युक्रेनवरील हल्ले थांबवणार नाही; अणुबॉम्ब टाकण्याची रशियाची खुमखुमी
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
01 Mar 2022, 8:11 PM
मॉस्को : मागील सहा दिवसांपासून युक्रेनवर रशियाचे लष्करी हल्ले सुरूच आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, पण सर्व बैठका निष्फळ ठरल्या. रशियाने गेल्या सहा दिवसांत युक्रेनच्या विविध शहरात अनेक हल्ले करुन मोठा भाग ताब्यात घेतला. यादरम्यान, अनेक ठिकाणी मोठा विनाश झाला, पण पुतिन अजून थांबायला तयार नाहीत.
रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सेर्गेई शोएगु यांनी रशियाचे हल्ले थांबणार नसल्याचे म्हटले आहे. आम्ही युक्रेनच्या सामान्य नागरिकांवर हल्ले करणार नाही. आम्ही फक्त युक्रेनचे लष्करी ठिकाणे उद्ध्ववस्त करत आहोत. जोपर्यंत युक्रेन हार मानत नाही, तोपर्यंत आम्ही हल्ले सुरूच ठेवणार, असेही ते म्हणाले.
युक्रेनने शरणागती न पत्करल्यास रशिया अणुबॉम्बचा वापर करू शकते, अशी धमकी रशियाच्या कडून वारंवार देण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध भयानक स्थितीत पोहोचले आहे. रशियाकडून युक्रेनमधील प्रमुख शहरांना लक्ष्य केले जात आहे. रशियन विमानांकडून सातत्याने बॉम्बहल्ले केले जात आहेत. दरम्यान, युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हमधील अनेक इमारतींवर रहस्यमय खुणा दिसत आहेत.
अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात रशियन मिशनच्या 12 सदस्यांची हेरगिरीच्या आरोपाखाली हकालपट्टी करण्याचा निर्णय जारी केला आहे. युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धाच्या पाचव्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेसह अनेक देशांनी निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रशियन राजदूतांनी हेरगिरीच्या कारवायांमध्ये सामील होऊन अमेरिकेत वास्तव्याचा अधिकार गमावला आहे. त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत राष्ट्रीय सुरक्षेला नुकसान पोहोचवणारे काम केले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
Post Views: 243