गौरी गणपती सणा पूर्वी 36 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता अदा करा
सेवानिवृत्त भाजपा सेलची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Sep 2026, 8:33 AM
अकोला : गौरी गणपती सणा पूर्वी सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांचा 36 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता अदा करून कर्मचाऱ्यांच्या सणाचा आनंद द्विगुणित करावा अशी मागणी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी भाजप सेल तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या सेलचे संयोजक सुनील जानोरकर, सहसंयोजक प्रदीप खाडे, सरचिटणीस राजेंद्र नेरकर, कोषाध्यक्ष अशोक मांगुळकर यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार, पालकमंत्री आकाश फुंडकर यांनाही सदर मागणीचे निवेदन सादर केले आहे.
शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने महागाई वाढ 17 टक्क्यांवरून वाढ करून 28 टक्के वाढीव दराने महागाई भत्त्याची रक्कम दि. 1 जुलै 2021 पासून प्रत्यक्ष अदा केलेली आहे. परंतु राष्ट्रीय आपत्ती कोविड कालावधीत शासनाचे आर्थिक स्त्रोत मंदावल्यामुळे केंद्र शासनाने वेळोवेळी मंजूर केलेली महागाई वाढ राज्य शासनामार्फत गोठविण्यात आली. ही महागाई भत्त्याची थकबाकी अद्यापही कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही.
परंतु आता महाराष्ट्र शासनाची आर्थिक स्थिती बळकट झाल्यामुळे केंद्र सरकारच्या धर्तीवर वेळोवेळी मंजूर केलेला महागाई भत्ता मंजूर करून महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या गौरी गणपती सणा पूर्वी ही रक्कम अदा करण्यात यावी अशी मागणी या सेलमार्फत करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात केवळ अकोला जिल्ह्यातच या सेल ची स्थापना झालेली असून आता महाराष्ट्रातील इतर जिल्हे सुद्धा या सेलच्या स्थापनेसाठी कार्यरत झाले आहेत.
Post Views: 6