14 जिल्ह्यांचे निर्बंध शिथिल; नाट्यगृहे, सिनेमागृहे, हॉटेल्स; 100 टक्के क्षमतेने सुरू
सरकारची नवी नियमावली जारी; अकोला, बुलडाणा, वाशिमला प्रतीक्षा
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
02 Mar 2022, 9:16 PM
मुंबई : कोरोना संसर्गाचा प्रभाव ओसरल्याने राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नुसार राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा यात समावेश असून, या जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने हॉटेल्स, सिनेमा आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच पर्यटन आणि धार्मिकस्थळेही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाट्य, सिनेमासह पर्यटन आणि हॉटेल व्यवसायालाही मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने या 14 जिल्ह्यांना ए श्रेणीत टाकले आहे. या ए श्रेणीतील जिल्ह्यातील 90 टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे, तर 70 टक्के लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे. तसेच या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्के आहे. तसेच ऑक्सिजन सपोर्टेड बेडची किंवा आयसीयूतील बेडची क्षमता 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळेच निर्बंधात सूट देण्यात येत असल्याचे नियमावलीत म्हटले आहे. दरम्यान पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावतील जिल्ह्याचा तूर्तास समावेश नसल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
इतर जिल्ह्यात हॉटेल, सिनेमा आणि नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, निर्बंध शिथिल करण्यात आले तरी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
मुंबईसह राज्यातील 14 जिल्ह्यातील कोरोनाची संख्या घटली आहे. त्यामुळे त्यांची निर्बंधातून सुटका करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार या 14 जिल्ह्यात सिनेमा आणि नाट्यगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच पर्यटनस्थळे, धार्मिकस्थळे आणि हॉटेल्सही 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्पा आणि स्पोर्टसही या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतात. सर्व उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतात, असे या नियमावलीत म्हटले आहे. सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पर्यटनस्थळे, हॉटेल्स, बार, स्पा, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन मैदाने आदींसाठी नियम लागू राहणार आहे.
या जिल्ह्यांना निर्बंधातून सूट
मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आदी.
उर्वरित जिल्ह्यात काय आहेत निर्बंध?
ए वर्गातील जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध अद्याप कायम आहेत. यामध्ये अंत्यसंस्कार, लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धा यांसाठी 50 टक्के उपस्थितीसह परवानगी देण्यात आली आहे. शॉपिंग मॉल्स, सिनेमागृहे, रेस्टॉरंट हे पूर्ण क्षमतेने उघडण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहेत. तसेच जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, पर्यटन स्थळे, मनोरंजन पार्क या ठिकाणी 50 टक्के क्षमतेची मर्यादा कायम आहे.
Post Views: 344