी आम्हाला अधिकारवाणीने देण्याचे प्रयत्न वेळोवेळी केलेले आहेत. त्यांनीही “तुझे आहे तुजपाशी परी तू जागा विसरलाशी” हे संदेश देऊन रस्ता चुकविलेल्या जीवनरथांना सरळ मार्गावर आणण्याचे लोककल्याणकारी कार्य केलेले आहे. म्हणून ते आमच्यासाठी लोकोत्तर महापुरूष ठरलेले आहेत. परंतू हे सर्व सांगत असताना त्यांनी जीवनात क्षणोक्षणीच्या सावधानतेला केंद्रस्थानी ठेऊन मनुष्याचे अभ्यासी जीवन हिच त्याची जीवनगीता ठरविलेली आहे. तो अमुल्य विचारांचा ठेवा स्विकारून जीवन अधिक आनंदी, समाधानी, उदात्त आणि महन्मंगल कसे बनवावे याचा मनुष्याला विसर पडलेला असल्याने, त्याने स्वतःच स्वतःचे जीवन समस्याग्रस्त करून ठेवलेले आहे.
मावळत्या २०२१ ला निरोप देताना ही उजळणी करण्याचा उद्देश एवढाच की, निदान २०२१ मध्ये मनुष्याला जो विकास करता आलेला नाही, जे उद्देश साध्य करता आलेले नाहीत, पर्यायाने व्यापक यशाच्या जवळ जाता आलेले नाही, त्याचा अभ्यास व्हावा. त्याची कारणे शोधून, उणीवा समजून घेऊन आपल्याच जीवनगीतेचे आपणच पारायण करावे. त्या जाणीवेने मागील प्रसंग, घटना, वृत्ती, प्रवृत्तीच्या स्वभावधर्माने केलेले अधर्म, त्यामुळे स्विकारावे लागलेले क्लेशदायक प्रसंग, अपयश हे लक्षात घ्यावे. दुसर्यांना दोष देण्याऐवजी आपल्यामुळेच कसे घडत गेले याचा बोध आपल्या जीवनगीतेतून घ्यावा. २०२२ च्या नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवतांना हे स्मरण आवश्यक ठरते.
२०२० आणि २०२१ मधील कोरोना संसर्गाच्या संकटाने मानवी समाजाला खूप काही शिकविले आहे. परंतू आलेल्या संकटांपुढे क्षणिक नमते घेण्याऐवजी पुढेही आपण तसेच वागणे हे यशस्वी आणि आनंदी जीवनाचे खरे रहस्य आहे, हे मनुष्य विसरत असतो. परत आपली, मस्ती, उन्माद आणि क्षणोक्षणी अनिष्ट प्रवृत्तींची गुलामगिरी स्विकारून, जीवनमुल्यांचे उल्लंघन करीत बेशीस्त, बेदरकार जीवन जगणे सुरू राहते. हे होऊ नये हे शहाणपण मनुष्याला केव्हा येणार? निदान जुण्या वर्षाला निरोप देताना तरी झाले गेले सोडून एक गुणी, ज्ञानी, कुटूंबवत्सल व समाजशील माणूस म्हणून जगण्याचा संकल्प मनुष्याने केला पाहिजे. तेच जुण्याला निरोप आणि नव्या वर्षाचे प्रामाणिक आणि नैतिक भावनांनी केलेले खरेखुरे स्वागत ठरू शकते. नव्या वर्षाच्या पूर्व संध्येला मावळत्या वर्षात काल अमरावतीत जीवनातल्या केवळ काही क्षणांच्या बेसावधगीरीने चार श्रमिक जीवांचा विजेच्या धक्क्याने तडफडत अंत झाला. ही विदर्भातील कमालीची दुःखद आणि विदारक व मन सुन्न करणारी घटना ठरली. म्हणून बेसावधतेने मनुष्याच्या जीवनाचे काय होऊ शकते हे लक्षात घेऊन जीवन जगण्याची वाटचाल असली पाहिजे. हे अनावधानाने झाले. परंतू दरवर्षी मावळत्या वर्षात आणि नव्या वर्षाच्या सुर्यास्तापूर्वी मद्यप्राशनाने अनमोल जीवनांची अखेर व अनेक कुटूंबे उध्वस्त झाल्याची उदाहरणे ३१ डिसेंबरच्या दिवसात आजपर्यंत घडलेली आहेत. ही अकाली संपविलेली आयुष्ये बेसावधगीरीने किंवा अनावधानाने नव्हे तर समजून उमजून बेदरकारपणे विनाशाकडे जाण्याच्या दुदैवी घटना होत्या.
