तुळशिदास खिरोडकार यांना राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
29 Feb 2024, 8:19 AM
अकोला- जिल्हा परिषद अकोला चे उपक्रमशील शिक्षक तुळशिदास खिरोडकार यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम.एस.पी.)चा राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे अध्यक्ष दीपक चामे व उज्ज्वला नरेंद्र इंगळे निवड समिती सदस्य यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सार्वत्रिकीकरणासाठी कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षकांचा नाशिक येथे १४ मे रोजी आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
तुळशीदास खिरोडकार प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पंचवीस वर्षांपासून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना कृतीशील अध्यापन करणारे शिक्षक म्हणून राज्यभर परिचित आहेत. त्यांनी सेवा दिलेल्या विविध शाळांना राज्य स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. लढा स्वातंत्र्याचा हे इतिहास कथन प्रकाशित व आदिवासी कोरकू बोलीभाषिक विद्यार्थ्यांना मराठी भाषा ओळख व्हावी व शैक्षणिक गतिमानता यावी यासाठी बालस्नेही पुस्तकाची निर्मिती त्यांनी केली आहे. दरवर्षी आदिवासी विद्यार्थी व शाळांना मोफत पुस्तक वाटप ते करतात.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसेनानींच्या 12 सत्यकथा भारत सरकारच्या सांस्कृतिक संसाधन एवं प्रशिक्षण केंद्रच्या (CCRT)पोर्टल वर प्रकाशित असून महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाशित १००० पानांच्या क्रांतीरत्न ह्या महाग्रंथात वैचारिक लेख समाविष्ट आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी स्वयंप्रेरणेतून रेडिओ खंडाळा या उपक्रमाद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना अध्ययनाची शैक्षणिक सुविधा उपलब्ध त्यांनी करून दिली. जागर फाउंडेशन च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम तसेच बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून 48 आदिवासी शाळाबाह्य मुलांना शाळेच्या शिक्षण प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटात २००८ साली महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विज्ञान प्रदर्शनीत सहभाग घेऊन वैज्ञानिक प्रतिकृतीची सातत्याने चार वर्षे जिल्हास्तरावर निवड. खंडाळा येथे कार्यरत असतांना २०२१ सालचा भारत सरकारचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळाला. मराठी चित्रपट डेबू, सालस व छत्रपती राजे शिवराय ह्या महानाट्यात भूमिका, बरोबर, जल संवर्धन ह्या शॉर्ट फिल्म, प्रबोधनात्मक लघुनाट्य, पथनाट्य ह्यात भूमिका साकारल्या. खिरोडकार यांना यापूर्वी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा नवोपक्रमाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, बालरक्षक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय बालरक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा शिक्षक रत्न पुरस्कार २०२१, मानवता सन्मान पुरस्कार, पाचव्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन २०२१ युथ आयकॉन पुरस्कार यासह विविध संस्थांकडून आदिवासी मित्र, दिव्यांग मित्र, शिक्षक साहित्य पुरस्कार, प्रयोगशील शिक्षक पुरस्कार, गुणवंत शिक्षक पुरस्कार, अकोला भूषण पुरस्कार, उपक्रमशील शिक्षक पुरस्कार ह्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Post Views: 307