5 वर्षांपूर्वी अपघातात गमावला आवाज; कोरोनाची लस घेताच पुन्हा फाडफाड बोलू लागला
रांची : अजूनही असे अनेक लोक आहेत, जे कोरोना लसीला घाबरून लस घेण्यास नकार देत आहेत. मात्र, अशात आता दुसरीकडे कोरोना लसीबाबतची एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. या घटनेत 5 वर्षांपूर्वी एका अपघतात आपला आवाज गमवलेल्या आणि मागील एका वर्षापासून पूर्णपणे बेडरेस्टमध्ये असलेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना लसीमुळे आश्चर्यचकित करणारे बदल घडले. लस घेताच हा व्यक्ती बोलू लागला आणि तो खणखणीत बराही झाला.
लसीच्या पॉझिटिव्ह साईड इफेक्टचं हे प्रकरण झारखंडमधील असून या घटनेनंतर डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. हिन्दुस्तानच्या रिपोर्टनुसार, बोकारो जिल्ह्यातील पेटवार येथील उतासार पंचायतीअंतर्गत येणाऱ्या सलगाडीह गावात ही घटना घडली. यात 55 वर्षीय दुलारचंद मुंडा पाच वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातानंतर जीवन-मरणाची लढाई लढत होते. पाच वर्षांपूर्वी रस्ते अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारानंतर दुलारचंद बरे झाले, मात्र त्यांच्या शरीरातील काही अवयवांनी काम करणं बंद केलं. यासोबतच त्यांचा आवाजही व्यवस्थित येणं बंद झालं.
कुटुंबातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपासून दुलारचंद यांचं आयुष्य एका खाटेवरच जात होतं. त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं होतं, तसंच त्यांना व्यवस्थित बोलताही येत नव्हतं. कोरोनापासून बचावासाठी जेव्हा त्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली, तेव्हा त्यांचा आवाज एकदम व्यवस्थित झाला. यासोबतच त्यांच्या शरीरातील अवयवांमध्ये जीव आला आणि अनेक अवयवांनी पुन्हा हालचाल करण्यास सुरुवात केली.
याबाबत डॉक्टरांसोबत बातचीत केली असता, डॉ. अलबेल केरकेट्टा यांनी सांगितलं, की अंगणवाडी केंद्रातील सेविकांनी चार जानेवारीला दुलारचंद यांनी घरी जाऊन त्यांनी लस दिली होती. एका दिवसानंतर म्हणजेच 5 जानेवारीपासूनच त्यांच्या शरीरातील ज्या अवयवांच्या हालचाली बंद झाल्या होत्या, त्या अवयवांमध्ये पुन्हा जीव आला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दुलार यांनी स्पाईनमध्ये समस्या होती, यामुळे अनेक दिवसांपासून ते बेडवरच होते. लस घेताच शरीरात झालेला हा बदल डॉक्टरांसाठीही शोधाचा विषय आहे. सिव्हिल सर्जन डॉ. जितेंद्र कुमार यांनी ही आश्चर्यकारक घटना सांगितली आहे.
Post Views: 357