संभाजी छत्रपतींकडून उपोषण मागे; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
28 Feb 2022, 8:10 PM
मुंबई : राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर खासदार संभाजी छत्रपती यांनी आज उपोषण मागे घेतले. तीन दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजीराजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी उत्तर दिले.
मंचावर उपस्थित असलेल्या मंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. एवढेच नव्हे तर संभाजीराजे यांनी केवळ सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत. काहीच ठेवायचे नाही, असा निर्णयच सरकारने घेतला असून, या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.
खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने त्यांची भेट घेतली. त्यावेळी व्यासपीठावरच त्यांच्यामध्ये चर्चा झाली. लेखी आश्वासनाशिवाय हे उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी मांडली होती. त्यानंतर मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर खासदार संभाजीराजेंनी आपले उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले. त्यांनी मंचावर असलेल्या लहान मुलाच्या हातून रस घेत आंदोलन मागे घेतले. त्यानंतर त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते रस घेतला.
उपोषण माझ्यासाठी ऐतिहासिक : संभाजीराजे
उपोषण हा माझ्यासाठी ऐतिहासिक निर्णय होता. मी घरच्यांना याबाबत सांगितले नव्हते. मी माझ्या आई-वडिलांनाही सांगितलं नाही, घरच्यांना बाहेरून कळाले. वडील असल्याने ते मला थांबवण्याची भीती होती. मी सहकार्यांना त्यांचा फोन जोडून देऊ नका, असे बोललो. कारण त्यांना काळजी वाटत होती. आंदोलनाच्या आदल्या दिवशी त्यांच्याशी बोललो. त्यावेळी ते म्हणाले माझ्या आशीर्वादाची गरज नाही, तुम्हाला महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी माझ्या वडिलांचेही आभार मानतो, असेही राजे म्हणाले.
या मागण्या झाल्या मान्य
मराठा समाजातील उमेदवारांना अधिकाधिक नोकर्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार.
सार्थीचे व्हीजन डॉक्युमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून 2022 पर्यंत याची पूर्तता करणार.
सार्थी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदे 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार.
सार्थी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रिमंडळासमोर ठेवणार.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी दिले असून, आणखी 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी निधी देणार.
व्याज परतावा संदर्भात कागदपत्रांची पूर्तता करून व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले.
Post Views: 387