पेन्शनर टीचर्स फोरम द्वारे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत रॅलीचे आयोजन


 विश्वप्रभात  08 Oct 2025, 9:08 PM
   

अकोला : अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी सेवानिवृत्त शिक्षकांची संघटना  'पेन्शनर टीचर्स फोरम, जिल्हा अकोला'  ही संघटना पुढे सरसावली आहे. संघटनेचे पदाधिकारी सेवानिवृत्त शिक्षकांचे घरोघरी जाऊन शेतकरी बांधवांसाठी त्यांचे पाय धरून सहाय्य करण्याची विनंती करत आहेत. हे अभियान ३० सप्टेंबर रोजी सुरू झाले असून हा संपूर्ण महिना चालणार आहे. विशेष बाब म्हणजे सर्वच सेवानिवृत्त शिक्षक हे निसर्गनियमाने  वयोवृद्ध आहेत आणि प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या आजाराने पिडीत आहे. जिल्ह्यातील ८०% सेवानिवृत्त शिक्षकांचा वडिलोपार्जित व्यवसाय हा शेती आहे. सेवानिवृत्तीनंतर ते आता पुन्हा आपला मूळ व्यवसाय असलेल्या शेतीकडे वळलेले आहेत.
        अतिवृष्टीमुळे स्वतःचीच शेती प्रचंड नुकसानीत असतानाही हे शिक्षक-शेतकरी आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीस मान देऊन आपल्या परीने  योगदान देत आहेत. विशेष म्हणजे या संघटनेचे संस्थापक तथा विद्यमान जिल्हाध्यक्ष जयंत घाटोळ हे आणि सर्वच तालुकाध्यक्ष व पदाधिकारी हेही शेतकरीच आहेत, त्यांचाही खरीप हंगाम अतिवृष्टीत वाहून गेला आहे. 
   पेन्शनर टीचर्स फोरमच्या या सेवानिवृत्त शिक्षकांच्या (केजी टू पीजी) काळ्या आईच्या बांधिलकीचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत होत आहे व सेवानिवृत्त शिक्षकही आपापल्या परीने भरभरून योगदान देत आहेत.       जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी संघटनेचे पदाधिकारी आपल्या घरी येण्याची वाट न पाहता दिलेल्या खातेक्रमांकावर ऑनलाईन स्वरुपात आपले योगदान पाठवून बळिराजाप्रती आणि काळ्या आईप्रती आपली निष्ठा दाखवावी असे आवाहन या संघटनेने केले आहे.

    Post Views:  51


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख