शेतकरी, श्रमिक, सर्वसामान्यांना चिंतामुक्त जीवन हीच प्रकाशमय दिपावली! : संजय एम. देशमुख
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
22 Oct 2022, 12:00 PM
दीपावली म्हणजे दिव्याचा सण, प्रखर प्रकाशाची रोषणाई, वैभवाच्या रुणझुणरूपी अस्तित्वाची जाणीव आणि या आनंदमय मंगल पर्वात सुख, समृद्धीची चाहूल. आपल्या पाऊंलांनी वैभव घेऊन येणार्या महालक्ष्मीचे आगमन! परंतु गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे शब्द जनमाणसामध्ये ध्वनित होतांना वर्तमानकाळात आढळतात! म्हणून नेहमी सकारात्मकच विचार करावा असे म्हटले तरी विदारक वास्तवता स्विकारण्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण आभासी जगात माणूस जास्त काळ तग धरू शकत नाही. दिवाळी हा भारतियांकरीता सर्वात मोठा सण! महन्मंगल महालक्ष्मीच्या आराधनेसोबतच फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची प्रखर रोषणाईआणि खाण्यापिण्याच्या चंगळीसह आप्तस्वकियांच्या भेटीगाठी, या आनंदाच्या क्षणांची एक संधी! ती वर्षात कोणत्या महिन्यात येणार म्हणून कॅलेंडरची पाने उलटत त्या दिवाळीच्या येण्याची प्रतिक्षा लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच करीत असतात. भारतीय माणूस हा उत्सवप्रिय आहे. आपल्या संस्कृतीत उदयाला आलेले अनेक सण, महोत्सव हे परस्परांचे स्नेहमिलन, सुखांची घेवाणदेवाण आणि दुःखाला शितल करण्याकरीता परस्परांमध्ये समरसता साधून सामाजिक दायित्व अंगिकारावे, सामाजिक दुरावे टाळून संघटीत राहण्याचे उद्देश सर्व सण आणि उत्सवामधून अभिप्रेत आहेत.
आनंद, शांतता, स्थैर्य हे एका घरापुरते मर्यादीत न राहता ते ठिकठिकाणी निर्माण होऊन समाजाचे नंदनवन व्हावे, अशा उदात्त भावना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज आणि संतांनी हृदयात बाळगल्या होत्या. त्याकरीता त्यांनी मानवी जीवन मुल्ल्यांचा सतत उद्घोष करून त्याद्वारे मनुष्याने नीतिमान व्यक्तिमत्व निर्माण करावे. स्वतःसोबत इतरांच्या मानसिक आणि भौतिक विकासाच्या कार्यातही सक्रिय असावे. याकरीता त्यांनी दिनचर्या, आचरण आणि सामाजिक व आर्थिक शिस्तीचेही धडे देऊन मनुष्याला योग्य मार्गाने चालण्याचे संदेश दिले. परंतू सामाजिक आणि राष्ट्रीय विकासासाठी माणूस द्या मज माणूस द्या म्हणणार्या सर्व संतांच्या मार्गदर्शनाचा, संस्कृतीचा आणि धर्मशास्त्रांच्या संकेतांचा मानवाला विसर पडला. त्यामुळे समाजात ग्रामपातळीपासून तर उच्च पातळीपर्यंत राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाढलेल्या अनाचारी वाटचालीने आर्थिक विषमतेची दरी प्रचंड वाढली. माणूस माणसाचा तारणहार राहिला नाही. या बिघडलेल्या मनोवृत्तीने राजकीय, सामाजिक नेत्यांची, कार्यकर्त्यांची समाजनिष्ठा आणि मानवधर्माप्रती प्रचंड प्रतारणा होत आहे. त्यामुळे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे हताश शब्द सण महोत्सवाच्या आगमनाच्या आठवणीत आणि दैनंदिन जीवनात सर्वसामान्य मनुष्य आज व्यक्त करीत आहे. सुख, समृद्धी वैभवाची वरदायिनी महालक्ष्मीच्या आगमनाच्या या मंगलमय, पवित्र क्षणी ही निराशावादी भाषा योग्य नाही, असे कोणीही म्हणेल. परंतु समाजातील शेतकरी, श्रमिक आणि बेरोजगार युवावर्गाच्या झालेल्या आजच्या दैनावस्थेला सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नेते आणि सरकारातील लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत. हे सत्य नाकारून चालणार नाही. त्यांच्या दुष्कर्मामुळेच अगोदरच कोरोनाच्या संकटाने क्षतिग्रस्त झालेल्या जनसामान्यांची दिवाळी आज साजरी होऊ शकत नाही. नैसर्गीक आपत्तीने गलितगात्र झालेला शेतकरी, शेतमजुर, श्रमिक आपल्या चिल्यापाल्यांना दिवाळीचा आनंद देऊ शकत नाहीत. आज शेतकरी, कष्टकर्यांची दिवाळी तर जाऊ द्या उदरनिर्वाहाचे प्रश्न गंभीर आहेत.
