अंध मतदारांना ब्रेल लिपीचे प्रशिक्षण देऊन केले जात आहे साक्षर
डॉ.कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग सोशल फाउंडेशन चा राष्ट्रीय उपक्रम
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Apr 2024, 10:39 AM
अकोला : जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी डॉ विशाल कोरडे यांची मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोलासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून नेमणूक केली आहे. डॉ .विशाल कोरडे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने संपूर्ण अकोला जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या मतदानाविषयी असणाऱ्या अडचणी दूर करीत आहेत.
इतर दिव्यांगांपेक्षा अंध मतदारांच्या जास्त अडचणी आहेत, कारण ते मतदानासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. अशा अंध मतदारांना दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे डॉ.विशाल कोरडे ब्रेल लिपी चे प्रशिक्षण देऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. गेल्या महिन्याभरापासून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रत्येक दिव्यांग मतदारापर्यंत पोहोचवून त्याला असणाऱ्या मतदानाविषयी अडचणी दूर करण्याचे कार्य दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात येत आहे.सहा थेंबाची ब्रेल लिपी अंध मतदारांना शिकवून मतदान करताना ईव्हीएम मशीन वर गुप्त मतदान कसे करायचे ? याविषयी डॉ.कोरडे त्यांना प्रशिक्षण देत आहेत.
प्रत्यक्ष मतदान करतेवेळी मतदान केंद्रावर ब्रेल लिपीतील सूचना असणारी मतदान पत्रिका उपलब्ध असणार आहे ती हाताळून अंध मतदाराने प्रत्यक्ष मतदान करावयाचे आहे ज्या अंध मतदारांना ब्रेल लिपीचे प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे व गुप्त मतदान करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान ब्रँड अँबेसिडर विशाल कोरडे यांनी केले आहे.दिनांक 18 एप्रिल २०२४ रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे झालेल्या बैठकीत अंध बांधवांना ब्रेल लिपीचे प्रशिक्षण कसे दिले जाते ? याविषयी डॉ कोरडे यांनी सविस्तर माहिती सादर केली. यावेळी अंध मतदार रोहित सूर्यवंशी यांनी डॉ. कोरडे यांनी दिलेल्या ब्रेल लिपी प्रशिक्षणाची माहिती आम्हाला मतदान करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे असे सांगितले.
सदर कार्यक्रमात डॉ.कोरडे यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या चला उठा जागृत होऊन करूया मतदान या मतदार साक्षरता गीताची प्रस्तुती सर्व दिव्यांग बांधव व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोर करण्यात आली . सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ कोरडे यांचा सत्कार करण्यात आला. ब्रेल लिपी प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ.कोरडे यांच्यासोबत प्रा.अरविंद देव व प्रा.गजानन मानकर हे अंध मतदारांना प्रशिक्षण देत आहेत. संपूर्ण अकोला जिल्ह्यात जाऊन मतदार साक्षरता अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य अनामिका देशपांडे, अस्मिता मिश्रा,सिद्धार्थ ओवे, गणेश सोळंके, संजय फोकमारे, श्वेता धावडे व विजय कोरडे सहकार्य करीत आहे.
Post Views: 157