मराठी माणूस दिसला तर शरयू नदीत एक एकाला बुडवू बुडवू मारु
बृजभूषणसिंहांनी कार्यकर्त्याला मनसेची आठवण करुन दिली
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
27 May 2022, 12:23 PM
लखनऊ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. तसंच त्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणाही केली. मात्र, उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध केला. 2008 मध्ये उत्तर भारतीयांविरोधात मनसेनं केलेल्या आंदोलनाच्या आणि उत्तर प्रदेश, बिहारमधील तरुणांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना विरोध केला आहे. अयोध्येला यायचं असेल तर राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची, नाही तर संतांची माफी मागावी. माफी मागितली नाही तर राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिलाय. इतकंच नाही तर मुंबईत मारहाण झालेल्या काही तरुणांनाही त्यांनी पत्रकार परिषदेत समोर आणलं. त्यातील एकाने 5 जूनपर्यंत एक जरी मराठी व्यक्ती अयोध्येत दिसला तर त्याला शरयू नदीत बुडवून मारू, असा इशारा दिला आहे.
आम्हाला पुलावर अडवलं होतं, त्यांच्या हातात हॉकी स्टिक होत्या…
‘पाच तारखेपर्यंत कुणीही मराठी अयोध्येत दिसला तर त्याला त्यात शरयू नदीत बुडवून मारू. आम्ही जी पिडा सहन केली आहे, ती आम्ही अजून विसरलो नाही. मनसेवाल्यांनी इतकं मारलं होतं की मी मेलो म्हणून त्यांनी मला सोडून दिलं होतं. मी इंजिनिअर आहे. मी तिथे काम करतो होतो. जे मनसेवाले मुलं आहेत, त्यांचंही काम मी करत होतो. मी त्यांच्या हिस्स्याचंही काम करत होतो, म्हणून ते माझ्यावर जळायचे. एक दिवस त्यांच्या शेठने त्यांची अब्सेंटी लावली, त्यावेळी ते म्हणाले की आम्ही तुला पाहून घेऊ. मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, म्हटलं काय पाहून घेणार. मी खोपोलीवरुन आपल्या दुसऱ्या ब्रँचला जात होतो, तेव्हा त्यांनी मला रस्त्यावर अडवलं. जुबेर खान म्हणून माझ्यासोबत एक मुलगा होता. आमचा ड्रायव्हर पळून गेला. आम्हाला पुलावर अडवलं होतं, त्यांच्या हातात हॉकी स्टिक होत्या. त्यांनी मला मारलं. ही 2008 ची गोष्ट आहे. त्यावेळी माझ्या डोक्यात, शरिरावर खुणा होत्या. पूर्ण चेहरा खराब झाला होता. नंतर मी चेहरा ठीक करुन घेतला’, अशा शब्दात मुंबईत मारहाण झालेल्या तरुणाने राज ठाकरेंना इशारा दिलाय.
अयोध्येत मराठी माणसाला धोका?
महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळी हा तरुण माध्यमांद्वारे मराठी माणसाला एकप्रकारे धमकी देत होता. त्यावेळी बृजभूषण सिंहही तिथे उपस्थित होते. तसंच त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं हसूही पाहायला मिळत होतं. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना आता उत्तर प्रदेशात किंबहुना अयोध्येत महाराष्ट्रातील व्यक्तीला, मराठी व्यक्तीला धोका निर्माण झाल्याचं पाहयला मिळत आहे.
Post Views: 314