एसटीची चाके थांबलेली, चर्चा निष्फळ; महामंडळाची 238 एसटी कर्मचार्‍यांवर कारवाई


एसटीचे विलीनीकरण करा : कर्मचारी, विलीनीकरण अशक्य : फडणवीस
 Pankaj Deshmukh  2021-11-20
   

मुंबई : एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहे. शासनाच्या कोणत्याही चर्चेला ते प्रतिसाद देत नसून, जोपर्यंत एसटीचे शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन कायम ठेवत एसटी धावू दिली जाणार नाही, ही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे एसटीची चाके जागच्या जागेवर असून, प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहे.
राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांचा संप अद्याप सुरू आहेत. संप मागे घ्या, असे आवाहन करूनही कर्मचारी ऐकत नसल्याने एसटी महामंडळाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात 238 एसटी कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. 
मुंबईत एसटी कर्मचार्‍यांचे जागर गोंधळ आंदोलन सुरू आहे. मुंबईत येणार्‍या आंदोलकांना बाहेरच रोखले गेले आहे. दरम्यान, एसटीतील 238 कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित कर्मचार्‍यांवरही सेवा समाप्तीची कारवाई सुरू राहणार आहे. मात्र, कर्मचारी आंदोलनावर ठाम आहे. 
राज्यातून आझाद मैदानातल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कर्मचारी दाखल होत आहेत. त्यांना अडवले जातेय. मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनात सहभागी  होण्यासाठी जाणार्‍या मनमाड आगारातील 21 एसटी कर्मचार्‍यांना मनमाड पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा या एसटी कर्मचार्‍यांनी घेतला आहे. 
आझाद मैदान इथे येत असणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना पनवेल, कळंबोली, टोल नाके इथे पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. आझाद मैदानातील एसटी कर्मचार्‍यांनी दिलेली ही माहिती दिली. अनेक ठिकाणाहून एसटी कर्मचारी आझाद मैदान इथे येत आहेत. गेल्या11 दिवसांपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. राज्य शासनाच्या निषेधार्थ एसटी कर्मचार्‍यांनी भंडार्‍यात मुंडन आंदोलन केले. कंत्राटी पद्धतीवरील अनेक एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे या कारवाईला घेऊन एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका या एसटी कर्मचार्‍यांनी घेतली आहे.
अनिल परबांच्या घराची सुरक्षा वाढवली
एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी अडून बसले असून, ते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. परबांच्या घरावर मोर्चा काढणार्‍या या मोर्चेकर्‍यांना सध्या आझाद मैदानावरच अडवण्यात आले आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून, आम्ही परबांच्या घरावर मोर्चा करणार काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितले. 
एसटी विलीनीकरण तूर्तास अशक्य : फडणवीसांचे
एसटीच्या विलीनीकरणाची मागणी पूर्ण करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग सुचवला असून, सरकारने निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे एसटीचे विलीनीकरण सध्या तरी अशक्य असल्याचे म्हटले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी नाशिक येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी एसटी कर्मचार्‍यांचे शिष्टमंडळ, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. ही बैठकही कोणत्याही निर्णयाविना संपली होती. 

    Post Views:  312


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व