वर्तमानात श्रीमंत, उद्योजक, वाम मार्गाने पैसा कमावणारे, जनतेचे रक्तशोषण करून ऐशोरामात लोळणारे अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि गलेलठ्ठ पगार घेणारे नोकरदार यांचीच दिवाळी फक्त अतोनात पैसा खर्च करून साजरी होत असते. परंतु स्वतःचे कुटूंब प्रकाशमान करताना उपाशी मरणारा आणि प्रसंगी बळी जाणारा शेतकरी, शेतमजुर रक्ताचे पाणी करून यांना बंगले बांधून देणार्या श्रमिकांच्या दिवाळीचा विचार यातील कितीजण करतात? याचा कधी एवढ्या वर्षात संवेदनशिलतेने विचार झाला काय? समाजाच्या संकटातही स्वतःचे घाणेरडे राजकारण करणार्यांना घराघरात दारिद्रयाचा अंधार असताना स्वतः मौज, मस्तीच्या आणि वैभवाच्या लख लखाटात जीवन जगताना काहीच वैषम्य वाटत नाही. या आर्थिक विषमतेबद्दल जराशीही लाज वाटू नये? ही अमानविय वाटचाल हाच या पशुतुल्य राजकारण्याचा धर्म आहे का? नुसते धर्म, देव-देव आणि मंदिराच्या खोट्या गर्जना करून भोळ्या भाबड्या जनतेला फसविणार्या या क्रुरकर्म्यांनीच लोकांचे दिवाळी ऐवजी चक्क दिवाळे काढून त्यांना कंगाल करण्याचा विनाशकारी प्रवास सुरू केलेला आहे. या पोपट आणि मोरखेळव्यांकडून बोलाचाच भात आणि बालाच्याच कढीने लोकांची पोटे भरवण्याच्या घोषणा केल्या जातात. विकास केल्याच्या गप्पा मारल्या जातात. त्यांचे जिल्हा, तालुका आणि शहर व ग्रामपातळीवरचे चेले-चपाटे त्यांच्या या पापांमध्ये सामील होऊन समाजाला जीवंतपणी दफण करण्याचे अमानविय खेळ खेळत आहेत. जनतेच्या घरात अंधार असताना दिपावलीच्या प्रकाशात समाजाचे जीवन उजळून जावो अशा जाहिराती शासकीय तिजोरीतले घामाचे दाम वापरून वृत्तपत्र आणि मिडीयातून चमकविल्या जातात. स्वतःच्या हसर्या छब्यांची दर्शने समाजाला देत असतात. ही जनमाणसाची क्रुर थट्टा ठरत आहे. या ढोंगी वागणुकीत आणि लफंगेगीरीतच अघोरी आनंद माणणार्यांना प्रजेचे कैवारी म्हणता येईल का? ही गोष्ट आमच्या भारतियांनी लक्षात घेतली पाहिजे.
