बोईसर येथे स्कायवॉकची नितांत गरज....


 विश्व प्रभात  2024-08-16
   

(संतोष घरत) -  बोईसर शहारा मध्ये स्कायवॉक ही काळाची गरजआहे ह्या करिता रेल्वे प्रशासनानेही बदलणे गरजेचे आहे. असे मत सामान्य नागरिकांचे आहे.
    आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या तारापूर औद्योगिक वसाहतीत रोजच लाखो लोक कामासाठी रोजगारासाठी ये-जा करीत असतात. येथुनच मोठ्या प्रमाणात महसूल ही मिळत असतो.औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी बोईसर हे मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आहे. ह्या स्टेशन वरूनच सर्व चाकरमानी प्रवास करीत असतात, परंतु ह्या स्टेशन वरून उतरल्या पासुनच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रथम म्हणजे मुंबई हुन येणारी आणि मुंबई कडे जाणारी गाडी २ आणि ३ नंबरच्या प्लॅटफॉर्म वर थांबते, तसेच कामाच्या वेळे मध्ये असणाऱ्या ह्या गाड्या प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत खूप कमी आहेत त्या मुळे गर्दी ही खूप असते.
  डहाणू येथुन बोईसर येथे सकाळी ७.३३ च्या लोकलला औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर महिला  येत असतात, गाडी ३ नंबरच्या प्लॅटफॉर्म वर थांबत असल्याने आणि प्रचंड गर्दी असल्याने जिन्या वर चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे सर्व प्रवासी २ आणि १ नंबरच्या रेल्वे रुळामधुनच जाणे, मालवाहू गाडीच्या च्या डब्याखालुन किंवा वरून जाण्याचा धोकादायक मार्ग नायलाजस्तव अवलंबितात.याच वेळी अनेक जलद ट्रेन २ नंबरच्या रुळावरून वरून जात असतात , १ नंबरच्या रुळावरून वर शंटींग ही चालू असते. समस्या येथेच संपत नाही कारण पुढे रस्त्यावर अनेक वाहने जाणुन बुजुन उभी केलेली असतात ,त्यामुळे चालत जाणा-याला चालताही येत नाही.आणि कामावर जाण्यास उशीर होतो. रिक्षाने जाणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही आणि  यावेळी तारापूर औद्योगिक क्षेत्रासाठी एक किंवा दोन  बसेस सोडण्यात याव्यात. रस्ते पुर्ण खराब,,  आणि नवीन समस्या म्हणजे टाकिनाक्या वर लावलेल्या सिग्नल यंत्रणाची वेळ.  ही वेळ जरा जास्तच वाटते.ह्या सिग्नलच्या आजुबाजुलाच अनेक वाहने उभी केलेली असतात.ब-याच कंपन्यांमध्ये पाच ते दहा मिनिटे उशिराने गेले तरी पंधरा ते तीस मिनिटांचा पगार कापला जातो. अशी कामगारांची  कुजबुज ऐकवयास मिळत आहे.
  वरील गाडी रोज पालघर येथे सायडींगला काढतात त्या ऐवजी बोईसर येथे काढली तर महिलांना आणि इतर प्रवाशांनाही सुरक्षित पणे उतरता येईल.त्याच प्रमाणे औद्योगिक वसाहतीत कंपन्यांच्या येण्या- जाण्याच्या वेळे प्रमाणेच बोईसर येथे ट्रेन असाव्यात.
   सर्वात मोठी समस्या म्हणजे स्टेशन बाहेर पडले की अनेक वाहने जाणुन बुजुन उभी केलेली असतात किंवा जोरात समोर आणुन उभे करतात किंवा युटर्न घेतात त्यामुळे चालताना धोका निर्माण होतो. तसेच विकलांग, आजारी प्रवाशांच्या सोयीसाठी बनविलेले नागमोडी जिने अत्यंत अडचणींचे आहेत, ह्या जिन्याच्या वरील पत्र्याच्या शेडचा पावसाळ्यात काही उपयोग नाही होत तसेच ह्या पत्र्यावर काही विचित्र प्रवासी थुंकत असतात , पावसाळ्यात तेच पाणी प्रवाशांच्या अंगावर पडत असते.नागमोडी जिन्यावरून जायच्या ठिकाणी तिकीट खिडकी नसल्याने विकलांग आणि आजारी प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाऊन परत नागमोडी जिन्याजवळ यावं लागते, ह्या नागमोडी जिन्याजवळ एक तिकीट खिडकी असणं गरजेचं आहे. तसेच ह्या जिन्याच्या प्रवेश करण्याचा रस्त्या मोकळा असायला हवा, कि जेणेकरून अपंगांना आणि आजारी प्रवाशांना व्यवस्थितपणे जिन्यावर जाता येईल.
   बोईसर स्टेशन ते मधुर हाॅटेल पर्यंत आणि दुस-या बाजूला बोईसर स्टेशन ते एसटी स्टँड पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होते हे सर्व विचारात घेतले तर आज बोईसर स्टेशनच्या जिन्याला सलग ते मधुर हाॅटेल आणि बोईसर स्टेशनच्या जिन्याला सलग ते एसटी स्टँड पर्यंत स्कायवॉक ची नितांत गरज आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना आपल्या कामांच्या ठिकाणी आणि घरीपण योग्य वेळी आणि सुरक्षित पोहचता येईल. तसेच स्टेशन वर होणा-या वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येईल.

    Post Views:  246


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व