मध्यप्रदेशातील ओबीसी आरक्षणाने महाराष्ट्रातील राजकारणाला फोडणी! : संजय एम.देशमुख


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 May 2022, 9:06 AM
   

मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा सुप्रिम कोर्टाने आदेश दिला आणि त्याचा धक्का मात्र महाराष्ट्राला बसणार हे आता निश्चित झाले आहे. मध्यप्रदेशाला ओबीसी आरक्षण मिळाले आणि महाराष्ट्राला का नाही या असंतोषाच्या आक्रोशाला आता सुरूवात होणार, आणि त्याचा सर्वाधिक फायदा गदारोळात अग्रेसर असणार्या भाजपाला मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळाली नाही,मात्र त्यांच्या कुरापतीच्या उद्योगांना एका मागोमाग फोडणीचे खमंग मसाले मिळण्याचे परम् भाग्य मिळालेला एकमेव विरोधी पक्ष म्हणून अग्रक्रमाने मिळत गेलेले हेच यश त्यांनी समजावे. म्हणून सत्ता नाही तरी आघाडी सरकारला जेरीस तर आणता आले या विघ्नसंतोषातच आनंदोत्सव साजरा करण्याचे दिवस त्यांना गेल्या दोन वर्षात प्राप्त झालेले आहेत.
समाजाच्या कर्तव्याशी काही देणे घेणे नसलेल्या भांडकुदळ नेत्यांचे राज्य म्हणून गणना होईल एवढे शिगेला पोहोचलेले सुडाचे अतिरेकी राजकारण अन्य कोणत्याही राज्यात नसावे. अशी कुसंस्कृती येथील नेत्यांनी महन्मगल महाराष्ट्राच्या नावाने कायम केली आहे. देशाच्या आणि राज्या राज्यातील जनतेच्या समस्यानिर्मुलन करून त्यांचा जीवनमानाचा स्तर उंचावत समर्थपणे विकासाचा गाडा हाकण्याचे कार्य हे सत्ताधार्यांचे असते. परंतू जनसमस्या निर्मुलन आणि विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करून प्रगतीची गती साधली गेली पाहिजे. त्यासाठी चुकीच्या वाटचालीला प्रतिबंध करून यशस्वी घोडदौड करण्यासाठी विरोधी पक्षांच्या भुमिकाही महत्त्वाच्या असतात. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्ताधारी सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे कर्तव्यदक्ष तर असावेच परंतू विरोधकही समाजशील आणि प्रगल्भ विचारांचे परिपक्व राजकारणी असावेत. प्रसंगी विरोध तर कधी हितांच्या निर्णयांमध्ये सहयोग अशा विधायक राजकीय विचारधारा जेथे सक्रिय असतात, त्या राज्याच्या विकासाला कोणत्याही अपप्रवृत्ती रोखू शकणार नाहीत एवढे भाग्यवान राज्य ते समजावे.
महाराष्ट्रातील आघाडी सरकार येथील सत्तेमध्ये विराजमान झाले. परंतू होता होताच त्यांना कोरोनाने आणि समाजविघातक राजकारणाच्या नव्या कोरोना व्हेरियंटने ग्रासले. त्यामुळे राज्याच्या विकासकार्याऐवजी धर्मांधता आणि सत्ताधार्यांना फक्त अडचणीत आणण्याचे मुद्दे शोधून भोंग्या सोंग्याचे आणि हनुमान भक्तीच्या दांभिक राजकारणाचे खोटे कारनामे सुरू झाले. अशा गदारोळात ओबीसी आरक्षणापासून तर समाजाच्या हिताच्या कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तरी चालेल.परंतू त्या माध्यमातून आघाडी सरकारला बदनाम कसे करता येईल हा एकच उद्देश घेऊन महाराष्ट्रातील विरोधकांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे जनकल्याण आणि विकासाच्या गती संथ करण्याला भाजपचे विरोधक नेते जास्त प्रमाणात कारणीभूत आहेत, याबाबत आता दुमत असणारांचे प्रमाण नगण्य आहे.
सुडाच्या आणि शह प्रतिशह देण्याच्या लढाईत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत त्यांना वेठीस धरणार्या अनेक उपद्व्यापांनी महाराष्ट्राच्या विकास कार्यावर परिणाम झाला. परंतु त्यामुळे गदारोळ करून नित्य नवीन फोडण्या देण्याचा मालमसाला मिळाल्याच्या आनंदात मात्र भाजपचे नेते मग्शुल आहेत. आता मध्यप्रदेशाला ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याची मुभा मिळाली आणि महाराष्ट्राला का नाही? या मुद्याचे खापरही आघाडी सरकारवर फोडण्याची एकही संधी उपद्व्यापी चौकडी सोडणार नाही. येथील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकला नाही याला जबाबदार तर आघाडी सरकारला धरले जाणार आहेच. परंतु महाराष्ट्रातील असहयोगाच्या राजकारणात भाजपची सत्ता असती तर ते टिकले असते, याची शाश्वतीही देता येण्यासारखी नाही. संकटांच्या मालिकांसह राज्याची सुत्रे हातात घेणार्या आघाडी सरकारला महत्त्वपूर्ण कामामध्ये सहयोग देणे हे विरोधी पक्षाचे प्रथम कर्तव्य ठरते. मग त्याचे त्यांनी कितपत पालन केले हा प्रश्न जर अंतर्मनाला विचारला तर आपणाच किती अपराधी आहोत याचे उत्तर त्यांचे त्यांनाच मिळेल.
ओबीसींच्या इम्पिरीकल डाट्यांसह, आयोगाला योग्य जागा, पुरेसा निधी ह्या मुलभूत गरजांची परिपूर्ती वेळेत करता आली नाही म्हणून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आघाडी सरकारला अजूनही सोडविता आला नाही, असा ठपका आघाडी सरकारवर सर्व बाजूनी ठेवला जाणार. परंतु ह्या सर्व गोष्टींची परिपूर्ती करून घेण्यासाठी या विषयावर लक्ष केंद्रीत करून तिथे आपली ताकद खर्च करण्यात विरोधक किती सक्रिय होते हे तपासणेही महत्वाचे आहे. कारण प्रश्न राजकीय इच्छा शक्तीचा आहे. तो भोंगे वाजवून आणि हनुमान चालिसा पठन करून, किंवा तपासयंत्रणांमध्ये लक्ष घालून सुटण्यासारखा नाही, तेथे कर्मसाधना पाहिजे! हनुमान चालिसा वाचून महाबली हनुमान तुमचे हे प्रश्न सोडविणार नाही. उलट दांभिक भक्ती आणि फसवाफसवीचे उपद्व्याप पाहून नाठाळांचे माथी हाणा काठी म्हणून, अशांच्या डोक्यावर आपल्या गदेचे व्रजप्रहार करणार नाही, याची काळजी घेणे हे माणसातला माणूस जागृत करून माणूसपणाचे जगणे ठरणार आहे! म्हणून मानवताधर्माचे स्मरण करून आपला समाजधर्म जागविला पाहिजे. नाही तर समाजाचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे असेच ताटकळत राहणार. दोन श्वानांच्या भांडणात जो बाहेरून आलेला उपर्या वज्रबली ठरेल तोच टाकलेल्या भाकरी उचलून घेऊन जाईल! मग जगावे कसे माणसासारखे की श्वानांसारखे हे शहाणे असणारांनी आता ठरविले पाहिजे!
संजय एम. देशमुख,
मोबा.क्र.९८८१३०४५४६

    Post Views:  236


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व