सिंधुताई यांच्यासोबत रंगत असे गझल-कविता, गप्पांची मैफल
ज्येष्ठ साहित्यिक देवकाबाई देशमुख यांनी दिला आठवणींना उजाळा
अकोला : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे अकोला शहर आणि येथील साहित्यिकांसोबत वेगळे नाते होते. त्या अनेकदा येथे येत असत. रात्रीचा मुक्काम करत नि निघून जात. सिंधुताईंचा आवाज खूपच मोहिनी घालणारा होता. त्या घरी आल्या नि रात्रीची जेवणं आटोपली की गझल, कविता आणि गप्पांची मैफल मध्यरात्रीपर्यंत रंगत असे, अशा आठवणींना जवाहरनगर भागातील रहिवासी ज्येष्ठ साहित्यिक देवकाबाई देशमुख यांनी उजाळा दिला. सिंधुताईंसोबतच्या मैत्रीतील अनेक प्रसंग त्या सांगतात.
देवकाबाई देशमुख सांगतात, 1984 पूर्वी सिंधुताईंचे अनेकदा अकोल्यात येणे होई. पुणे किंवा मुंबईला गेल्या की त्या तेथून परतताना चिखलदर्यातील मुलांसाठी कपडे घेऊन येत असत. एकदा कपड्यांच्या जड असलेल्या बॅगा घेऊन त्या अकोला रेल्वे स्थानकावर उतरल्या. येथून पुढे चिखलदर्याला जाचये होते. त्यांच्याकडे असलेलं कपड्यांचं ओझं, चेहर्यावरचं कष्ट आणि गरजूंसाठीची धडपड हा प्रसंग कधीही विसरता येणार नाही. देवकाबाई सांगतात सिंधुताई घरी यायच्या तेव्हा आई आमच्या दोघींना गरमा गरम जेवू घालायची. रात्रभर आमच्या गप्पा-गोष्टी चालायच्या. एकदा सकाळीच आम्ही पाच रुपयात रिक्षा करून गांधी रोडवरील एका प्रेसमध्ये गेलो होते. त्यांना ‘मी वनवाशी’चे प्रकाशन करायचे होते. तेथून पुढे आम्ही साहित्यिक षुरुषोत्तम बोरकर यांच्याकडे गेलो. मी मासिक काढत असल्यामुळे साहित्यक्षेत्रात ओळख होती. एकदा मुंडगावला आल्यावरही त्या दोन घास माझ्यासोबत खाऊन पुढं गेल्या. सिंधुताईंनी मोठ्या बहिणीसारखं प्रेम दिलं. 1984 पासून आमची ओळख झाली. प्रत्येकवेळी त्या आपुलकीने वागत. त्या आमच्या परिवारातील जणू एक सदस्यच झाल्या होत्या. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर तरळत आहेत, अशी श्रद्धांजली देवकाबाई यांनी अर्पण केली.
Post Views: 283