घरगुती गॅस सिलिंडरमध्ये 100 ते 200 रुपये वाढ?


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  01 Mar 2022, 8:09 PM
   

नवी दिल्ली - जागतिक स्तरावर रशिया-यूक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. सिलिंडरच्या दरात 105 रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी करण्यात आली आहे, तर 5 राज्यांच्या निवडणुका सुरू असल्याने घरगुती सिलिंडरच्या दरात 7 मार्चनंतर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान 3 मार्च आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 7 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे 7 मार्चनंतर घरगुती गॅस सिलिंडरसाठी तुमच्या खिशातून अधिकचा खर्च सहन करावा लागू शकतो. या दरवाढीनंतर मंगळवारपासून 19 किलो व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,012 रुपये इतकी होणार आहे. तर 5 किलो सिलेंडरची किंमत 27 रुपयांनी वाढणार आहे. 
सध्या देशात 5 राज्याच्या निवडणुका असल्याने मागील काही महिने विना अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत जास्त फरक झाला नाही. कच्च्या तेलाचे दर 102 डॉलर प्रति बॅरेल झाल्यानंतरही ऑक्टोबर 2021 पासून घरगुती सिलिंडरच्या दरात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर म्हणजे 7 मार्च मतदानाचा अखेरचा टप्पा झाल्यानंतर कधीही घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 ते 200 रुपये प्रति सिलिंडर वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 170 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र 6 ऑक्टोबर 2021 नंतर घरगुती सिलिंडरचे दर ना स्वस्त झाले ना महाग झाले. त्यामुळे आता निवडणुका संपल्यावर हे दर वाढतील अशी शक्यता आहे. 

    Post Views:  273


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व