संगमेश्वरला संभाजी महाराजांचे स्मारक छावा संघटनेतर्फे शासनाचे आभार
छावा संघटनेतर्फे छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
12 Mar 2025, 3:20 PM
अकोला - नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेचे छावा संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यात आले आहेत. संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सर्वानुमते शासनाचे आभार मानण्यात येऊन घोषणा केल्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक तातडीने पूर्ण करावे व खऱ्या अर्थाने महाराजांचा मानसन्मान करावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.
1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराजांना अटक करण्यात आली. 9 फेब्रुवारी 1689 रोजी राजाराम महाराजांचे मंचकारोहन करण्यात आले. 1 फेब्रुवारी ते 11 मार्च 1689 हा संभाजी महाराजांच्या जीवनातील चीर वेदनेचा प्रवास होता. शंभुराजांना अटक झाली त्या दिवसापासून त्यांना अनंत यातना देऊन 11 मार्च 1689 रोजी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यापूर्वी 17 फेब्रुवारी रोजी महाराजांचे डोळे काढण्यात आले. व दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सोबत असलेल्या कवी कलशांची जीभ उपटण्यात आली. एकाकी पडलेल्या, व अनपेक्षित संकटात सापडलेल्या असहाय शंभूराजांनी त्या विकराल स्थितीवरही मात करत मृत्यूलाही जिंकले व ते मृत्युंजय झाले. त्यांच्यासोबतच 11 मार्च रोजी कवी कलशांची ही हत्या करण्यात आली.
शंभूराजांचे स्मारक तयार होत असलेले संगमेश्वर हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव आहे. या तालुक्याचे मुख्यालय संगमेश्वर गावापासून 17 कि. मी. अंतरावर असलेल्या देवरुख येथे आहे. या गावातच संगमेश्वर तालुक्याचे पंचायत समिती कार्यालय आहे. संभाजी महाराजांच्या या आदरांजली व श्रद्धांजली कार्यक्रमात छावा चे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, ज्येष्ठ नेते अरविंद कपले, डॉ. संजय सरोदे, मनोहर मांगटे पाटील, आशु वानखडे पैलवान, अनिरुद्ध भाजीपाले, बबलू वसु, अमोल हिंगणे, दीपक बिहाडे, देवेंद्र मोहकार, गोपाल पाटकर, गोपाल मोरे, सचिन माकोडे, गणेश पारस्कर आदी उपस्थित होते.
Post Views: 56