हनुमान चालिसावरून महाभारत; मातोश्रीवर जाण्याच्या निर्णयावर राणा दाम्पत्य ठाम
मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेवर टीका
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
22 Apr 2022, 8:31 PM
मुंबई : कितीही विरोध झाला तरी उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले. आम्हाला होणार्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याने अमरावती पोलिसांना गुंगारा देत मुंबई गाठली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला प्रतिबंधात्मक नोटिस बजावली. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेत मातोश्रीवर जाण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली.
मातोश्रीवर हनुमान चालिसा मुख्यमंत्र्यांनी वाचावी. राज्यावर आलेले संकट, साडेसाती हनुमान चालिसा वाचल्यानंतर दूर होईल. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही हनुमान चालिसा पठणावर ठाम आहोत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचे स्वागत केले असते. तर, एक वेळा नाही 100 वेळा वाचायला सांगितले असते. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकरांना कुठलाही त्रास देणार नाही, असेही रवी राणा यांनी म्हटले. आमचे कार्यकर्ते जे येणार होते, त्यांना मी सांगतो कोणी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, असेही त्यांनी म्हटले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे जर शिवसैनिक असते तर त्यांनी आमच्यासोबत हनुमान चालिसा पठण केल असते. बजरंगबलीचे नाव घेऊन मी येथे आलो आहे. शिवसैनिकांनी धमकी दिली होती, मुंबईत पाय ठेवून दाखवा. त्यांना सांगू इच्छितो की अरे मी मुंबईत आलो आहे. हनुमान चालिसा वाचल्याने मी इथपर्यंत आलो असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.
नवनीत राणांना घराबाहेर पडू देणार नाही : शिवसेना
नवनीत राणा आणि रवी राणा यांना बाहेर पडू न देण्यासाठी शिवसैनिक त्यांच्या खार येथील घराबाहेर जमले आहेत. या शिवसैनिकांनी आम्ही रात्रभर इथेच राहणार असून राणा मुंबई सोडून जात नाहीत तोवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडा पहारा देणार असल्याचे सांगितले. तसेच राणा जोवर मुंबई बाहेर जात नाहीत, तोवर असाच पहारा देणार असल्याचे ते म्हणाले. मातोश्रीच्या रस्त्यावर एक पाय पुढे टाकून दाखवावे, आम्ही काय करू शकतो ते उद्या दाखवू, असा इशाराही या शिवसैनिकांनी दिला आहे.
संजय राऊत म्हणजे पोपट : नवनीत राणा
संजय राऊत हे पोपट आहेत. दररोज सकाळी पत्रकारांना जमवून बडबड करत असतात. गोव्यात शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती. आता महाराष्ट्रातदेखील गोव्यासारखी स्थिती होणार असल्याचे नवनीत राणाने म्हटले. शिवसैनिक आमचे काहीही वाकडे करू शकत नाही. त्यांनी मुंबईत पाय ठेवू देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आम्ही मुंबईत आलो आहोत.
Post Views: 259