भिल्लारच्या धर्तीवर जिल्ह्यात पुस्तकांच्या शाळा : डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी
पुस्तकांचे गाव भिल्लार आणि कास पठारला जिल्ह्यातील शिक्षकांचा अभ्यास दौरा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Oct 2022, 9:36 AM
अकोला : शिक्षण विभाग माध्यमिक तथा महाराष्ट्र मराठी माध्यामिक शिक्षक संघ यांच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षकांचा अभ्यास दौरा पुस्तकांचे गाव भिल्लार आणि कास पठार जि. सातारा येथे दि. ०७ ऑक्टोबर ते दि. १० ऑक्टोबर २०२२ दरम्यान डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद, अकोला यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता. भिल्लार पुस्तकांचे गाव अभ्यास दौऱ्यावर डॉ. सुचिता पाटेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रेमदास राठोड, डॉ. संतोष पेठे, निलेश कवडे, सौ. अलका बोर्डे, स्मिता जोशी, अनंत शेळके, रूपाली अरबट, श्वेता टिकार, अनिल काळे, बबलू तायडे, संजय देवकते, शिवराज जामोदे, वंदना मांगटे, प्रभाकर महाजन, उमेश चोरे, ज्योत्सना जोशी, अशोक दळवी, सचिनकुमार तायडे, किर्ती गहिलोत, प्रिती कारस्कार, वंदना जायले, अरविंद गिर्हे, सुनील वानखडे, रचना शर्मा, रामराव कव्हळे, गोपाल बोरखडे, शीलाताई कोकाटे, संगीता बघिले, सुनील जाधव, दिगंबर खडसे, सतीश वाडेकर, नंदकिशोर पोटदुखे, अंजली अग्निहोत्री, माया डेहणकर, कांचन वसतकार, अश्विनी बोंडे, अजित सपकाळ, प्रफुल्ल तळोले, राजाराम म्हैसणे आणि राजेश चित्ते या शिक्षकांचा सहभाग होता.
महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा विकास संस्थेच्या माध्यमातून भिल्लार तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे पुस्तकाचे गाव साकारले आहे. भिल्लार हे महाराष्ट्रातील नव्हे तर आशियातील पहिले पुस्तकाचे गाव ठरले आहे. गावात घरोघरी पुस्तकांच्या प्रकारानुसार २५ ते ३० दालने उपलब्ध करून दिली आहेत. बालसाहित्य, स्पर्धा परीक्षा, कादंबरी, महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, विज्ञान, साहित्यिक प्रदर्शनी, नियतकालिके, क्रीडा व लोकप्रिय, दिवाळी अंक, प्रकल्प कार्यालय, चरित्रे व आत्मचरित्रे, बोलकी पुस्तके, इतिहास, साप्ताहिके आणि वर्तमानपत्रे, शिवकालीन इतिहास, चरित्रे, आत्मचरित्रे (क्र. २), परिवर्तन चळवळ, स्त्री साहित्य, लोकसाहित्य, कविता, कादंबरी (क्र. २), साहित्यिक प्रदर्शनी, बालसाहित्य (क्र.२) , संत साहित्य, ललित गद्य, वैचारिक, निसर्ग, पर्यटन व पर्यावरण, साहित्यिक प्रदर्शनी, कथा, नाटक व चित्रपट, विनोदी साहित्य, चित्रमय पुस्तकं, विविध लोकप्रिय व पुरस्कार विजेते आणि विविध कलांविषयक अशी पुस्तकांच्या दालनांची नावे आहेत. यात १२००० ते १५००० पुस्तकांची विभागणी त्यांच्या त्यांच्या साहित्यप्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या २२ ठिकाणी केली आहे. पुस्तकांचे गाव प्रकल्प कार्यालयातील श्री. शशिकांत भिलारे यांनी पुस्तकांचे गाव भिल्लार या संकल्पनेबाबत जिल्ह्यातील शिक्षकांना माहिती दिली. यावेळी डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्य) अकोला यांचा सत्कार प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला.
यानंतर जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रतापगड किल्ल्याला भेट दिली. आनंद उतेकर यांनी शिक्षकांना प्रतापगडचा जाज्वल्य इतिहास कथन करून सांगितला. अफजलखानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे कथन त्यांनी केले. त्यांनी गडावरील ऐतिहासिक घटना, वास्तू आणि संदर्भ यांचा शिक्षकांना परिचय करून दिला. अभ्यास दौऱ्याचा समारोप कास पठार ला झाला. कास पठार समितीचे अध्यक्ष दत्ता किर्दक आणि वसंत शिंदे यांनी जिल्ह्यातील शिक्षकांचे स्वागत केले. त्यांनी कास पठारावरील फुलांची विस्तृत माहिती दिली. कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. अभ्यास दौऱ्याला प्रभावती कोळेकर(शिक्षणाधिकारी सातारा); आनंद पलासे (गटशिक्षणाधिकारी महाबळेश्वर); पुरुषोत्तम माने; आणि वसंत शिंदे यांनी विशेष सहकार्य केले. अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्य) अकोला यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास दौरा मुख्य संचालक डॉ. संतोष पेठे, व्यवस्थापक प्रेमदास राठोड आणि समन्वयक निलेश कवडे यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांची भाषिक समृद्धी व्हावी, पुस्तकांची चळवळ गतिमान होऊन वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने सदर अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. भिल्लार पासून प्रेरणा घेऊन जिल्ह्यात पुस्तकांच्या शाळा तयार करण्याचा मानस आहे.
डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी (माध्य) अकोला
मराठी भाषा शिक्षकांच्या माध्यमातून जिल्ह्यात वाचन चळवळ राबविण्यासाठी पुस्तकांचे गाव भिल्लार अभ्यास दौरा उपयुक्त ठरणार आहे. मराठी भाषेचे वैभव पुस्तकांच्या माध्यमातून जतन करण्यासाठी शिक्षकांना प्रेरणा मिळाली आहे.
: डॉ. संतोष पेठे अध्यक्ष, महाराष्ट्र मराठी माध्यामिक शिक्षक संघ अकोला
Post Views: 947