कसबा विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाचा अन्वयार्थ : प्रा. सुभाष गादीया


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2023-03-03
   

Akola : प्रिंप्री चिंचवड विधानसभा मतदारसंघ कायम राखण्यात भाजपा यश आले असले तरी पुणे शहरातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. काॅंग्रेसचे उमेदवार  रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार  हेमंत रासने यांचा 11 हजार मतांनी पराभव केला आहे. कसबा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला होता. गेल्या 28 वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता. यावेळी भाजपाने सारी शक्ती पणाला लावूनही भाजपाचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. या शिवाय अनेक मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते प्रचारात व्यस्त होते. मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील फेरफटका मारून गेले. भाजपावर पैसे वाटपाचा देखील आरोप झाला आहे. 
शिवसेनेचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडून आले आहेत असा दावा भाजपाकडून वारंवार करण्यात येतो पण भाजपाचा गड असलेल्या कसबा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून भाजपाचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही यावरून भाजपाचा हा दावा फोल ठरला आहे. नेहमीप्रमाणे भाजपाने या निवडणुकीत हिंदू मुस्लिम धृवीकरण करण्याचा प्रयत्न केला पण या एकमेव भांडवलावर भाजपा निवडून येऊ शकत नाही. या मतदारसंघावर गेल्या 28 वर्षांपासून भाजपाचा ताबा आहे पण गेल्या 28 वर्षांत केलेल्या विकासकामांवर भाजपाला निवडणूक लढता येऊ नये ही शोकांतिका आहे. 
काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी समोर एकट्या भाजपाचा निभाव लागणे कठीण आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. या महाविकास आघाडी मध्ये अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी सहभागी झाली तर  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव अटळ आहे. उध्दव ठाकरे यांना शह देण्यासाठी भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत पाडलेली फूट भाजपासाठी फलदायी ठरण्याऐवजी हा डाव अंगलट येण्याची शक्यता आहे. शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनतेची सहानुभूती उध्दव ठाकरे यांना मिळत आहे. मित्र पक्षांना सुदृढ करण्याऐवजी त्यांना नेस्तनाबूत करण्याची भाजपाची खेळी भाजपासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या खांद्यावर चढून भाजपाने राज्यात बस्तान बसविले आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांना या बाबीची जाणीव असल्यामुळे त्यांनी शिवसेनेला नेहमी मोठ्या भावाची भूमिका दिली होती पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शिवसेनेचे खच्चीकरण करण्याची भूमिका घेतली.  या खेळीची जाणीव झाल्यामुळे उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅंग्रेस सोबत जुळवून घेतले. यामुळे एकनाथ शिंदे यांना फितवून शिवसेनेचे अस्तित्व समाप्त करण्याचा चंग भाजपाने बांधला आहे. भाजपाचे एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या स्व. विनायक मेटे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, रामदास आठवले यांचे पक्ष सूक्ष्मदर्शकाखाली शोधावे लागत आहेत.विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कसबा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजपाला आत्मचिंतन करावे लागणार आहे. भाजपाला आपल्या राजकीय रणनितीचा पुनर्विचार करावा लागणार आहे. लोकांना गृहित धरण्याची वृत्ती सोडावी लागणार आहे. ब्राम्हण समाज कायम भाजपाच्या पाठीशी  भक्कमपणे उभा होता पण या समाजाला गृहित धरण्याची चुक भाजपाने केली आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजाला डावलून चंद्रकांत पाटील यांना लादण्याची चुक भाजपाने केली  होती आणि आता कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत तीच चुक भाजपाने पुन्हा केली आहे. कसबा मतदारसंघातील सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि बुधवार पेठेतही भाजपाला काॅंग्रेसपेक्षा कमी मते मिळाली आहेत. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढल्यास एकटा भाजपा या महाविकास आघाडीचा मुकाबला करू शकणार नाही अशी आजची स्थिती आहे. भाजपाच्या नेत्यांनी आणि प्रवक्तांनी अहंकारी वृती आणि निम्न दर्जाच्या भाषेचा त्याग करण्याची गरज आहे. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजपासाठी अॅसेट नसून लायबिलिटी आहेत याचे आकलन करण्याची गरज आहे. भाजपातील  निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून काॅंग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षातील रेडिमेड नेत्यांना तिकिटे देण्याची भाजपाची निती सुध्दा भाजपावर दुरगामी परिणाम करणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यावर प्रत्येक निवडणुक जिंकता येणार नाही याचे भान सुध्दा भाजपाला येणे आवश्यक आहे.

    Post Views:  206


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व