प्रजासत्ताकात विषमतांचे उच्चाटन होऊन समता प्रस्थापित व्हावी! : संजय एम. देशमुख
स्वतंत्र भारताचा ७२ व्या प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन देशात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. फडकविलेल्या तिरंग्याला सलामी देऊन स्वातंत्र्याचे जतन आणि लोकशाहीच्या संवर्धनाचे वचन देतांनाच, शासन, प्रशासन आणि समस्त देशवासियांना काळाची पाऊले ओळखून यापुढे अत्यंत दक्षतेने कर्तव्याच्या वाटचालीचीही शपथ घ्यावी लागणार आहे. भारतीय जवानांच्या अतुलनिय कामगीरीमुळे देशवासियांना सुरक्षिततेच्या दृष्टीने एक मोठा आधार आहे. परंतु अराजकता, दहशतवाद्यांच्या कारवाया ह्या हालचाली सध्या नित्याच्याच झाल्या आहेत. म्हणून भविष्यात प्रत्येकाला दक्ष पहारेकर्यांची भुमिका निभवावी लागणार आहे.
दुसरीकडे आर्थिक आघाड्यांवर देशाला मजबूत बनविण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रजासत्ताक म्हणजे स्थापन केलेल्या स्वराज्यात, लोकशाहीत प्रजेची सत्ता. देशात एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वराज्यप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्या काळातील पिढी अत्यंत समर्पित भावनेने कामाला लागली होती. त्यांच्या समर्पण आणि त्यागपूर्ण संग्रामानेच आम्ही ब्रिटीशांच्या राजवटीला धक्का मारुन त्यांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करु शकलो.
स्वराज्य या संस्कृतप्रचुर शब्दात ‘स्व’ आणि ‘राज’ अशा दोन शब्दांचा संयोग आहे. ब्रिटिशांच्या राजवटीला झुगारुन एतद्देशियांचे राज्य प्रस्थापित करणे असा त्याचा उद्देश होता. या एकमेव ध्येयाने झपाटल्या जाऊन सर्वसामान्यांसोबत या स्वातंत्र्यसंग्रामात अग्रणी असलेले अनेक नेते हे त्याकाळातील प्रस्थापित उच्चभ्रू समाजातून आलेले होते. त्यामध्ये म.गांधीसह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, बकिमचंद्र योगी, योगी अरविंद, विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरु, नेताजी बोस, रविन्द्रनाथ टागोर, अवनिंद्रनाथ टागोर यांचेसह अनेक क्रांतिकारकांच्या त्यागपूर्ण लढ्यानेच स्वातंत्र्याच्या सुवर्णदिनाचा उदय झाला. त्यांनी देशाला बहाल केलेल्या या विशाल आम्रवृक्षांची मधुर फळे लोकशाहीच्या स्वरुपाने देशाची जनता आज चाखत आहे. याची जाणीव समस्त भारतीयांनी केवळ प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिनीच नव्हे तर आयुष्यात क्षणाक्षणाला स्मरणात ठेऊन, येथील लोकशाही आणि देशाला सर्वांगिण दृष्टीने बळकट करण्याकरिता सतत आघाडीवर असले पाहिजे.
ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा तो काळ संपवून स्वातंत्र्य मिळविणे एक आव्हान होते. स्वातंत्र्यप्राप्तीच्या एकमेव उदात्त उद्धेशाने मंतरलेले ते दिवस होते. त्यामुळे सर्वत्र ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंडाचे वारे त्यावेळी वाहत होते. त्याकरिताच अनेक तरुण जुलमी राजसत्तेत घडणार्या विविध घटनांनी आक्रमक होऊन देशाला स्वतंत्र करण्याच्या या यज्ञकुंडात उड्या घेत होते. भारतासारखा वैभवशाली व समृद्ध परंपरा असलेला देश एका बेटाएवढ्या देशातील ब्रिटीशांच्या गुलामगिरीत राहून दारिद्र्यात पिचत रहावा ह्या वेदना असह्य झाल्याने मी अस्वस्थ होऊन देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय झालो. असे पंडित जवाहरलाल नेहरुंनी आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात लिहले आहे. स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांच्या या मांदियाळीने गीता आणि अन्य भारतीय ग्रंथांचे, परंपरा आणि साहित्य कलाकृतींचे रसग्रहण करुन त्या अभ्यासातून चिंतनाद्वारे एक विचारधारा पुढे आणली तीच भारतीय प्रजासत्ताकाच्या स्थापनेपूर्वी सहाय्यभूत आणि राजकीय विचारांना प्रेरक ठरली. प्रजासत्ताक दिन साजरा करतांना मिळालेले स्वातंत्र्य आणि स्थापित झालेली लोकशाही अबाधित ठेऊन तिचा लाभ देशात तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहचेल यावर लक्ष ठेऊन दक्ष राहण्याचे देशातील प्रत्येक जबाबदार नागरीकाचे कर्तव्य आहे. ती जबाबदारी फक्त राज्यकर्त्यांवर ढकलणे योग्य नव्हे. आक्षेपाचे उलटे खापर फोडून गोंधळ घालत राहणे म्हणजे ती मानवी कर्तव्याच्या जबाबदारीपासून परावृत्त होण्याकरिता शोधलेली पळवाट ठरेल. राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य, क्रीडा, ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक उणीवा दूर करुन गतिमान वाटचालीने एकविसाव्या शतकात आपले अनोखे सामर्थ्य सिद्ध करण्याकरिता भारत प्रभावी विकासाच्या मार्गाने वाटचाल करीत आहे. परंतु संपूर्ण जग आणि भारतालाही आज निर्माण झालेल्या अराजकतेच्या संकटाने चिंताग्रस्त केले आहे. आपण संरक्षण क्षेत्र आणि पोलिस दलातील विकासाच्या कितीही जाहिराती करीत असलो तरी अनेक बाबतीत देश आज किती मागे आहे याची प्रचिती अनेक आतंकवादी हल्ल्यातून समोर येत आहे. शस्त्रास्त्र संपन्नतेत देश मागे आहे, आणि एक कटू सत्य म्हणजे अण्वस्त्रांच्या स्पर्धेत मागे असणे ही वस्तुस्थिती नाकारुन तर चालणार नाहीच, त्यामुळे पाकिस्तानला केवळ इशारे देऊन धमकावणेही चालणार नाही.
