जागर फाउंडेशन करणार रद्दी संकलनातून निराधारांची दिवाळी हा उपक्रम


100 सायकली शंभर मुलींना भेट देण्याचा निश्चय जागर माणुसकीचा
 विश्वप्रभात  08 Oct 2024, 10:26 AM
   

(मनोज भगत) हिवरखेड - दरवर्षी जागर फाउंडेशन रद्दी संकलनातून निराधारांची दिवाळी हा उपक्रम राबवून माणुसकीचा जागर करत असते. यासाठी समाजातील विविध स्तरातील संवेदनशील परिवार मनःपूर्वक आपले योगदान देत असतात. कोणी रद्दीच्या स्वरूपात तर कोणी थेट रक्कम मानवतेच्या या यज्ञात आहुती म्हणून देतात. सुरुवातीला फार मोजकी मंडळी सहभागी व्हायची. आदिवासी दुर्गम भागातील कुटुंबापर्यंत पोहोचून नवीन कपडे, दिवाळी फराळ, स्वच्छता विषयक साहित्य दिले जायचे. स्वतःच्या कुटुंबातही दिवाळी साजरी करताना जेवढा आनंद मिळत नसेल तितका आनंद या समूहात नवनवीन मंडळी येऊन घेत होती. कालांतराने जागर फाउंडेशनच्या उपक्रमाची राज्यभर चर्चा होऊ लागली.रद्दी विकून तसेच थेट रक्कम सढळ हस्ते देऊन अनेक जण आनंदात निराधारांच्या या दिवाळीत सहभागी होत होते.
गतवर्षी 2023 ला पायी प्रवास करून शाळेची वाट चालणाऱ्या  102 विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात आल्या. त्यापूर्वी भामरागड येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शंभर बैल देण्यात आले. रेल्वे, बस स्टैंड वर वस्तू विक्री करून चरितार्थ चालवणाऱ्या अंध दिव्यांगाना विक्रीसाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यापूर्वी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मायमाऊलींना भाऊबीज भेट म्हणून दळण यंत्र व शिलाई मशीन देण्यात आल्या. दिवाळी भेट म्हणून  जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.  हे सारं सामाजिक कार्य उभे राहत होते. संवेदनशील कुटुंबातील अडगळीत  पडलेल्या रद्दी सारख्या वस्तूतून.  या उपक्रमातून अनेक कुटुंब आपल्या पायावर उभी राहिली व सन्मानाने जगत आहेत. याचे सारे श्रेय नक्कीच आपल्या सारख्या संवेदनशील कुटुंबाला आहे.
गतवर्षी 102 विद्यार्थिनींना शाळेची वाट सुकर करणाऱ्या सायकल वाटप उपक्रमाने शाळा,पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आनंदी झाले. अजूनही ही खडतर वाट चालणाऱ्या अनेक मुली शिक्षण घेण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना रद्दीच्या रकमेतून यावर्षी सुद्धा 100 सायकली शंभर मुलींना भेट देण्याचा निश्चय आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण करण्याचा निर्धार जागर फाउंडेशन ने केला आहे.दरवर्षीचा अनुभव पाहता आपल्या सहकार्यातून हे सारं उभं करणं कठीण नक्कीच नाही. आमच्या साध्या एका व्हाट्सअप चा मेसेज वर शंभर रुपये पासून ते हजारो रुपये मोठ्या विश्वासाने संवेदनशील परिवार पाठवत असतात. आपण सुद्धा दरवर्षी माणुसकीचा हा जागर सुरू राहावा यासाठी योगदान देत असता. आपल्या इतर मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत जागरच्या कार्याची माहिती देत असता. ह्या मानवतेचा जयजयकार करणाऱ्या, मानव धर्म जपणाऱ्या कार्यास आपण यावर्षी सुद्धा सामाजिक निधी म्हणून कणभर तरी योगदान पाठवावे अशी विनंती जागर फाउंडेशन चे संयोजक तुळशिदास खिरोडकर यांनी केले आहे.

    Post Views:  41


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व