मनुष्य कितीही नास्तिक असला तरी तो जसा मनातील भितीमुळे परमेश्वराला मानायला तयार होतो. त्याचप्रमाणे कोरोना या संसर्गजन्य संकटामुळे मागील वर्षापासून ३१ डिसेंबरवर अवकळा होती. म्हणून नाईलाजाने बाटल्या फोडण्याचा आनंद तरुणांना साजरा करता आलेला नाही. कोरोनाने जबरदस्तीने घरात बसविले, प्रतिबंधक उपाययोजनातून कायद्याची बंधनं पाळण्याची सक्ती होती. म्हणून का कू करत या पठ्ठ्यांना जबरीने घरात डांबल्या गेले. हा काळ त्यांना जेलपेक्षाही भयंकर वाटला. परंतू दरवर्षीसारखा अतिरेक न करता आपण स्वतःचे दंडक, शिस्त ठरवून गुण्या गोविंदाने रहावे. जीवनाला मातीमोल करू नये. कायद्याच्या आणि परमेश्वराच्या भितीपेक्षाही स्वतःचे अनुशासन हेच आपले अधिष्ठाण ठरवावे. हे संकल्प २०२२ चे स्वागत करताना करणे म्हणजे आगामी परिवर्तनाला सामोरे जाणारे आनंद मार्गावरील पाऊल ठरू शकते. हा क्रांतिकारी जीवनाचा मुलमंत्र युवापिढीसह सर्वांनी वेळीच लक्षात ठेवल्यानेच सुखी, समाधानी, आनंदी आणि वैभवशाली समाजाची पुर्नस्थापना होऊ शकते. नव्हे हेच प्रत्येकाच्या आयुष्यात उगवलेले नवे वर्ष असावे. गेल्या कालावधीचे सिंहावलोकन करताना नुसते कोरोना आणि नैसर्गिक संकटेच नवे तर प्रामाणिकता हरविलेल्या अनैतिक प्रवृत्तींच्या विनाशकारी वाटचालीनेही अनेक वाईट घटनांचे परिणाम समोर आणले. त्याचे परिणाम अनेक निरपराध्यांना भोगावे लागलेले आहेत. त्यामुळे जीवनातील सावधानता या मुलमंत्राचा यशाच्या मार्गाने विकासाकडे जाऊ इच्छिणार्या प्रत्येकाने गिरविला पाहिजे. हेच परिवर्तन २०२२ च्या आनंदी यशस्वी तथा सुरक्षित जीवनाचा मुख्य आधार ठरू शकते. मागील वर्षात विधायक आनंदायक घटना घडल्या तशाच परत - परत घडाव्यात, याकरीता सकारात्मक कर्म आणि प्रयत्नांची वाटचाल कायम करणे, आणि दुःष्कर्म करणार्यांना अद्दल घडवून हे राहू-केतू परत आपल्या कुंडलीत ठाण मांडून बसू नयेत म्हणून त्यांना सर्व शक्तीनीशी हाकलण्याकरीता समाजातील सामुहिक शक्तीने पुढे येणे हे २०२२ चे मनोहारी चित्र साकारल्या जावे, हा संकल्प हेच नव्या वर्षाचे स्वागत ठरावे!
संजय एम. देशमुख, मोबा.९८८१३०४५४६
Post Views: 313