देशात अनेक कारणावरुन सहिष्णुता आणि असहिष्णुतेच्या वादंगांना प्रचंड प्रमाणात उत आलेला आहे. इकलाखपासून तर वेमुला नावाच्या विद्यार्थ्यांसारखे गेलेले अनेक बळी यापुढे जाऊ नयेत म्हणून प्रत्येक नागरीकाने धार्मिक, प्रादेशिक, पंथ आणि गटातटाच्या वादापासून दूर होऊन देशाच्या सुदृढीकरणाकरिता मानवी कर्तव्याचा एकच धर्म दैनंदिन वाटचालीतून जोपासला पाहिजे. देशाला एकविसाव्या शतकातील नाविण्यपूर्ण प्रगतीचे नवे दिवस दाखविण्याची खरी जबाबदारी आता या युवापिढीवर अवलंबून आहे. देशात आज तरुणांची संख्या जास्त आहे, म्हणून भारत तरुण आहे. त्याच शक्तीने तो अनेक संकटांशी मुकाबला करुन प्रतिकुल परिस्थितीच्या सागरातून निर्धास्तपणे तरुन तर जाणार आहेच, परंतु त्या अनुषंगाने युवापिढीने याबाबत अधिक गंभिरतेने विचार करुन सतत सज्जतेने उभे असण्याची गरज आहे. परंतु अनेक बाबतीत दिसणार्या उणीवा पाहून मनासारखेच सर्व घडत नाही असा नकारार्थी विचार करुन सकारात्मक यश कधी मिळणार नाही. आज भारतातील युवक जिज्ञासेच्या आणि अपुर्या ज्ञानाच्या अभावी सद्य:परिस्थितीत किती मागे आहे हे युवावर्गाचे सामान्य ज्ञान आणि नागरी कर्तव्याच्या बाबतीत केलेले अवलोकन चिंताजनक आहे.
देश आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याकरीता प्रत्येक घटकाला आर्थिक, भौतिक विकासाच्या संधी सारख्या प्रमाणात उपलब्ध होणे व त्या संधीचा योग्य तो लाभ घेण्याच्या त्यांच्या क्षमता विकसित करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. हे पाहून श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब व मध्यमवर्गीय अजूनही विकासापासून किती दूर आहे याची जाणीव करून देणारे गंभीर वास्तववादी सत्य आहे. कारण आज देशात प्रचंड प्रमाणात आर्थिक विषमता निर्माण झाली असून ही बाब अत्यंत चिंतनिय आहे. प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला सर्वच नेते आपल्या संदेशातून देशाच्या साधनसंपदेवर सर्वांचा समान अधिकार असल्याचे म्हणतात. परंतु नेमकी यापेक्षा विसंगत परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली आहे. श्रीमंत लोक अधिक श्रीमंत तर गरीब आज अधिकाधिक दारिद्रयात जीवन जगत आहेत. श्रीमंतांकडे अधिक संपत्ती एकवटलेली आहे. हा स्वतंत्र भारताला लागलेला आर्थिक विषमतेचा अभिशाप आहे. आर्थिक आघाड्यांवरील नोटाबंदी आणि अनेक निर्णयांनी कोणताही फायदा झालेला नाही हे जळजळीत सत्य सरकारने मान्य केले पाहिजे, तर पुढील प्रगतीचा टप्पा गाठता येणे शक्य होईल. ही वास्तवता न स्विकारणे हा सुद्धा एकविसाव्या शतकाकडे जाणार्या महामार्गावरील वेगवान वाटचालीतला गतिरोधक ठरु शकतो. ही बाब देशातील जनतेने आणि सरकारनेही वेळीच समजून घेऊन, आम्हाला काय केले पाहिजे या कर्तव्याच्या भावनेची उजळणी केली पाहिजे व आपला मार्ग अधिक प्रशस्त केला पाहिजे. अंतर्गत वादांना तिलांजली देऊन फ क्त देशाचा विकास हेच एक ध्येय नजरेसमोर ठेऊन सर्वच क्षेत्रातून मानवी कर्तव्याच्या भावनेने दिले जाणारे सामुहिक योगदान हिच प्रजासत्ताक दिनी दिली जाणारी खरी मानवंदना ठरावी! संजय एम.देशमुख मोबा.९८८१३०४५४६
Post Views: 239
मुख्य संपादक
संजय एम. देशमुख
सहसंपादक
सतिश एम.देशमुख