अकोला : श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे काल शहरात आगमन झाले.आज गुरुवारी दुसर्या दिवशी पालखीची नगरप्रदक्षिणा झाली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक देखावे साकारण्यात आले होते.दुसर्या दिवशीही भक्तांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. जय गजाननच्या गजरात शहर दुमदुमले होते.
पंढरपूरला आषाढी वारीत शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी गत 52 वर्षांपासून परंपरेप्रमाणे सहभागी होत असते. कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर 6 जून रोजी पालखी शेगाव मधून मार्गस्थ झाली.बुधवार ता.8 रोजी पालखीचे अकोल्यात आगमन झाले. शहरातील संत गजानन महाराजांचे लाखो अनुयायी आहेत.त्यामुळे भक्तांकडून मोठ्या उत्साहात पालखीचे ठिकठिकाणी स्वागत झाले.
बुधवारी रात्रीचा मुक्काम मुंगीलाल बाजोरिया विद्यालयात झाल्यानंतर सकाळी 8 वाजता पालखी टपाल कार्यालयाजवळून जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरून, अशोक वाटिका चौक, खंडेलवाल भवनसमोरून नेहरू पार्क जवळून जुने इन्कम टॅक्स चौक,पंत आदर्श कॉलनी शाळा क्रं. 16 मध्ये सकाळी 9 वाजता पोहचली. याठिकाणी भोजन आटोपल्यावर तेथून सिंधी कॅम्प मार्गे जेल चौक, अशोक वाटिका जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून, सरकारी बगीचा, खोलेश्वर, सिटी कोतवाली, जयहिंद चौक, श्री राजेश्वर मंदिरा समोरून पालखी हरिहर पेठ याठिकाणी 2.30 वाजता पोहचली. याठिकाणी पालखीचा दुसर्या दिवसाचा मुक्काम असून उद्या शुक्रवार ता.9 रोजी सकाळी 8 वाजता भरतपूर पातूर मार्गे पंढरपूरला पालखी रवाना होईल.
चोख बंदोबस्त:एसपीचा केला सत्कार ः सलग दोन दिवस पालखीचे अकोला शहरात मुक्काम आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांची महत्त्वाची भूमिका यामध्ये असते.त्यामुळे पालखी आज दुपारी 1.30 वाजता पोलीस अधीक्षक कार्याजवळून गेली असता.पालखीचे दर्शन एसपी जी श्रीधर यांनी घेतले. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचे शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
जिल्हा सर्वोपचार
रुणालयाच्या वतीने फराळ
संत गजानन महाराजांच्या पालखीचे दुपारी साडेबारा वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर आगमन झाले यावेळी प्रशासनाच्या वतीने चहा बिस्किट आईस्क्रीम पाणी वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित डॉक्टर, प्राध्यापक, परिचारिका, विद्यार्थ्यांनी पालखीचे दर्शन घेतले. यावेळी डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ नितीन अंभोरे आदी उपस्थित होते. तसेच सचिन चावरे यांच्यावतीने चहा वाटप याठिकाणी करण्यात आले.
जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष,
सीईओंनी केले स्वागत
संत गजानन महाराजांच्या पालखीचे दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेच्या जवळ आगमन झाले.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड,सभापती पंजाबराव वडाळ,आकाश सिरसाट यांच्यासह बांधकाम चे कार्यकारी अभियंता गणेश रंभाड, डेप्युटी सीईओ बाळासाहेब बोटे,जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष सुनील जानोरकर, प्रकाश गवळी आदींनी स्वागत केले. यावेळी वारकर्यांना 50 किलो सुकामेवा व अल्पोपहार व पाण्याचे वाटप अधिकारी कर्मचार्यांच्या वतीने करण्यात आले.
Post Views: 282