राज्यमंत्री बच्चू कडून यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
रस्त्यांच्या कामातील अपहार प्रकरण; न्यायालयाचा आदेशाने गुन्हे दाखल
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
27 Apr 2022, 8:17 PM
अकोला : जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल करुन कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर पालकमंत्री बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याप्रकरणी राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात अाला.
जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना िज.प.कडून ग्रामीण रस्ते दुरुस्ती, नवी कामे, पुलासाठी प्रस्ताव मागितले हाेते. त्यानुसार १० मार्च २०२१ रोजी झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेवून प्रस्ताव समितीकडे पाठवण्यात आला होता. मात्र जि.प.च्या या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल केले. शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी वळवला. शासनाच्या १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने बोगस कागदपत्र तयार केले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला हाेता. याप्रकरणी ३ डिसेंबर राेजी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली हाेती. मात्र कारवाई न झाल्याने वंचिततर्फे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पालकमंत्री बच्चू कडूविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (३) अंतर्गत प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. अखेर न्यायालयाने मंगळवारी कार्यवाहीचा अादेश दिल्याने भादवी कलम ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१ अन्वये नाेंदविण्यात अाला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी फाैजदारी संहिका प्रकिया १५६ (३) च्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचे अादेश फिर्यादींनी स्वत: पोलीस ठाण्यात सादर केल्याचे एफअायरमध्ये नमूद करण्यात अाले अाहे.
Post Views: 176