घरातील सुनांना मोलकरीण नव्हे तर घरातील एक सदस्य म्हणून वागवा, तिच्याशी त्रयस्थ व्यक्ती म्हणून व्यवहार न करता कुटूंबातील सदस्याप्रमाणे आनंदाने, प्रेमाने व्यवहार केला पाहिजे. घरोघरी सून म्हणून येणार्या मुलींचा सन्मान झाला पाहिजे. हे सुसंस्कृत समाजाच्या संवेदनशीलतेचे प्रतिबिंब ठरते, असे स्त्रीशक्तीच्या गौरवात अधिक भर घालणारे महत्वपूर्ण मत काही वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले होते, याचे स्मरण नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने झाले! यामुळे मानसिक, शारीरिक छळातून आत्महत्येस प्रवृत्त होणार्या अनेक नववधूंना, घराघरातील सुनांना यातून एक दिलासा मिळेल, असे त्यावेळी वाटले. परंतु परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसला नाही. जगण्यातील सकारात्मक दृष्टीकोण प्राप्त होण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली ही एक महत्वपूर्ण अपेक्षा होती.
समाजात आज मानवतेच्या जागेवर दानवतेने अतिक्रमण केलेले असून त्यामुळे पशुतुल्य वागणार्या माणसांच्या हृदयातून प्रेम पाझरण्याऐवजी वाढत्या द्वेष, मत्सर, सूडाच्या भावनेने त्याची अधिकार गाजविण्याची अघोरी इर्षा वाढीस लागली आहे. या दृष्प्रवृत्तीने अनेकांचे बळी जाऊन असंख्य परिवार उध्वस्त होण्याच्या क्लेशदायक घटना आज देशात घडत आहेत. हुंड्याकरीता, आर्थिक लोभाकरीता, आणि दुसर्याला गुलाम म्हणून वागवून आपल्या आसूरी अधिकाराचे अस्तित्व निर्माण करण्यात आनंद मानण्याची विघातक प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे सुनांना जाळून मारणे, मानसिक शारीरिक छळ करुन भावी जीवनाचे मनमोहक चित्र रंगविणार्या नववधुला आत्महत्येस प्रवृत्त करुन तिच्या अख्ख्या स्वप्नांचा चुराडा करणे, हे प्रकार देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा मानवाचे अध:पतन घडवून आणणारा फार मोठा सामाजिक धोका आहे.
एका स्त्री मुळे महाभारत घडले असे म्हणतात. त्याचप्रमाणे समाजात घडणार्या आजच्या कौटूंबिक अत्त्याचाराला जास्तीत जास्त संख्येने सासू म्हणविल्या जाणार्या महिला आणि कुठे कुठे अपवादाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरल्याने नकारात्मक, विक्षीप्तपणे वागणार्या सुना कारणीभूत ठरतात. सारांशाने घडणार्या कौटूंबिक घटनांमागे कारणीभूत असणारांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक महिलांचे प्रमाण आहे ही गोष्ट घरा-घरातून आज निदर्शनास येत आहे. दुसर्या घरातून लाडा कौतुकात वाढलेली त्या परिवाराच्या हृदयाचा तुकडा असणारी त्यांची कन्या सर्वस्व सोडून आपल्या परिवाराची सून म्हणून आपल्या कुटूंबाचे सदस्यत्व स्वीकारते, म्हणून ती आपली झाल्याने मनातील प्रेमाने ते बंध अधिक दृढ व्हावेत; ती पूर्णत: मनानेही आपलीच व्हावी असा उदात्त विचार प्रत्येक परिवारातील सासवांमध्ये, तिच्या पतीच्या मनामध्ये, आणि कुटूंबातील प्रत्येक सदस्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. म्हणजे आनंदाच्या, प्रेमाच्या ओलाव्याने आणि मानवतेच्या शक्तीने समाजातील ही मानववंशाची बाग चैतन्याने बहरुन येईल, आणि या वातावरणात निर्माण झालेल्या सामाजिक विकासाच्या फळाफुलांनी ते एक सामाजिक नंदनवन ठरेल.
स्त्री ही समाजाची जननी आहे, ती एक शक्ती आहे, तीच माता, भगिनी आणि कन्या आहे. त्यामुळे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्री चा हात असतो. हे जरी सत्य असले तरी तो यशस्वी होणारा पुरुष जन्माला घालणारी प्रथम स्त्री च आहे. हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ, आणि सिद्ध करण्याचीही गरज नसलेले सत्य प्रत्येक व्यक्तीला स्त्री, पुरुषांना पूर्णपणे माहीत असल्यावरही पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांनी स्त्रियांचे अस्तित्व स्वतंत्रपणे कधी मान्य केलेले नाही, तर घराघरातील सासवांनी तर कुठे-कुठे सुनांनीही एकमेकींवर निरपेक्ष प्रेम कधी केलेले आढळत नाही. ज्या परिवारात हा आनंद असेल तर ते भाग्यशाली परिवार ठरावेत. समाजात प्रत्येक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये स्त्री हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे सासरघरी सुनेचा सन्मान झाला तर या विवाहाचे पावित्र्य आणि धार्मिक कार्याची प्रतिष्ठा टिकून राहते, आणि असे समाजात सहजपणे घडत राहणे यातून तो समाज संवेदनशील आणि सुसंस्कृत समजला जातो. प्रत्येकाच्याच मंगलमय जीवनाचे एक प्रतीक ठरते. हा विधायक विचार समाजामध्ये प्रबोधनातून रुजविणे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारक पाऊल ठरेल.
प्रेम, करुणा, त्याग हे मानवी जीवनात आनंद निर्माण करणारे सर्वोच्च तत्व आहेत. माणसाने माणसाशी माणसासाखे, प्रेमाने वागावे हा मानवताधर्म आहे. एकमेकांच्या जीवनात निर्माण झालेल्या आनंदाने अनेक परिवारांचे पर्यायाने सामाजीक जीवन उजळून निघते. या उलट माणसाने माणसाशी पशुतुल्य वागणे, त्याचा जगण्याचा अधिकार हिरावून घेणे, ही दानवी वृत्ती स्वत:च्या व इतरांच्याही जीवनात व मानवीवंशाच्या मुळावर घाव घालणारी ठरते. म्हणून ‘ज्योत से ज्योत जगाते चलो । प्रेम की गंगा बहाते चलो’ अशा प्रकारची गीते नुसती गुणगुणण्यासाठी नव्हे, तर आत्यंतिक आनंदाने जीवन जगण्याचा एक महाबोध देणारी आहेत. त्याकरीता हृदयाची कवाडे उघडी ठेऊन मनाची संवेदनशीलता वाढविणे गरजेचे आहे.
Post Views: 302