फडणवीसांच्या काळात 25 हजार कोटींचा घोटाळा
खा. राऊतांनी पत्रकार परिषदेत भाजपा नेत्यांना घेतले आडव्या हाताने
मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर केले आहे. भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला, ईडीला हे दिसत नाही का? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीसांचा एक फ्रंटमॅन आहे. त्याचे नाव मोहित कंबोज आहे. तो फडणवीसांना डुबवणार आहे. पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा असून पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवान त्यांच्याकडून केबीजी ग्रुपने 12 हजार कोटींची जागा 100 कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपचे, पैसे कुठून आलेत याच माहिती फडणवीसांना आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
भाजपकडून आम्हाला धमक्या
नवी दिल्लीत असताना भाजपचे काही प्रमुख नेते मला भेटले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार लवकरच पडणार आहे. एकतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाईल किंवा महाविकास आघाडीतील काही आमदार आमच्यासोबत घेऊन आमचे सरकार स्थापन केले जाईल. तुम्ही यामध्ये पडू नका. अन्यथा ईडी आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाइट आणि फिक्स करतील, अशा आशयाची धमकी दिली. मात्र, याला मी सक्त विरोध केला. त्या दिवसानंतर माझ्या आणि माझ्या जवळच्या व्यक्तींवर ईडीने धाडी टाकण्यास सुरुवात केली, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केला.
किरीट, नील सोमय्यांना अटक करा
पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध असून त्यांचा पुत्र नील हा या मास्टरमाइंडच्या कंपनीत संचालक पदावर काम करत आहे. त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे हजारो कोटींचे प्रकल्प उभे केले आहेत. हा सगळा पीएमसी बँकेतील पैसा आहे. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या मिळालेल्या नसून राष्ट्रीय हरित लवादाने अॅक्शन घेतल्यास कारवाई होईल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. इतकेच नाही, तर पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भारतीय जनता पक्षाला 20 कोटी रुपयांचा निधी गेला असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन
पीएमसी घोटाळ्यातील आरोपीने किरीट सोमय्या यांच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली?, असा सवाल उपस्थित करतानाच या भ्रष्टाचाराविरोधात लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय, आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा, अशा शब्दात राऊत यांनी सोमय्या यांना टोला लगावला आहे. यावेळी राऊत यांनी देवेंद्र लधानी हे नाव घेतले. देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन असून त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.
किरीट सोमय्यांचा दलाल म्हणून उल्लेख
ईडीच्या धाडींची माहिती मुलुंडमधल्या दलालाला सर्वात आधी कशी काय मिळते, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. ठाकरे कुटुंबाने अलिबागमध्ये कोरलाईत 19 बंगले बांधले आहेत. ती बेनामी संपत्ती असल्याचा दावा मुलुंडमधल्या दलालाने केला आहे. कुठे आहेत 19 बंगले? चला आपण त्या बंगल्यात आपण पिकनिकला जाऊ, असे आव्हान राऊतांनी दिले. माझे स्पष्ट आणि थेट आव्हान आहे. आपण चार बसेस करू आणि त्या 19 बंगल्यात पिकनिकला जाऊ. तिथे ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि बंगले तिथे नसतील तर मी त्याला जोड्याने मारेन.
Post Views: 271