देशातही होऊ शकते महाविकास आघाडी!
काँग्रेस मेळाव्यात मंत्री अमित देशमुखांचे वक्तव्य
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
01 Mar 2022, 8:08 PM
औरंगाबाद : राज्यात जशी युती झाली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, असेच चित्र देशात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपाला शह देत सत्ता बळकावण्याचा विचार होऊ शकतो, असे विधान औरंगाबाद येथील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री अमित देशमुख यांनी केले. त्यामुळे पुन्हा जोरदार राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
गेल्या विधानसभेवेळी राज्यात जे घडले त्याने देशाला तोंडात बोट घालायला लावले. कारण मोदी आणि शहांच्या ताकदीला राज्यात पवारांची युक्ती भारी पडली. शिवसेना आणि भाजपचा तीन दशकांचा घरोबा संपला आणि महाविकास आघाडी तयार झाली. त्यामुळे आमदारांची शंभरी पार करूनही भाजप सत्तेपासून वंचित राहिली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा गाजलेला पाहटेचा शपथविधीही काही तासात पवारांनी फेल केला. गेल्या अडीत वर्षापासून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी हे विधान केले आहे.
राज्यात महाविकास आघाडी झाली आहे, तशीच उद्या देशातही महविकास आघाडी होऊ शकते आणि त्याचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असे वक्तव्य अमित देशमुख यांनी केले आहे. त्यामुळे सर्वाच्याच भुवया उचावल्या आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत, काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्या तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे स्वबळाचा नारा आणि दुसरीकडे देशात युतीचे विधान त्यामुळे कार्यकर्तेही काही काळ संभ्रमित झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपूर्वीच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात दाखल होत मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसशिवाय देशात तिसरी आघाडी होणार नाही, असा सूर काँग्रेस नेत्यांनी लावल्याचे दिसून आले.
येत्या काही दिवसातच राज्यात विविध निडणुका होणार आहेत. त्याच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहे. अनेक दौरे करत महाराष्ट्र पिंजून काढत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात, पावसाळ्यात महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्याची तयारी चांगली करा, असे अमित देशमुख म्हणाले.
संभाजी राजेंबाबतही स्पष्टीकरण
छत्रपती संभाजी राजे यांनी उपोषण सोडले आहे, त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे संभाजीराजे हे महाविकास आघाडी सोबत येऊन काम करायला तयार आहेत. असे वक्तव्य अमित देशमुख यांनी केले होते, मात्र यावरून स्पष्टीकरण देताना त्यांनी मागण्यांची पूर्तता होईपर्यंत संभाजीराजे सोबत काम करायला उत्सुक आहेत, असे स्पष्ट केले आहे.
Post Views: 309