पालघर केळवे-माहीम येथे उभारण्यात येणाऱ्या रिलायन्स टेक्स्टाईल पार्कच्या विरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
10 Oct 2024, 8:41 AM
संतोष घरत - जिल्हा प्रतिनिधी
पालघर!पालघर जिल्ह्यातील केळवे-माहीम टोकराले या परिसरातील ८८० एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या रिलायन्स टेक्स्टाईल पार्कच्या विरोधात मंगळवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी केळवा-माहीम या पंचक्रोशीतील नागरिकांनी केळवे माहीम सरपंच, सेवा सोसायटी अध्यक्ष व स्थानिक नेते यांच्या उपस्थितीत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चा पालघर शिवछत्रपती चौकावरून बोईसर मार्गे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सरपंचांची आणि अॅडवोकेट हेमप्रकाश तरडे आदींची भाषणे झाली. यानंतर मागण्यांचे निवेदन सरपंच, उपसरपंच यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले. आपले निवेदन शासनाकडे पाठविले जाईल. आपल्या निवेदनात उल्लेखित न्यायालयाच्या आदेशा संदर्भातील बाबीचा अभ्यास केला जाईल. सध्या जमिनीचे मोजमाप चालू आहे. कोणत्याही कंपनीला जागा अजून दिलेली नाही, त्याचा अभिप्राय वरिष्ठ स्तरावर कळविण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
तुम्हाला वाटेल ते करा परंतु आमचा पालघर जिल्हा विकू नका. आमचा जिल्हा वाचवा कारण या पालघर जिल्ह्यात हजारो एकर सुपीक शेत जमीन, व या भागातील पर्यटन स्थळे , निसर्गरम्य ठिकाणे, स्वच्छ समुद्र किनारा अशा विविधतेने नटलेल्या पालघर जिल्ह्यातील केळवे-माहीम या भागातील ८८० एकर जमिनीत हा प्रकल्प उभारल्यास संपूर्ण पालघर जिल्ह्यात प्रदूषण निर्माण होऊ शकते. म्हणून शासनाने या प्रकल्पाला मान्यता देऊ नये तसेच शासनाच्या या एकतर्फी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध उपस्थित नागरिकांनी घोषणाबाजी करून राज्य शासन व जिल्हा अधिकारी यांच्या निषेध व्यक्त केला.
यावेळी या भागातील शेतकरी- बगायतीदार, केळवे माहीम पर्यटन व्यावसायिक, मच्छीमार बांधव, महिला पुरुष या सर्वांनी या भव्य मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
Post Views: 122