वृत्तपत्रे, संपादक पत्रकारांच्या अन्यायाविरोधात राज्यात लढा उभारणार
शासनाने सहकार्य न केल्यास अमरण उपोषण करणार -किसन भाऊ हासे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Feb 2023, 12:11 PM
मुंबई : महाराष्ट्रातील छोटी वृत्तपत्रे, संपादक व पत्रकारांना अनेक अडचणींना तोंड देऊन खडतर वाटचाल करावी लागत आहे. कागद व मुद्रण साहित्याचे भडकलेले दर व प्रचंड महागाईने त्रस्त असतांना महाराष्ट्र सरकारचे छोटी वृत्तपत्रे व त्यांच्या संपादक पत्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था हजारो संपादक पत्रकारांची झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्यांतर्गत असणार्या मुदत संपलेल्या विविध समित्यांची पुर्नरचना करावी. अनावश्यक व जाचक अटी काढून टाकाव्यात. कृतीशील संपादक पत्रकारांना या समित्यांमध्ये सहभाग मिळावा यासाठी संपादक व पत्रकार सेवा संघ, मुंबई या संस्थेने वेळोवेळी शासनस्थरावर अनेक पत्रे, निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे.
माहिती व जनसंपर्क खात्याच्या महाराष्ट्र राज्य अधिस्विकृती समितीची पुर्नरचना करावी. राज्यातील नोंदणीकृत व निकषपात्र संस्थांच्या पदाधिकार्यांना सहभागाची संधी मिळावी म्हणून संपादक पत्रकार सेवा संघ संस्थेने तसेच प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या संस्थेने तपशिलवार निवेदने मुख्यमंत्री, महासंचालक यांना देऊन मागणी केली आहे. या मागणीचा गांभिर्याने विचार न होता नेहमीप्रमाणे ठराविक पात्र-अपात्र संस्थेच्या पदाधिकार्यांना सदस्यत्व देऊन शासकीय व अशासकीय सदस्यांची नविन अधिस्विकृती समिती जाहिर होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच किसन भाऊ हासे, अॅड. इलियास खान, मनोजकुमार आगे, राजाभाऊ कांदळकर नारायण पांचाळ यांनी तातडीने मुंबईत माहिती व जनसंपर्क सचिव व महासंचालक जयश्री भोज यांची भेट घेऊन नविन अधिस्विकृती समितीस स्थगिती द्यावी, अधिस्विकृती समितीची पुर्नरचना करावी, यासंबधिच्या अभ्यास समितीचा अहवाल जाहिर करावा, संपादक पत्रकारांच्या राज्यातील नोंदणीकृत व पात्र संस्थेंची यादी जाहिर करावी या मागण्यांचे निवेदन दिले. राज्यातील संपादक पत्रकारांच्या मागण्यांना योग्य न्याय मिळण्यासाठी शासनाने सकारात्मक भावनेने तातडीने सहकार्य करावे. संपादक पत्रकारांच्या मागण्यांना वेळोवेळी संपर्क करूनही सहकार्य न मिळाल्यास होणार्या अन्यायाविरोधात 20 मार्च 2023 पासून अमरण उपोषण करण्याचा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातीलप्रसारमाध्यम क्षेत्रातील काही व्यक्ती आपणच संपादक पत्रकारांचे तारणहार आहोत व आम्ही म्हणू तशीच समिती निर्माण करू. शासकीय अधिकारी फक्त आमचेच ऐकतात अशा बढाया मारतात व स्वार्थ साधतात. त्यामुळे अनेक संपादक पत्रकारांवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरूद्ध संपूर्ण राज्यात संघटित विचारांची समन्वयी लढाई करण्यासाठी नियमित वृत्तपत्रे प्रसिद्ध करणार्या संपादक पत्रकारांनी या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आहे. वृत्तपत्रे व संपादक पत्रकारांच्या अडचणींच्या, अन्यायाच्या बाबी दूर करण्यासाठी संपर्क साधावा तसेच शासनाने सहकार्य न केल्यास 20 मार्च 2023 रोजी सुरू होणार्या अमरण उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन किसन भाऊ हासे, अॅड. इलियास खान, नारायण पांचाळ, मनोज कुमार आगे, राजाभाऊ कांदळकर व समविचारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी केले आहे.
Post Views: 143