उन्मत आणि मस्तवाल ट्रम्प तात्याला पराभूत करून जमिनीवर पाय टेकविण्यास लावणार्या अमेरिका आणि पाश्चात राष्ट्रांकडूनही आता आम्ही शिकलो पाहिजे. कारण आमचीच अभिनव भारतीय संस्कृती, उत्तम शासनव्यवस्था आणि आमच्या देशाचे कर्तबगार पुरूष हेच तुणतुणे वाजविण्याअगोदर जरा डोळे आणि कान उघडून मन आणि मेंदूची कवाडे उघडी केली पाहिजेत. नाहीतर स्वतःच्याच अहंकारामुळे जगातील समृद्ध लोकशाही आणि राजकीय सामाजिक नीतिमुल्यांपासून आम्ही पारखे राहू. त्यामुळे इंग्रजांप्रमाणेच आम्हाला दिवाळीतही अंधारात ठेऊन, अज्ञानी ठेऊन आमच्यावर वैचारीक, आर्थिक आणि अनिष्ठ धोरणांची गुलामगिरी लादणारे असे हे नेते आमचे समाजजीवन नष्ट केल्याशिवाय राहणार नाहीत. आज भ्रष्टाचार, चोर्या, नियम बाह्य कामे आणि या राजकारण्यांच्या वरदहस्ताने बँका लुटून पळणारे उद्योजक दरोडेखोर दिवसाच्या लख्ख प्रकाशातच देशातून पळून जात आहेत. दिवाळे काढून परदेशात सुखा समाधानाने आणि उजळ माथ्याने स्वतःच्या दिपावल्या साजर्या करीत आहेत. या वर्षात सर्वसामान्यांची दिवाळी ही उसणे अवसान आणि कुणी दिले तर आणखी कर्ज घेऊन साजरी केली जाणारी आनंदाची नव्हे तर जरा क्लेषदायीच दिवाळी ठरणार आहे. हे कशामुळे हा विचार करून वैचारीक क्रांतीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली पाहिजे. म्हणून माझ्या मायबाप शेतकर्यांनो, श्रमिकांनो माझ्या युवामित्रांनो, माझ्या मिडीयातील पत्रकारांनो स्वतःची स्वतंत्र विचारशक्ती जागृत करा! यापुढील वाटचाल निश्चित करणे हीच तुमची दिवाळी ठरणार आहे! या निर्माण झालेल्या आणि हाताबाहेर गेलेल्या विदारक परिस्थितीला सावरण्याकरीता पुढे येऊन आपले सामाजिक दायित्व ओळखून आणि जबाबदार नागरिकत्वाच्या कर्तव्यांची उजळणी केली पाहिजे.
सामाजिक संवेदनेतून सर्व सामान्यांच्या प्रश्न सुटल्याशिवाय त्यांच्यासह शेतकरी कष्ठकर्यांची दिवाळी साजरी होऊ शकणार नाही! आपली नैतिकतेची खंबीर विचारसरणीची ताकद वाढविली पाहिजे. ‘मी भला आणि माझे घर भले’ या संकुचित विचारसरणीला फाटा देऊन स्वार्थ आणि मनातील गैरविचाराचे अंधार तथा अनैतिकतेची जळमटं या दिपावलीच्या शुभपर्वात बाजुला सारली पाहिजे. उदात्त भावनेने अनिष्ठ प्रवृत्तींना वठणीवर आणून आपली आणि परस्परांची संपूर्ण समाजाची यापुढे विकासाच्या प्रकाशात दीपावली साजरी करण्याचा संकल्प केला पाहिजे, हिच खरी दीपावली! आमच्या समस्त शेतकरी, शेतमजुर, श्रमिक आणि युवा पत्रकार मित्रांना आणि नागरिकांना दीपावलीच्या खर्या खुर्या शुभेच्छा ठरतील!
संजय एम. देशमुख
जेष्ठ पत्रकार मो. ९८८१३०४५४६
Post Views: 232