नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्या रीता यादव यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार गेला आहे. या हल्ल्यामध्ये रीता जखमी झाल्या आहेत. गोळी रीता यांच्या पायाला लागली आहे. रीता यांना जखमी अवस्थेत सीएचसी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन रीता यांना हायर सेंटरला पुढील उपचारांसाठी पाठवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाजवादी पार्टी सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झालेल्या रीता यादव या पोस्टर आणि बॅनर बनवण्याच्या कामानिमित्त सुलतानपूरमध्ये गेल्या होत्या.
काम संपवून सुलतानपूरमधून घरी येत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. लंभुआ परिसरामध्ये हायवेवर तीन जणांनी त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करुन समोर गाड्या आडव्या उभ्या करुन गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी रीता यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने गोळी रीता यांच्या पायावर लागली. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. आधी रीता यांना लंभुआमधील सीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना सुलतानपुर जिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
संतापलेल्या व्यक्तीने पायावर मारली गोळी
लंभुआचे डीएसपी सतीश चंद शुक्ला यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून रीता यांचा जबाब नोंदवला आहे. त्यांना फोनवरुन या प्रकरणाची माहिती देण्यात आल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. रीता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टर, बॅनर बनवण्याचं काम उरकून सुलतानपुरवरुन परत येत असताना लंभुआजवळ तिघांनी आमच्या गाडीला ओव्हरटेक केलं. बोलेरो गाडी थांबवून या तिघांनी शिवीगाळ करत गाडीतील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी चालकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेवलं. त्यानंतर मी पिस्तूल लावणाऱ्याच्या कानशीलात लगावली. तेव्हा संतापलेल्या त्या व्यक्तीने माझ्या पायावर गोळी मारली आणि ते हल्लेखोर तेथून फरार झाले.
रीता यादव यांनी मोदींना दाखवला होता काळा झेंडा
16 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वांचल एक्सप्रेस वेचं उद्घाटन करण्यासाठी सुलतानपूर जिल्ह्यामधील कूरेभारमधील अरवल कीरीमध्ये सभा घेत होते. त्यावेळी रीता यादव यांनी त्यांना काळा झेंडा दाखवला होता. पोलिसांनी रीता यांना ताब्यात घेतलं होतं. दोन दिवसांनंतर रीता यांना जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर एक महिना त्या समाजवादी पार्टीमध्ये होत्या. मात्र तिथे आपला आदर केला जात नाही असं कारण सांगून त्यांनी 17 डिसेंबर 2021 रोजी लखनऊमधील काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिषेक सिंह राणा यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Post Views: 184
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay