ग्राहक पंचायती च्या कार्याचे रूपांतर लोक चळवळीत व्हावे - डॉ.नारायण मेहरे
*किशोर मुटे,हिंगणघाट
यवतमाळ : शोषण मुक्त समाज निर्मिती साठी ग्राहक पंचायतीच्या कार्याचे रूपांतर हे लोकचळवळीत झाले पाहिजे. त्यासाठी सर्व वर्गातील,सर्व स्तरातील अभ्यासू कार्यकर्ते या ग्राहक जाग्रणaच्या कामात सक्रीय पणे सहभागी व्हावेत यासाठी ग्राहक पंचायती च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अ. भा. ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ नारायण मेहरे यांनी येथे केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक, ग्राहक तीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता जिल्हा अभ्यास वर्गात ते बोलत होते. ग्राहक पंचायतीचे पश्चिम क्षेत्र संघटक नितीन काकडे, प्रांत सचिव डॉ चारुदत्त चौधरी, विदर्भ संघटक अभय खेडकर, वर्धा जिल्हा विद्युत ग्राहक आयोगाचे अविनाश प्रभुणे, प्रांत कार्यकारिणी सदस्य हितेश सेठ, प्रचार प्रमुख तुकाराम लुटे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनंत भिसे,डॉ. केशव चेटूले यावेळी मंचावर उपस्थित होते.
डॉ. मेहरे पुढे म्हणाले, ग्राहक समस्यांचे व ग्राहकांच्या सायबर फसवणुकीचे बदलते स्वरुप लक्षात घेवून ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांनी अद्यावत माहिती ठेवून ग्राहक प्रबोधनाचे काम अधिक जबाबदारीने करावे लागणार आहे.
क्षेत्र संघटक नितीन काकडे यांनी आपल्या भाषणात स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
वस्तूच्या एम आर पी च्या माध्यमातून ग्राहकाच्या होणार्या शोषणा बद्धल माहिती देवून या संदर्भात ग्राहक पंचायतीने सुरू केलेल्या आंदोलनाची माहिती सुद्धा श्री काकडे यांनी उपस्थितांना दिली.
प्रांत सचिव डॉ चारुदत्त चौधरी यांनी यावेळी बोलताना पर्यावरण रक्षणासाठी ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांनी सजगपणे कार्य करण्याचे आवाहन केले. प्रांत संघटक अभय काकडे यांनी गाव तेथे ग्राहक पंचायत हे स्व.बिंदुमाधव जोशी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण भागात ग्राहक चळवळ विस्तारित करण्याचे आवाहन केले.
वर्धा जिल्हा विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अविनाश प्रभुणे यांनी ग्राहक संरक्षण कायदा व विद्युत कायद्यातील ग्राहकांना उपयुक्त तरतुदी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. सर्वसामान्य नागरिकांना याची माहिती व्हावी यासाठी ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले. ग्राहक कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे सुद्धा त्यांनी यावेळी दिली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वामी विवेकानंद आणि स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संजय जोशी यांनी ग्राहक गीत सादर केले. प्रा.मतीन खान, हणमंत राजनलवार,प्रमोद बाजोरिया,चंद्रकांत गड्डमवार, प्रा.पी.एन देशमुख,दिलीप गुप्ता, प्रा.कमलाकर जूनघरे, रवी वाघमारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अनंत भिसे यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले. जिल्हा सचिव डॉ केशव चेटूले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
जिनेद्र बंगाले, संतोष डोमाळे,प्रवीण पाटील, विरेंद्र चौबे अँड राजेश पोहरे इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात यवतमाळसह वणी,पांढरकवडा,घाटंजी,आर्णी, कळंब,नेर ,दारव्हा,दिग्रस,पुसद,
उमरखेड इत्यादी तालुक्यातील ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Post Views: 15