बंडखोरांंना किंमत मोजावी लागेल : शरद पवारांचा इशारा


बहुमत सिद्ध करण्यासाठी बंडखोरांना यावेच लागेल
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  23 Jun 2022, 9:40 PM
   

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी सगळे प्रयत्न करू. परंतु, बंडखोरी करणार्‍यांना किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा शरद पवार यांनी दिला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर शरद पवार लक्ष ठेवून आहेत. बुधवारी सायंकाळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. त्याआधी शरद पवार यांनी सरकार कोसळले तर आम्ही विरोधी बाकावर बसू, असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. 
राज्यातील वेगवान घडामोडींमुळे मागच्या तीन दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांच्या देखील बैठका होत आहेत. आजही मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. सरकार गेले तर संघर्षाची तयारी ठेवा, अशा सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांना दिल्याची माहिती पुढे येत आहे. आज झालेल्या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.  दरम्यान, शरद पवार हे राज्यातील गृह खात्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला शिवसेनेचे आमदार बंड पुकारून भाजपाची सत्ता असणार्‍या गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती देण्यात राज्याच्या गृहखात्याबरोबरच गुप्तचर यंत्रणांना अपयश आल्याचे शरद पवार यांचे मत असून त्यांनी उघडपणे दिलीप वळसे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगायला हवे होते... 
सरकार गेले तर संघर्षाची तयारी ठेवा, अशी सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांना केली. आज सकाळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर काल झालेल्या बैठकीची माहितीही शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी आपले म्हणणे स्पष्टपणे मांडायला हवे, असे मत शरद पवारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
शिंदेंच्या बंडामागे भाजप...
एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप नसल्याचे अजित पवारांनी सांगितले. अजित पवारांना इथली स्थानिक माहिती आहे, पण गुजरात आणि आसाममधील परिस्थिती आम्हाला जास्त माहीत आहे. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यानुसार देशात सहा राष्ट्रीय पक्ष असून भाजप सोडून इतरांचा त्यांच्यामागे हात आहे का, याचा विचार करावा. गुजरात आणि आसामला ज्या लोकांनी शिंदेची व्यवस्था केली ते अजित पवारांच्या परिचयाचे नाही, ते माझ्या परिचयाचे आहेत. त्यामुळे मला त्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या मागे असणारा राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजपच आहे, असे शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

    Post Views:  270


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व